सजीव पृथ्वीवर जन्म घेतो लहानाचा मोठा होतो आणि इथेच स्वतःचे पूर्ण जीवन व्यतीत करतो मग सभोवतालच्या पर्यावरणाची काळजी ही सजीवांनीच घ्यावी लागेल ना… आता शहरीकरण झपाट्याने होत आहे पण पूर्वी मानव हा निसर्गाच्या सानिध्यातच राहायचा. भारताची प्राचीन संस्कृती पाहिली तर वृक्ष, झाडे सदैव पूजनीय ठरलेले आहेत. सर्व महत्त्वाच्या विधींमध्ये समारंभात झाडाची पाने, फुले, फळे बिया यांचाच उपयोग केला जायचा किंबहुना आजही केला जातो. या पृथ्वीवर झाडे आणि प्राणी यांना समान महत्त्व आहे झाडे ही आई-वडिलांसारखी असतात जे आपल्या मुलांना फक्त देत असतात परताव्याच्या शून्य अपेक्षेसह. पण प्राणी विशेषतः मानव स्वतःचे अधिराज्य गाजवतो, स्वतःच्या फायद्यासाठी तो कोणत्याही स्तराला जाऊ शकतो त्याला कशाचीच चहाड राहिली नाही.
आम्ही झाडे कुठेही उगवू शकतो रस्त्याच्या बाजूला, डोंगरावर, बागेत, शेतात, अगदी कुठेही… हे आमच्या हातात नसते जर आमच्या हातात असते तर आम्ही देखील सर्वात सुरक्षित ठिकाण पाहून त्या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व अबाधित राखले असते. फक्त मानवाला काहीही करण्याचे अधिकार आहेत पण आम्हाला फक्त नी फक्त जबाबदाऱ्या पार पाडायचे आहेत, तेही पूर्ण ताकतीने…. कोणी आम्हाला दगडाने देखील मारले, तरीदेखील आम्ही त्याला फळ आणि छायाच देतो. आमच्यापैकी जी झाडे रस्त्यांच्या बाजूला असतात त्यांना सर्वच गोष्टींचा खूप त्रास होत असतो. सर्वात मोठा त्रास म्हणजे प्रदूषण… दिवसभर अंगावर धूळ पडत असते. पानांवर धूळ पडते, झाडे अन्ननिर्मिती करतात ती पानांच्या साह्याने त्यावरच धुळीचा थर साचला की अन्न निर्मितीवर वाईट परिणाम दिसून येतो. कधी-कधी तर मोठी वाहने झाडांवर येऊन आदळतात त्यामुळे आमचे सर्व पाळेमुळे हादरतात किंवा कधी कधी तर आमचा नाहक बळी जातो.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती….
संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांमध्ये मानव आणि वृक्ष यांचे अतूट नाते व वृक्षांचे मानवाच्या जीवनामधील अतुलनीय महत्त्व याचे असे वर्णन केलेले आहे.
आम्ही तुम्हाला अनेक गोष्टी देतो सावली, फळे, फुले, ऑक्सिजन, जमिनीची धूप थांबवणे, कार्बन-डाय-ऑक्साईडचे शोषण करणे. मध्यम आकाराच्या एका वृक्षाचे 50 वर्षातील पर्यावरणीय मूल्य 74 लाख 50 हजार रुपये इतके आहे व तेच मोठ्या झाडाचे मूल्य एक कोटीच्या पलीकडे जाते. काही वेळेस माणसे, मुले येता जाता विनाकारण आमच्या फांद्या, पाने, फुले, फळे तोडतात. लहान झाड असेल तर मुळासकट जमिनीबाहेर काढतात पण तरीही आम्ही हिमालयातील बर्फासारखे थंडच असतो. विविध रंगीबेरंगी, सुगंधी फुले जी आम्ही तुम्हाला देतो ती तयार होण्यासाठी प्रकाशाचा आणि काळोखाचा विशिष्ट कालावधी आवश्यक असतो. रात्रीच्या वेळेस जो काळोखाचा कालावधी आहे त्यात विविध वाहनांचे हेडलाईट आमच्यावर पडतात व या कालावधीमध्ये खंड पडतो, व्यत्यय येतो व फुले तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो किंबहुना काही वेळेस फुले तयारच होत नाहीत.
विविध प्रकल्पांची निर्मिती, शहरीकरण किंवा रस्त्यांचे रुंदीकरण या सबबीखाली आम्ही दहा वर्षाचे असू किंवा शंभर वर्षाचे असू, आमचा समूळ नायनाट करण्यात येतो. यामुळे पर्यावरणाचे किती नुकसान होते, कितीतरी घरटी मोडली जातात, पक्षी सैरभैर होतात. रस्ते, प्रकल्प महत्त्वाचे आहेत पण त्याहीपेक्षा 100 पटीने आम्ही महत्त्वाचे आहोत.
एखादी वस्ती, वास्तु उध्वस्त झाली की तिचे पुनर्वसन केले जाते आणि आजच्या आधुनिक काळात आमचे देखील पुनर्वसन शक्य आहे. एका ठिकाणाहून आमचे स्थलांतर दुसरीकडे केले जाऊ शकते पण ते तर दूरच राहिले आमची राजरोसपणे कत्तल केली जाते आणि याचे परिमार्जन म्हणून देखावा करण्यासाठी दुसरीकडे आमच्या नावाने रोपटी लावली जातात. पण दुर्दैवाने ती जगवली जात नाहीत, ही खूप मोठी खंत आहे. साध्या साध्या गोष्टींच्या मोठ्या – मोठ्या बातम्या तयार होत असतात, राष्ट्रीय स्तरावर सर्वजण चर्चासत्र आयोजित करतात, पण आमची साधी दखल घेतली जात नाही कारण सोपे आहे…… भविष्यात यांना अजून आमची कत्तल करायची संधी मिळावी म्हणून संधी राखून ठेवता यावी म्हणून… तुम्हाला जर चिमण्यांचा चिवचीवाट, पक्ष्यांचे मंजुळ स्वर ऐकायचे असतील तर पिंजऱ्यात पक्षी पाळण्याची गरज नाही तर तुम्ही झाडे लावलात, जगवलात तर आपोआपच तिथे पक्षांचा किलबिलाट सुरू होईल आणि पृथ्वीचे नंदनवन होईल. म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या जीवनात झाडे लावणे आणि जगवणे हे एक अति महत्त्वाचे कर्तव्य बजवावे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रगती तर होतेच आणि ती आधुनिक जीवनाची गरज आहे परंतु पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर निसर्गाचा समतोल राखणे हेच मानवी जीवनाचे मूल्य आहे त्याच्या जीवनातील सर्वात मोठे आव्हान आहे.
ज्योती गणपतराव गादगे, सहशिक्षिका
शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, बोरतळा पाटी, ता. उदगीर
जि. लातूर मो. नं.: 9623510962
शिक्षक ध्येय इंडिया: स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ॲप..
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz