आज आपल्याला आपल्या पाल्यांप्रति जागरूक होणे आवश्यक झालेले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया, स्मार्टफोन इत्यादींचा बेसुमार अतिरेकी वापर होऊ लागल्याने आज आपली मुले विविध अनैतिक गोष्टीना बळी पडू लागले आहेत. यामुळे आपल्या मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ लागला आहे. मुलांची विचार करण्याची क्षमता कमी होत चालली आहे. विविध ऑनलाइन गेमच्या नादि लागून मुलांनी आपली जीवनयात्रा संपविल्याच्या बातम्या आपण विविध वर्तमानपत्रात वाचत असतो. आज मुले ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली विविध वाईट मार्गाकडे वळत असल्याच्या विविध घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत.
या विविध दुष्परिणामांसाठी आपण पालक कुठेतरी कमी पडत आहोत. आज आपण आपला खाली वेळ आपल्या मुलांसोबत न घालवता मोबाइल मध्ये घालवत असतो याचे अनुकरण आपली मुले करत असतात. यावर आपण आपली सुजाण पालकत्वाची भूमिका पार पाडत असतांना आपला जास्तीत जास्त खाली वेळ आपल्या मुलांसोबत घालवायला हवा. मुलांना विविध मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे. मोबाईल वरील गेम न खेळता विविध खेळांची साहित्य आपल्या मुलांना उपलब्ध करून द्यावी शक्य झाल्यास स्वतः त्यांच्यासोबत खेळ खेळावे. एक जागरूक पालक म्हणून आपण आपल्या मुलांचे मित्र बनून त्यांच्यासोबत गप्पा माराव्या म्हणजे मुले त्यांच्या मनातील विविध शंका किंवा अडचण आपल्याला सांगु शकतील. मुले जेव्हा ऑनलाइन मीडियावर आपला वेळ घालवत असतील तेव्हा आपण स्वतः त्यांना योग्य काय अयोग्य काय यावर मार्गदर्शन करायला हवा. मोबाईल हे आपल्या जीवनातील साध्य नव्हे तर एक साधन आहे हे मुलांच्या मनावर बिंबवायला हवे. मुलांना जेव्हा आपल्या आधाराची गरज वाटेल तेव्हा त्यांना मायेने मिठी मारावी. एकूणच एक सुजाण पालक म्हणून आपण आपल्या मुलांप्रती आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली तर आपल्या पाल्यास आपण नक्कीच देशाचा भावी सुजाण नागरिक नक्कीच तयार करू शकू.
खुशाल किसन डोंगरवार
पंचशील प्राथमिक शाळा, पिंपळगाव कोहळी,
ता. लाखांदूर जि. भंडारा ७५८८७८९९७५