आई : संस्काराची खाण

परमेश्वराच्या नंतर जर कोण आहेत ती म्हणजे आई. आईशिवाय जीवन म्हणजे पायलटविना विमान होय.

          कुटुंब ही मुलांची पहिली शाळा आहे तर आई ही त्याची जीवनातील पहिली शिक्षिका. गर्भात असल्यापासून आई आपल्या मुलांवर संस्कार करीत असते. नऊ महीने नऊ दिवस आपल्या गर्भात बाळाला वाढवित असताना अनेक प्रकारचे संस्कार नकळत होत असतात. याची जाणीव कदाचित आईला असतेच असे नाही. पौराणिक महाभारतच्या कथेमध्ये अभिमन्युची गोष्ट सर्वश्रुत आहे. धनुर्धारी अर्जुन आपल्या पत्नीला म्हणजे सुभद्राला चक्रव्यूह कसे भेदायचे आणि परत कसे फिरायचे ही गोष्ट सांगत असतो. त्यावेळी सुभद्रा ही गर्भवती असते. तिच्या पोटात अभिमन्यु वाढत असतो. सुभद्रा सोबत तो सुद्धा ऐकत असतो मात्र अर्धी कथा ऐकून सुभद्रा झोपी जाते. त्यामुळे अभिमन्युला चक्रव्यूह बाबत अर्धी माहिती मिळते. युद्धाच्या प्रसंगी तो चक्रव्यूह तोडून मध्ये जातो पण बाहेर पडता येत नाही. ही एक कथा म्हणून पाहिली  तर लक्षात येईल की, पुरातन काळापासून गर्भसंस्कार खुप महत्वाचे आहे असे सांगण्यात येत आहे. मुलांवर संस्कार टाकण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही आईवर असते. आईचे वर्तन जसे असेल त्याच प्रकारचे वर्तन मुलांचे असते हे आईंनी विसरून चालणार नाही. मुलांना शिकविण्याचे फार कठिण आणि मोठे काम आईं करते. मूल अगदी लहान असताना त्याला चालणे बोलणे शिकविण्याचे काम आईं करीत असते. त्यासाठी तिला काही पैसे किंवा वेतन मिळते का ? नाही. तिला यातून जे मानसिक समाधान मिळते ते कशातून देखील मिळत नाही. पण आपल्या मुलांना अधिक संस्कारी आणि यशस्वी पुरुष करायचे असेल तर काही गोष्टी मातानी जाणीवपूर्वक करायला हवे असे वाटते. लहान मूल जास्तीत जास्त वेळ कुटुंबातील आपल्या आईंसोबत व्यतीत करीत असते. त्यामुळे आईंच्या वर्तणुकीचे चांगले वाईट परिणाम मुलांवर होत असतात.

टीपकागदप्रमाणे ते प्रत्येक कृतीचे जशास तसे अनुकरण करतात. माझी आईं कशी वागते याचे सूक्ष्म निरिक्षण ते करतात याची प्रचिती घ्यायची असेल तर मुलांची कृती कधी तरी लपूनछपुन बघावे. नक्की आपणास कळेल की, मूल आपली नक्कल कशी करतो ? म्हणून आईंची जबाबदारी सर्वात मोठी आहे असे म्हटले जाते. शिकलेली आईं घरादाराला पुढे नेई असे बोलल्या जाते त्यामागे हाच अर्थ लपलेला असेल, नाही का? राजमाता जिजाऊ यांनी राजे शिवाजी यांना लहानपणी रामायण आणि महाभारतामधील गोष्टी सांगून स्फुर्ती निर्माण केल्या म्हणून तर राजे शिवाजी मुगल लोकाविरुद्ध उभे राहिले. आईंच्या संस्कारामुळे राजे शिवाजी घडले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना घडविण्यात त्यांची आई आशियाम्माचा सिंहाचा वाटा आहे.

कुटुंबाच्या सोई सुविधा पूर्ण करण्यात आज आईला स्वतः कडे पाहण्यासाठी वेळच मिळत नाही तर ते आपल्या मुलांसाठी कधी वेळ काढतील हा एक मोठा प्रश्न आहे. पुस्तक वाचन करण्याचा छंद असो किंवा साहित्य निर्मिती करण्याचा त्यातून आत्मिक समाधान मिळते. आपला छंद आपल्या मुलांसाठी प्रेरणा ठरू शकते.

