ध्यास पर्यावरण संवर्धनाचा

लावूया सर्वांनीच झाडे चार

           टाळू पर्यावरणाचा ऱ्हास

           चिवचिवती पाखरे त्यावर

           बांधुन घरटी पिलांना खास

आजच्या घडीला घराघरांत गावागावात पर्यावरणाचा ऱ्हास होतो, वृक्षारोपण करायला हवे, झाडे लावा झाडे जगवा, मानवाच्या दुष्कृत्यामुळे त्याला ही शिक्षा मिळाली  अशी बोधवाक्ये ऐकायला मिळत असतात. परंतु पर्यावरणाचा ऱ्हास कोणत्या कारणामुळे झाला त्यासाठी वृक्ष लावणे किंवा त्यांची जोपासना करणे ही जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नसतं किंवा हे आपणच केले आहे हे कोणीही मान्यही करत नाही. “झाडे लावा” असे प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळते. “मी झाडे लावतो” असे कधी कोणी उच्चारत नाही. याचाच अर्थ जे काम करायचे आहे ते आपण नव्हे, तर इतरांनी करायचे आहे अशी सर्वांची एकमेकांच्याविषयी भावना असते. म्हणजेच “शिवाजी जन्मावा पण तो शेजार्‍याच्या घरात” अशीच मानवीवृत्ती बनलेली आहे. मी मात्र ह्यातलं काहीही करणार नाही, फक्त साऱ्याचा उपभोग घेणार. झाडे तोडणार परंतु वृक्षारोपण करण्याचे माझे कर्तव्य नाही अशी वृत्ती असल्यामुळे पाऊस पाण्याचे प्रमाण कमी-जास्त झाले आहे. ग्लोबल वॉर्मिंग झाले आहे. अशा भीषण परिस्थितीत आजही वृक्षारोपण प्रक्रिया कुठेही होताना दिसत नाही. परंतु भाराभार वृक्षांची कत्तल मात्र होताना जागोजागी दिसत आहे. जिकडे पहावे तिकडे सिमेंट काँक्रीटचे जंगल पाहायला मिळते.

सुधारणांच्या नावाखाली झाडे तोडून पूल, धरणे ,इमारती,बंगले  यांचे बांधकाम चालू असलेले दिसते. झाडे लावणे हे उद्दिष्ट समोर ठेवून कुणीही काम करताना दिसत नाही. प्रत्येकजण याचा विचार करत असतो की मीच का? सुरूवात दुसऱ्याकडुन व्हावी. “मी हे करीन” असे कुणीही बोलताना दिसत नाही.

यामुळेच या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. निसर्गाची लूट होत आहे आणि मानव फक्त घोषवाक्य देण्यातच आपला वेळ व्यतित करत आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. परंतु आपण आपल्या कृष्णकरणीने त्याचे वाटोळे केले आहे. मनुष्य नोकरीच्या निमित्ताने शहरात येतो आणि तिथलाच होऊन जातो. परंतु त्याला त्या भागाविषयी, त्या शहराविषयी तितकी आत्मीयता नसते. पैसे कमावणे एवढाच उद्देश असतो आणि तो मिळाला की त्यांना आपले गाव गाठायचे असते. गावातील कोणीही पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही.  कारण त्यांना असे वाटते, पगार घेणारे खायला येणार आणि आम्ही त्यांची सोय का करावी? अशा कोत्या प्रवृत्तीमुळे झाडे लावण्याच्या, त्याची नित्य जोपासना करण्याच्या भानगडीत कोणीही पडत नाही हेच सत्य आहे. इतरांनी लावलेली झाडे तोडण्यात त्यांना मर्दुमकी वाटते. प्रत्येक जण आपापला स्वार्थच बघत असतो. जगात काय चालले आहे किंवा बाहेर काय आहे याची कोणालाही पर्वा नसते कारण प्रत्येकाला पगार भरपूर असल्यामुळे “पैसा फेको तमाशा देखो”. आम्ही पैसे फेकून सर्व काही करू शकतो खरेदी करू शकतो ही भावना असल्यामुळे लोकांना पृथ्वीला वाचवण्याचे, पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे कार्य तितकेच महत्त्वाचे आहे हे लक्षात येत नाही.

