Good Teacher Makes Good School
Good School Makes
Good Students
Good Students Make
Good Citizens
Good Citizens Make
Good Nation
राष्ट्र विकासातील व समाज उभारणीतील शिक्षकाचे महत्व यावरूनच स्पष्ट होते. देशातील भौतिक साधनसंपत्ती म्हणजे देश नव्हे, तर समाजातील सुसंस्कृत, सदप्रवृत्त, सुदृढ जनता म्हणजे देश. सर्वांग परिपूर्ण व्यक्तिमत्व घडविणे हे शिक्षकाचे कार्य.
समाज संरचनेतील एक पायाभूत सामाजिक संस्था म्हणून शिक्षण संस्थेचा विचार केला जातो. शिक्षणाचा उद्देशच ज्ञानरूपी प्रकाशाला प्राप्त करून अज्ञानरूपी अंधाराला दूर करणे हा आहे आणि शिक्षक या प्रक्रियेचा खरा सूत्रधार आहे. तोच हा अज्ञानरुपी अंधकार दूर करून समाजोन्नती करू शकतो.
आज समाजात अस्थिरतेचे, अशांततेचे वातावरण दिसत आहे. भ्रष्टाचार, वशिलेबाजी, अज्ञान, अंधश्रद्धा, परकीय शक्तींचा हस्तक्षेप, जातीयवाद, धार्मिक दंगली अशा एक ना अनेक कारणांनी समाज त्रस्त झालेला आहे. अशा वेळेस आशेचा किरण एकच आहे म्हणजे शिक्षक! शिक्षकात समाज परिवर्तनाचे सामर्थ्य आहे, अपेक्षेनुसार नवी पिढी घडवण्याची ताकद आहे आणि म्हणूनच समाज उभारणीत शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
नव समाज निर्मितीसाठी शैक्षणिक क्रांती घडविणे अत्यंत आवश्यक ठरते. जर या क्रांतीचा उद्देश शिक्षकाच्या मनात आला तर कदाचित भारताचा चेहरामोहरा बदलून जाईल. विज्ञान, तंत्रज्ञान, नैतिक मूल्ये व शिक्षण यांचा प्रखरतेने सृजनात्मक वापर करून शिक्षणातून एक नवा समाज, नवा माणूस निर्माण करण्यासाठी वैचारिक प्रदूषण दूर करून केवळ स्वतःला नव्हे तर संपूर्ण समाज सुखी, समृद्ध, आनंदपूर्ण, सुसंस्कृत करण्यासाठी शिक्षकाने कटिबद्ध असणे आवश्यक आहे.
२१ वे शतक संगणकाचे, वैचारिक क्रांतीचे, अवकाश क्रांतीचे आहे. या क्रांतीला सामोरा जाणारा, त्याची आव्हाने पेलणारा, त्यात आपली पात्रता सिद्ध करणारा विद्यार्थी आवश्यक आहे. अध्यापनातून क्रिया प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना सामर्थ्यशील बनवून वैज्ञानिक क्रांतीसाठी सज्ज करणे ही आणखी आव्हानात्मक भूमिका शिक्षकाला पार पाडायची आहे कारण विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडविणे म्हणजे विज्ञाननिष्ठ समाज घडविणे आणि असे केले तरच समाजातील अंधश्रद्धा, विकृत रुढी परंपरा मुळापासून उपटून काढून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत समाज घडविणे शक्य होईल.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ उपदेशाचे डोस न पाजता त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांना सक्षम बनवावे लागेल.
व्यक्ती म्हणून व समाजाचा एक घटक या नात्याने जीवन सर्वांग सुंदर बनवण्यासाठी शिक्षक शिक्षणाद्वारे व्यक्तीला समर्थ बनवतो. व्यक्तीचा केवळ ज्ञानात्मक विकास न करता सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या अशा अभिरुची, सवयी, छंद, विकसित होणे आवश्यक आहे. त्यानुसार समाजहित साधणारा, सांस्कृतिक विकास झालेला, सेवाभावी वृत्ती असलेला आदर्श नागरिक घडविणे ही मोठी भुमिका शिक्षकाने पार पाडणे आवश्यक आहे.
