वाचनामुळे माणूस विचार करू लागतो. पुस्तके वाचून आपले आपण जीवन नव्याने जगू शकतो. थोर स्वातंत्र्यसेनानी, उद्योजक, शास्त्रज्ञ, राज्यकर्ते यांची चरित्रे वाचून नवचैतन्य प्राप्त होते. आपण काहीतरी करावे अशी स्फूर्ती मिळते. संत साहित्याने जगण्याची नवी दिशा मिळते. अध्यात्मिक, भक्तीपर ग्रंथ मनःशांती देतात. वाचनामुळे मनुष्य बहुश्रुत होतो. संतांमुळे व्यवहार किंवा जगण्याची एक नवीन शिकवण मिळते. ग्रंथ आपल्याशी हितगूज करतात आणि आपल्या एकटेपणाची जाणीव दूर करतात. आपल्याशी सुखसंवाद साधतात.
चला दोस्तांनो जाऊया
सारे पुस्तकांच्या गावा
घेऊ वाचनाचा आनंद
ग्रंथ साहित्याचा ठेवा
‘ए फ्रेंड इन नीड इस फ्रेंड इंडीड’ या उक्तीप्रमाणे संकटाच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र. मनुष्य एकमेकाला फसवू शकतो. परंतु पुस्तक कधीही फसवू शकत नाही. खोटे ज्ञान देत नाही. मनुष्याचा खरा मित्र ग्रंथ हाच होय. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण अर्थपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतो जसे पोस्टाची तिकिटे जमविणे, जुनी नाणी जमा करणे, चित्रकला, रंगकाम. परंतु वाचन हा छंद असणारी माणसे फार विरळाच. वाचन हा उत्तम छंद आहे. वाचनामुळे मनोरंजना- बरोबरच ज्ञानप्राप्तीही होते. वाचनाने वेळ खूप चांगला जातो. नवनव्या लोकांच्या लिखाणाची, विषयांची ओळख होते. लेखकाला भेटल्याचा आनंद मिळतो. संगणकाच्या युगात हीच पुस्तकेआपणास इंटरनेटवरही वाचायला मिळतात. वाचनाने मानसिक समाधानही मिळते.
इंटरनेटवरही याची माहिती सखोल व सविस्तरपणे मिळते. बालपणीच वाचनाचा छंद लागणे आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात रोज संध्याकाळी आजी आजोबा लहान मुलांना गोष्टी सांगत. घरातील ताई-दादा गोष्टींची पुस्तके वाचून दाखवत. त्यामुळे मुलांना आपोआपच वाचनाची गोडी लागे. वाचनाने ज्ञान वाढण्यास मदत होई. पूर्वीच्या काळी गुरुजी वर्गात येण्यापूर्वी मुले एकसुरात कविता किंवा भाषा विषयांच्या पाठांचे वाचन चालू करत. गुरुजींची तशी सक्त ताकीदच असे. त्यामुळे प्रार्थना होताच मुले धडे वाचायला चालू करत. प्रत्येक जण एकेक पान असे वाचन सुरू करत. असे मोठ्याने वाचन करण्यामुळे उच्चार देखील सुधारत असत. सततच्या वाचनामुळे कविता नि धड्यांचे पाठांतरही होई.
माणूस वाचनामुळेच विचार करू लागतो. पुस्तके वाचून आपले आपण जीवन नव्याने जगू शकतो. थोर स्वातंत्र्यसेनानी, उद्योजक, शास्त्रज्ञ, राज्यकर्ते यांची चरित्रे वाचून नवचैतन्य प्राप्त होते. आपण काहीतरी करावे अशी स्फूर्ती मिळते. संत साहित्याने जगण्याची नवी दिशा मिळते. अध्यात्मिक, भक्तीपर ग्रंथ मनःशांती देतात. वाचनामुळे मनुष्य बहुश्रुत होतो. संतांमुळे व्यवहार किंवा जगण्याची एक नवीन शिकवण मिळते. ग्रंथ आपल्याशी हितगूज करतात. आपण एकटे असलो, आजारी असलो, जवळ कोणी आपली जवळची व्यक्ती नसेल तर हे ग्रंथ आपल्या एकटेपणाची जाणीव दूर करतात. आपल्याशी सुखसंवाद साधतात. सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी आजारपणातच ग्रंथनिर्मिती केली होती. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर हे तुरुंगात असताना ग्रंथ हे त्यांचे सोबती होते. त्यांनी तुरुंगात राहूनच अचाट अशा ग्रंथांची निर्मिती केली. परिस्थितीशी झुंज देण्याची वेळ आली तर माणसाने ग्रंथरूपी सोबत्याची मदत घ्यावी. ग्रंथा सारखा दुसरा सोबती नाही. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामांच्या अभंगगाथा यासारखे ग्रंथ जीवनातील प्रत्येक वळणावर, चढ-उतारावर आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतात. जीवनातील प्रत्येक उपाय कोणत्या ना कोणत्या ग्रंथात आपल्याला पहावयास मिळतात. कधी मन दु:खी असेल तर तत्वज्ञानाचे ग्रंथ मनाला दिलासा देतात. मन आनंदी असेल तर हलक्याफुलक्या कविता नि कथा, कादंबऱ्या वाचताना त्या आनंदाला बहर येतो. विनोदी ग्रंथ मनाची मरगळ घालवायला मोलाची मदत करतात. संसाराला कंटाळून विजनवासात जाणारी मंडळी स्वतः- बरोबर ग्रंथ सोबत म्हणून घेऊन जातात. त्यामागे वेळेसही ग्रंथ हेच सोबती होय हेच कारण असावे.
ग्रंथ आपल्याला गुरुप्रमाणे मार्गदर्शन करतात. कोपर्निकसला त्यांनीच मार्ग दाखवला रस्किनच्या ग्रंथांचे वाचन करताच बॅरिस्टर मोहनदास गांधी यांच्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन झाले आणि त्याच क्षणी त्यांच्यातील महात्म्याचा अवतार उदयास आला. चरक, सुश्रुत यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील ग्रंथ आजच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरले आहेत. थोर व्यक्तींचे चरित्रग्रंथ ध्रुवताऱ्याप्रमाणे मार्गदर्शन करतात, आपणाला योग्य दिशा दाखवतात. हजारो पाकक्रिया, सुरुची, रुचिरा, अन्नपूर्णा यासारखे ग्रंथ गृहिणींना पाककला शिकवतात. खऱ्या सहचारिणी पेक्षा जवळच्या बनतात. एखादी पाकक्रिया बिघडली तरी सख्या हसतात, चेष्टा करतात. परंतु ग्रंथ त्याच्यावर नवीन पर्याय शोधून सांगतात. पु. ल. देशपांडे यांचे पूर्वरंग, अपूर्वाई यासारखे ग्रंथ काकासाहेब कालेलकर, गंगाधर गाडगीळ यांच्यासारख्या प्रवासवर्णनात्मक ग्रंथांच्या सहवासात आपल्याला जगाची सहल घडवते.ग्रंथांना आपण कसेही वागवले तरी ते आपल्याला दूजाभाव देत नाहीत. ते आपल्याला ज्ञानच पुरवत राहतात. चैतन्य, आनंद फुलवतात. म्हणून ग्रंथ हेच आपले खरे सोबती असतात. आणि वाचनाचा छंद आपणास आयुष्यभर आनंदच देऊन जातो.साने गुरूजींनी लिहिलेले ‘श्यामची आई’ पुस्तक वाचून अनेक मुलांच्यावर सुसंस्कार निर्माण झाले आहेत. भरकटलेल्या मनाला पुस्तकेच योग्य दिशा दर्शवतात.मनात जेव्हा औदासिन्य आलं असेल तेव्हा छानशा लेखकाचे पुस्तक वाचायला घेतले की मनावरील सर्व मळभ निघून जाते. मनाला टवटवी मिळते. पुस्तके आपली गुरूही असतात.
वाचूया पुस्तके रोजच
पुस्तक ज्ञानाचा सागर
वाढवू ज्ञानाचे भांडार
भरूया बुद्धीची घागर
प्रवासात हल्ली एकटे असू किंवा ड्रायव्हिंग करत पुस्तके ऐकण्याचे फॅड आले आहे. एकाच वेळी दोन्ही कामं होतात त्यामुळे हल्ली वाचण्यापेक्षा ऑडिओ पुस्तके ऐकणे हे सर्व वाचकांना सुटसुटीत आणि वेळेची बचत झाल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे ऑडिओ पुस्तकांची मागणी खूप वाढत आहे. हल्ली मुलांना किंवा तरुणांना पुस्तके इंटरनेटवर मिळतात. त्यामुळे खरेदी करून पुस्तके घरी आणणे, जमवणे, संग्रही ठेवणे किंवा ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचणे जास्त आवडत नाही. त्यामुळे ग्रंथालयेसुद्धा आता चांगल्या स्थितीत नाहीत. ग्रंथालय नामशेष होऊ पहात आहेत आणि आणि नव्या पिढीचे ही जबाबदारी आहे की त्यांनी नवलेखकांना किंवा कवींना प्रोत्साहन देऊन पुस्तकांचे वाचन करावे. ग्रंथालयात जाऊन पुस्तकांना हाताळावे. आज शाळाशाळांतून सुद्धा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाचण्यासाठी उत्स्फूर्त करावे. दिवसातील अर्धा तास तरी ग्रंथालयात बसुन मनसोक्त वाचनाचा ठेवावा.त्यामुळे मुलांना वाचनाची आपोआपच गोडी लागेल आणि वाचल्यानंतर त्यांना त्याचा आनंद घेता येईल आणि ज्ञानही मिळवता येईल.
इंटरनेटवर सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध झाल्यामुळे पुस्तक प्रिंट करून घेणे हा व्यवसाय आता नामशेष होऊ पहात आहे. कारण ऑनलाइन, डिजिटल पुस्तकांचा जमाना असल्यामुळे युवा पिढी डिजिटल पुस्तक मोबाईल किंवा लॅपटॉप या माध्यमांद्वारे वाचण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे हातातील पुस्तक अवजड बनते.हल्लीच्या पुस्तकांचा दर्जाही खालावला आहे. ई-बुक बनवण्याच्या नावाखाली कोणत्याही दर्जाची पुस्तके पैसे घेऊन बनवली जातात आणि वाचकांना खऱ्या ज्ञानाचा आनंद घेता येत नाही. चुकीचे वाचल्याने मनात गैरसमज पसरत जातात.त्यामुळे आज पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक होऊन बसले आहे. नव्या पिढीला ज्ञानोपासनेसाठी पुस्तके गाठीशी, संग्रही असायलाच हवीत.त्यामुळे शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांना लहानपणापासून पुस्तके आणून वाचनासाठी प्रेरित करावे. त्यामुळे मुले त्यात समरस होऊन जातील आणि त्यांना खऱ्या आनंदापासून पारखे व्हावे लागणार नाही. वाचनामुळे मुलांच्या भविष्याची जडण-घडण देखील चांगल्या रीतीने होईल. जीवन यशस्वी करण्यात पुस्तकांचाच महत्त्वाचा वाटा असतो. पुस्तक वाचणे म्हणजे फक्त मोठमोठे ग्रंथ हातात घेऊन फिरणे असा होत नाही तर मन लावून पुस्तक वाचले त्यातील मतितार्थ समजून घेतला तरच लेखकाला लिहिण्याचे सार्थक झाल्यासारखे वाटते. वाचनाने सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वक्तृत्व सुधारते आणि आपला आत्मविश्वास वाढतो.
करूया दोस्ती ग्रंथांची
समजून घेऊया अर्थ
नसेल संग्रही पुस्तक
जीवन बनेल निरर्थ..
भारती सावंत, मुंबई, 9653445835