जगात एकच न्यायालय आहे ज्याठिकाणी सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आई. परमेश्वराच्या नंतर जर कोण आहेत ती म्हणजे आई. आईशिवाय जीवन म्हणजे पायलटविना विमान होय ते विमान कोणत्या दिशेला जाईल आणि कुठे पडेल याचा नेम नसतो. अगदी तसेच आईविना मूल कोणत्या संस्काराने वाढेल यात शंकाच आहे. एवढ्या दिव्य संकटातून एखादे मूल संस्कारी निघू शकते पण खात्रीलायक सांगता येणार नाही. आईने रोजच्या जगण्यात काही गोष्टी जाणीवपूर्वक चांगले करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा निश्चित असा फायदा होतो. महिलाना टीव्हीवरील सीरियल पाहण्याचा खुप छंद असतो. एखाद्या दिवशी सीरियल पाहण्याचे राहून गेल्यास त्याचे त्यांना खुप दुःख होते. मात्र या टीव्ही पाहण्याचा अप्रत्यक्ष परिणाम घरातील मुलांवर होतो याचा कोणतीही महिला म्हणजे आई विचार करताना दिसत नाही. लहानपणी मुलांना करमणुक म्हणून आपण सर्वचजण या टीव्हीचा आधार घेतो. हीच टीव्ही नंतर आपल्या मुलांचा चांगला मित्र बनतो त्याला त्यापासून दूर करणे खुप अवघड जाते. त्यामुळे या सवयी मुलांना लागणार नाहीत याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी महिलानी म्हणजे आईंनी सर्वप्रथम टीव्ही पाहण्याचा मोह टाळावे. मुले सुद्धा आपोआप यापासून दूर होतील.

लहान मुले जेवताना खुप किरकिर करतात अशी नेहमी तक्रार ऐकायला मिळते. याची सोडवणूक देखील आईंला करता येऊ शकते. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपी जाईपर्यंत आईं आपल्या जेवण्यात काय घेते तेच मुले स्विकार करतात. म्हणून आईंनी आपल्या जेवण्यात सर्व प्रकारच्या आहारांचा समावेश करावा म्हणजे मुले देखील त्याकडे आकृष्ट होतात. सकाळच्या वेळी चहा पिण्याची आपली सवय मुलांना नकळत लागते. चहा पिऊ नका असे कितीही ओरडुन सांगितले तरी त्यांच्यावर काही फरक पडत नाही. त्यासाठी सर्वप्रथम आपण चहा पिणे टाळावे लागेल. लहानपणी मुलाना सर्व प्रसंगाचे अनुभव देणे आवश्यक आहे. आपले याच ठिकाणी चुकत असते. आपण मुलांना स्वातंत्र्य देत नाही. त्याच्या मनासारखे काहीच करू देत नाही. जास्तीत जास्त वेळा हे करू नको, तिकडे जाऊ नको असे नना चा पाढा वाचतो. मुलांना त्याच नको म्हणलेल्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता वाढत राहते. त्याऐवजी धोक्याच्या ठिकाणी किंवा खेळताना आपली सोबत राहिली तर मुलांना देखील संरक्षण मिळेल आणि मनसोक्त खेळेल. लहान मुले जेवढे खेळतील तेवढे त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक असते. घरात बसून टीव्ही पाहणे किंवा मोबाईल वर गेम खेळण्यापेक्षा मैदानावर उडया मारलेले केव्हाही चांगलेच नव्हे काय? मुलांना मैदानी खेळ खेळवावे. लहान मुलांचे ज्ञानेंद्रिय घरातच तयार व्ह्ययला पाहिंजे अशी प्रत्येक कृती आपल्या कडून होणे आवश्यक आहे. श्रवण प्रक्रिया मुलांची विकसित झाली नाही तर त्यास त्या पुढील भाषा विकासाची कौशल्य विकसित होत नाही. हे शास्त्रीय कारण प्रत्येक मातानी समजून घ्यावे. त्यासाठी मुलांना गाणी आणि गोष्टी सांगाव्यात, त्याच्यासोबत गप्पा मारावे. त्यामुळे मुले काय ऐकतात व बोलतात हे कळते. कान तयार करण्यासाठी वेगवेगळे आवाज आणि ध्वनी ऐकविणे मुलांच्या भाषा विकासासाठी आवश्यक आहे. ज्या आईं आपल्या मुलांकडे जागरूक होऊन लक्ष देतात त्यांची मुले भविष्यात प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी करतात. म्हणूनच आईला संस्काराची खाण असे म्हटले जाते.

नागोराव सा. येवतीकर,

जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा धर्माबाद

ता. धर्माबाद जि. नांदेड मोबा. 9423625769

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button