समाजात ऐक्य राहण्यासाठी समाजातील अपप्रवृत्तीच्या, स्वार्थी, स्वैराचारी व्यक्तींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गुन्हेगारी, भ्रष्टाचार, संकुचितपणा यामुळे समाजाच्या प्रगतीला अडथळा निर्माण होतो. समाज संघटन धोक्यात येते. त्याचे निराकरण करण्यासाठी आवश्यकता समाज प्रबोधनाची, शैक्षणिक प्रबोधनाची आवश्यकता आहे.विविध समस्यांवर शिक्षक प्रबोधन करू शकतो व त्याद्वारे सामाजिक नीतिमूल्ये रुजवून समाज नियंत्रकाची भूमिका पार पाडू शकतो.
काळानुसार जुन्या प्रथा, परंपरांमध्ये बदल करण्याचे पद्धतशीर कार्य शिक्षकच अध्यापनाद्वारे करू शकतो. म्हणजेच समाज परिवर्तनाची महत्त्वाची भूमिका शिक्षक पार पाडू शकतो.
सामाजिक समतेला लोकशाहीत महत्त्वाचे स्थान आहे.
सर्वधर्मसमभाव, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शिक्षण, न्याय, लोकशाही यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे लोकशाही समाज रचनेला पोषक अशी नवी पिढी निर्माण करणे, नवा विज्ञाननिष्ठ व समतेवर आधारलेला समाज घडविणे ही शिक्षकाची आणखी एक महत्त्वाची भूमिका आहे. त्यासाठीच्या नव्या सवयी, नव्या अभिवृत्ति, नवी मूल्ये व नवे आदर्श यांचे संस्कार शिक्षकच करू शकतो.
संस्कृती व संस्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु आज आधुनिकेतला जवळ करीत असताना या मूल्यांचा विसर पडत चाललेला आहे. विद्यार्थी शिकला म्हणजे साक्षर झाला, पण तो सुसंस्कारित होणे ही काळाची गरज आहे.
भावनेपेक्षा पैशाला महत्व, वाढती भोगवृत्ती, महागाई, भ्रष्टाचार, मानसिक असमतोलातून आत्महत्या, एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास इत्यादी कारणामुळे गुन्हेगारी, व्यसनाधीनता, अन्याय, अत्याचार वाढले आहेत या संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी नैतिक शिक्षणाची गरज आहे. मुल्याधिष्टीत, संस्कारक्षम समाज घडविण्याची महत्त्वाची भुमिका शिक्षकाने पार पाडण्याची आवश्यकता आहे. बदलत्या काळानुसार संस्कारांचे स्वरुपही बदलत आहे. मानवता, एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभाव, श्रद्धा, निष्ठा, नम्रता, याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद मूल्यांवर आधारित उत्तम जीवनमान व उत्तम समाज घडविणाऱ्या संस्काराची आज खरी गरज आहे. हा समाज उभारण्यासाठी एक समुपदेशक, मार्गदर्शक म्हणून शिक्षकाचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. राष्ट्र विकास आणि समाज उभारणीत शिक्षक हा खऱ्या अर्थाने एक दीपस्तंभ होता, आहे आणि कायमच राहणार!
तेव्हा शिक्षक मित्रांनो,
चला सक्रियतेने कार्याला लागा
समर्थ व खंबीर बनवा नवपिढीला
आधारस्तंभ ते उद्याचे
मूलाधार वैज्ञानिक क्रांतीचे
करतील समूळ उच्चाटन विविध समस्यांचेहोतील भावी वारसदार सुसंस्कृत समाजाचे..
मिताली महेंद्र तांबे
शिक्षिका
भैरव विद्यालय, घाटकोपर, मुंबई