एकविसावे शतक आपल्या रौप्य महोत्सवी संवत्सरात प्रवेश करायच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेले… आधुनिकता तिच्या विकृत स्वरूपात जनमानसात भिनलेली दिसते आहे. किंबहुना आधुनिकतेला व्यक्ती आपल्या विकृतीनुसार अभिप्रेत धरून वागू लागला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेचे लोण फावलेले आपण बघत आहोत. आजचा विद्यार्थी देखील याला अपवाद नाही… तो खराखुरा विद्यार्थी राहिला नाही. नुसतं शिकायचं म्हणजे शिकायचं, पास व्हायचं, टक्केवारी मिळवायची, प्राविण्य मिळवायचे, प्रथम यायचे ही वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते आणि त्याप्रमाणे त्याचं ठरलं असतं.
आई-वडील मुलांना पैसे देतात, त्यांचें लाड पुरवतात, त्यांचं मूल्य त्यांना काहीच वाटत नाही. मूल्य वाटते ते त्या पैशाचा, लाडाचा, विनियोग अमर्यादा व अयोग्य रीतीने शाळा, कॉलेजात करून, वाईट सवयी जडवून घराबाहेरील मुक्ती व स्वातंत्र्य मिळविण्याकरिता. वाढती शान, वाढत्या अयोग्य सवयी यांचा स्वीकार करून त्याचा पारिपोष करण्यात आजचा विद्यार्थी गनिमी, डावबाज, विश्वासघातकी व धूर्त झालेला आढळतो. पानठेला, बार, झाडेझुडपे, एकांतवास या स्थळी तो आढळतो.
प्रत्येक विद्यार्थी तसा राहत नाही. काही अभ्यासू, समजदार असतात.पण आज बघावं तिकडे असे धूर्त, फसवे विद्यार्थी आढळतात. सिनेमा, टीव्ही, फोन इ. मध्ये सुद्धा धुर्त, फसवा विश्वासघातकी विद्यार्थ्यांचा वापर असलेला दिसतो. आणि त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर जास्तीत जास्त दिसतो. चांगल्या गोष्टीच्या प्रभावापेक्षा वाईट गोष्टी लवकर आत्मसात केल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी अवैध मार्गाचां अवलंब करताना दिसून येतात.
भूक लागली असेल आणि अन्न मिळत नसेल तर मनावर नियंत्रण ठेवणे ही प्रवृत्ती आहे. पण भुक लागली असता सुग्रास भोजन जरी समोर असले तरी मनावर ताबा, नियंत्रण असणे ही संस्कृती आहे. त्या क्षणाला विविध सुविचार त्याच्या मनाला स्पर्शून जात असतील तेव्हाच त्याच्या अंगी मर्यादा व सहनशीलता हे गुण निर्माण होत असतात. सहनशीलता व संयम हे जीवनप्रवासातील उच्चतम गुण आहेत. त्यातूनच संवेदनशीलता, त्याग करुणा, नम्रता इत्यादी विविध गुण जन्माला येतात.
या सृष्टीत प्रत्येकालाच मर्यादा दिलेल्या आहेत. तरी पण अमर्याद वागण्याचं प्रमाण वाढत आहे. मानव, मानवाची कृती, निसर्गसृष्टी या सर्वांनाच मर्यादा व करार आहे. या मर्यादेच्या बाहेर जावून चालणार कसे? हवा, पाणी, सूर्य, तारे हे सर्व अमर्याद आहेत. त्याची मर्यादा आपण पाहू शकत नाही. म्हणजेच अमर्याद होऊ शकत नाही. जर आपण अमर्याद झालो तर त्याचे सर्वकश दुष्परिणाम होतात. याचे साधे उदाहरण देता येईल. कष्ट करणार नाही, त्याला अन्न मिळणार नाही, पण कष्ट सुद्धा मर्यादेतच करावे लागेल. “रात्री झोप, दिवसा काम” मानवाच्या नैसर्गिक क्रियांनासुद्धा मर्यादा असतेच
जन्म – मृत्युलाही मर्यादा असतेच. अ ते अः या सर्वांना तसेच क पासून ज्ञ पर्यंतच्या सर्व व्यंजनांना मर्यादा असते. म्हणजेच प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाची मर्यादा ठरलेली असते. (नऊ महिन्यानंतर बाळ जन्माला येतो मृत्यू पावलेल्यांना दीड दिवसाच्या आधीच त्याची अंत्यक्रिया करावी लागते.) या गोष्टीचे आजच्या शैक्षणिक अथांग ज्ञानसागरातील मासारूपी नवोस्फूर्त विद्यार्थ्यांने आकलन केले पाहिजे. चालणे, बोलणे, वागणे, उठणे, बसणे, खाणे, पिणे, झोपणे, या सर्वांनाच मर्यादा आहेत. परंतु शिक्षण क्षेत्र अमर्याद आहे. जेवढं शिकावं तेवढं वाढतच जाते. पण शिक्षण घेणाऱ्याला मर्यादा असते. म्हणजेच जीवनाला मर्यादा आहे.
मर्यादा ही प्रत्येकाच्या जीवनास अनुसरून ठरलेली असते. घर, मोठा वाडा यात त्यांच्या परीने त्यांच्या व्याप्तीची पातळी आखलेली असते. घरातील माणसे, त्यांच्या सुख-सोयी यांचीही पातळी ठरवलेलीच असते. उंच व्यक्ती, ठेंगणे व्यक्ती, जाड, पातळ, व्यक्ती यांच्या त्या त्या परीने मर्यादा असतात. ठेंगण्या माणसाने पायाला काड्या बांधल्या म्हणून त्याच्या ठेंगुपणाची मर्यादा वाढणार नाही. क्षणिक वाढेलही पण त्यात, दम, सौंदर्य, आकर्षकता तृप्ती राहणार नाही. ईच्छा अमर्याद असतात पण या ईच्छा जोपासणाऱ्याला मर्यादा असतात. त्यामुळेच सर्वच ईच्छा पूर्ण होवू शकत नाही. म्हणून प्रत्येकांनीच मर्यादा पाळली पाहिजे. तरच ते आयुष्यात काहीतरी करतील व सुखी होतील.
आज विद्यार्थ्यांत मर्यादा दिसत नाही. त्यांनी विचार करणे आवश्यक आहे की, मी कोण आहे? कुठून आलो? कशासाठी आलो? या जगात, या शाळा, कॉलेजात कशासाठी आलो? मला कुणी पाठवले? का पाठवले? मी काय खावून येतो? माझे कपडे कसे आहेत? मी ज्यांचेमूळे इथे उभा आहे, ते कसे व कोण आहेत? माझं घर कोणत्या परिस्थितीला सामना (तोंड) देत आहे? त्यांच्यासाठी मी काय करायला पाहिजे? आणि हे करीत असतांना मर्यादा का पाळावी आणि कशी? या सर्व गोष्टीचा विचार शाळा-कॉलेजमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी केला तर खरोखर ते समंजस होवून, आपलं जीवन सफल आणि, आईवडिलांचं नाव उज्वल करू शकतील त्याबरोबरच, समाज, गाव, देश व इतर विद्यार्थ्यांना सुद्धा अशा विद्यार्थ्यांचा फायदाच होईल.
विद्या+अर्थी=विद्यार्थी. विद्याधन प्राप्त करणारा तो विद्यार्थी. विद्येला धन म्हटले आहे. तो ग्रहण करणारा विद्यार्थी आणि म्हणूनच “विद्या हे पुरुषास रूप बरवे की, झाकले द्रव्यही” म्हणून शाळा कॉलेजमध्ये शिकत असतांना खऱ्या अर्थाने प्रत्येक विद्यार्थी “विद्यार्थीच” असायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने विद्याधन प्राप्त होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बिकट परिस्थितीशी सामना देऊन खऱ्या अर्थाने विद्यार्जन केले. आणि त्यामुळेच ते जगात सर्वश्रेष्ठ आदर्श विद्यार्थी ठरले. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा “विद्यार्थी दिन” म्हणून पाळला जातो. शेवटच्या श्वासापर्यंत ते विद्यार्थीच राहिलेत. तेवढे जरी जमले नाही तरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शाचा थोडा तरी कण स्वीकारला, तरी विद्यार्थी खऱ्या अर्थाने विद्यार्थीच होवून जीवन कृतार्थ करू शकतो. “विद्या विनयेन शोभते” विद्यार्थी शिकून सद्विचारी असतील तरच त्याला विद्या शोभून दिसेल. आजच जग हे मोहक जग आहे. अनेक मोहित करणारी साधनं निर्माण झालेली आहेत. त्याला बळी न पडता आजच्या विद्यार्थ्यांने चांगले काय? वाईट काय? याचा विचार करून प्रामाणिकतेने विद्यार्जन करायला हवे. त्यासाठी श्रम करून विद्याधन मिळविले पाहिजे. या सृष्टीवर श्रमाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. विद्यार्जन करतांना “शील परं भूषण” हे सुभाषित ध्यानात ठेवून वागले पाहिजे. विद्येला शिलाची अत्यंत आवश्यकता आहे. हे आजच्या विद्यार्थ्यांने उमजायला पाहिजे.
सौ. कोमलकांता बन्सोड से. नि. अध्यापिका, भिवापूर नागपूर, 7447810764