   सर्वत्र ‘पाणी वाचवा’ अशी मोहीम चालवली जात असली तरी आपल्या घरातल्या नळ किती जण बंद करतात? तर कोणीच नाही. कारण प्रत्येकाला अपेक्षा असते की दुसऱ्याने नळ बंद करावा. सर्व ठिकाणी पंखा किंवा लाईटस् चालूच असतात. त्या बंद करायचे कष्ट कोणी घेत नाही. कारण त्यांना असे वाटते की हे लाईट बिल मला थोडेच भरायचे आहे? मी का बंद करू? परंतु हे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान आहे हे कोणी ध्यानात घेत नाही. आज घ्या सोयीसुविधा पैसे देऊन तरी आपल्याला उपलब्ध होत आहेत. परंतु भविष्यात अशी वेळ येईल की पैसे देऊनही आपल्याला ह्या सोयी सुविधा मिळणारच नाही तर मग काय करणार?

आज आपण वीज, पाणी यांची बचत केली तर भविष्यात पुढच्या पिढीला त्याचा उपभोग घेता येईल. नाहीतर त्यांचे जीवन अंधकारमय होऊन जाईल. वीज पाणी वाचवले तर भविष्यातही आपला साठा संपणार नाही. इतकी दूरदृष्टी असणाऱ्या शिवरायांनी त्या काळी बांधलेले किल्ले, बुरुज आज आपण मोठ्या अभिमानाने न्याहाळत, मिरवत असतो. मग आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण हे काहीतरी करावं किंवा समाजाचं काही देणं देणे लागतो किंवा हे आपले काम आहे, आपले कर्तव्य आहे अशी वृत्ती का असू नये? शिवरायांनी हा विचार केला असता तर आपले हिंदवी स्वराज्य स्थापन झाले असते का?

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपले रक्त या मातीवर सांडले नसते तर आजही आपण पारतंत्र्याच्या विळख्यात जखडलेले असतो. अशा विचारांमुळे मानवाची प्रगती  न होता अधोगतीच होत आहे. मानवाच्या या हानिकारक कृत्यामुळे निसर्गचक्र बदललेले आहे. सर्व ऋतू, हंगाम बदलले आहेत. मानव रोगराई, महामारी, दारिद्र्य, बेरोजगारी, भुकेकंगाल झालेले आहेतच.  निसर्गाच्या या अवकृपेमुळे मानवाला बऱ्याच वेळा फटका बसलेला आहे. जीवित आणि वित्तहानी सुद्धा होत आहे. तरी मानवाचे डोळे अजूनही उघडले नाहीत आणि ते कधी उघडतील असेही वाटत नाही. कारण आपलं म्हणून करणं आणि दुसऱ्यासाठी करणं यातील हा फरक आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपली जबाबदारी आहे हे ज्या दिवशी मानवाच्या लक्षात येईल त्या दिवशी आपली प्रगती सुरू होईल हेच खरे. पण असे व्हायला नको की जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.

तेव्हा मानवाने आता तरी जागे व्हावे आणि वृक्षारोपण करून पाण्याची बचत करावी आणि जितके पाणी जमिनीत मुरवता येईल तितके झिरपण्यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत.

रोज एक तरी झाड लावण्याचा वसा प्रत्येक मानवाने आपल्या मनाशी ठसवायलाच हवा. जागोजागी हिरवळ उगवल्याने मातीची धूपही टाळली जाते आणि पाणीही जमिनीत झिरपले जाते.

आपल्या पुढच्या भवितव्याचा आपण आज सखोल विचार करायला हवा. आपल्या आजोबा पणजोबांनी लावलेल्या झाडांची मधुर फळे आपण आज चाखत असतो.

तसे आपण केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्या मुलांनी, नातवंडांनी खावे म्हणून आपला प्रयत्न यशस्वी करणे हे  आपले परम कर्तव्य आहे. समाज हितासाठी ते गरजेचे आहे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फायदेशीर आहे.

सौ. भारती सावंत, मुंबई

9653445835

नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत..
https://chat.whatsapp.com/GSYgW6jVN4XA4ro3vf1gOi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button