आजची शर्यत: ससा आणि कासवाची
एका जंगलामध्ये ससा आणि कासव असे दोन मित्र राहत होते. ते दोघे एकत्र खेळायचे, फिरायला जायचे. ससा उड्या मारत असे तर कासव संथ गतीने हळू हळू चालत असे. कासवाच्या या हळूहळू चालण्याच्या सवयीला ससा नेहमी चिडवत असत. कासवाला सशाचा खूप राग यायचा पण करणार काय?
एके दिवशी ससा आणि कासव जंगलात फिरायला गेले. ससा कासवाला चिडवू लागला. तू किती रे हळूहळू चालतोस रे.. त्यावर कासवाला राग आला तो रागातच म्हणाला की, तू लई जोरात पळतो असे तुला वाटते का? एकदा माझ्याशी शर्यत लावून बघ.. कोण जिंकते ते?
ससा म्हणाला, हो ! लाव शर्यत.. मीच जिंकणार..
कासव म्हणाले, चल मग.. ते समोरच्या डोंगरावर मोठं आंब्याचे झाड दिसत आहे ना, तिथ जो अगोदर जाईल तो शर्यत जिंकेल.
ससा म्हणाला, चल लाव पैज, मीच तिथे तुझ्या अगोदर पोहचणार!!
दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व प्राणी जमा झाले अन ससा आणि कासवाची शर्यत सुरू झाली. ससा आनंदाने जोरात उड्या मारत मारत धावत होता. इकडे कासव मात्र हळूहळू चालत होते.
थोड्याच वेळात ससा खूप पुढे निघून गेला. पुढे त्याला हिरवगार कोवळं गवत दिसलं. उड्या मारून मारून त्याला भूक लागली होती. त्याने मागे पाहिले तर कासव खूपच दूर होते.
सशाने विचार केला कासव अजून खूप दूर आहे. आपण इथे थोडं गवत खाऊ, पाणी पिऊ आणि थोडा आराम करु.. कासव जवळ आले की परत पळायला सुरुवात करु. ससा झाडाच्या थंडगार सावलीत आराम करत असताना, त्याला कधी झोप लागली हे देखील कळले नाही.
कासव कुठेही न थांबता हळूहळू चालत सशाजवळ आले. ससा झोपलेला पाहून कासव न थांबता पुढे चालतच राहिले आणि ते त्या आंब्याच्या झाडाजवळ पोहचले देखील.
थोड्या वेळाने सशाला जाग आली. त्याने मागे पाहिले तर कासव दिसले नाही. तो झाडाच्या दिशेने उड्या मारत मारत पळत सुटला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कासव तर आंब्याच्या झाडाजवळ अगोदरच पोहचले होते.
अशा प्रकारे कासवाने शर्यत जिंकली होती आणि ससा शर्यत हरला होता.. पहिली शर्यत कासवाने जिंकली होती.
सारांश:
शर्यत मीच जिंकणार, या सश्याच्या अतिआत्मविश्वासामुळे तो कासवासोबत शर्यत हरला म्हणून अति आत्मविश्वास कोणीही बाळगू नये.
तात्पर्य
तुमच्या कोणत्याही कमकुवत प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नका. तुम्ही कोणत्याही कारणामुळे इतरांची कधीही थट्टा करू नये. कधीही हार मानू नका. प्रयत्न नेहमी सुरु ठेवा.
ही कथा आपल्या सर्वांना परिचित आहे, आता या पुढील कथा पाहूया.
शर्यत हरल्यानंतर, ससा निराश होतो, तो आपल्या पराभवाचा विचार करतो आणि त्याला समजते की तो अतिआत्मविश्वासामुळे आपण शर्यत हरलो आहे.
दुसऱ्या दिवशी ससा पुन्हा कासवाला शर्यतीचे लावण्याचे आव्हान देतो. कासव, लगेच हो म्हणतो.
दुसऱ्या दिवशी पुन्हा शर्यत सुरू होते, यावेळी ससा मात्र न थांबता शेवटपर्यंत धावतो आणि दुसऱ्या वेळेस ससा शर्यत जिंकतो.
कासवाने थोडा विचार केला. तो पुन्हा एकदा सशाला नवीन शर्यतीचे आव्हान देतो, परंतु तो म्हणतो, यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवेल. ससा तयार होतो.
पुन्हा तिसऱ्यांदा शर्यत सुरू होते. ससा वेगाने धावतो, पण त्या वाटेने एक मोठी नदी वाहत असते, ससा तिथेच थांबतो कारण त्याला पोहता येत नसते. कासव हळू चालत तिथे पोहोचतो, आरामात नदी पार करतो आणि तिसऱ्या वेळेस कासव शर्यत जिंकतो.
कासव आणि ससा चांगले मित्र होते आणि एकमेकांची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेऊ लागले होते. दोघांनी विचार केला की जर आपण एकमेकांना साथ दिली तर आपण कोणतीही शर्यत सहज जिंकू शकतो.
त्यामुळे दोघांनीही पुन्हा एकदा शेवटची शर्यत लावण्याचा निर्णय घेतला.
शर्यत सुरु झाली तशी ससा कासवाला उचलून वेगाने पळू लागला. दोघे नदीच्या काठावर पोहोचले. आता कासवाने सशाला पाठीवर बसवले आणि दोघांनी आरामात नदी पार केली.
आता पुन्हा एकदा सश्याने कासवाला उचलून अंतिम रेषेकडे धाव घेतली आणि दोघांनी मिळून शर्यत जिंकली होती. दोघेही खूप आनंदी समाधानी दिसत होते. आजची शर्यत जिंकल्याचा आनंद याआधी त्यांना कधीच मिळाला नव्हता..
तात्पर्य:
आयुष्यात कोणालाही कधीच कमी समजू नका. आपण त्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असा अति आत्मविश्वास नेहमी घातक ठरतो. कोणतेही कार्य आपण दोन चार जणांनी मिळून जर केले तर कमी वेळात आणि लवकर ते कार्य पूर्ण होते.. वेळेची बचत होते अन फायदाही सर्वांनाच होतो… शेवटी …
एकमेकां सहाय्य करु.. अवघे धरू सुपंथ..
मधुकर घायदार नाशिक 9623237135