भारताची लोकसंख्या 1३० कोटी असून यातील 48 टक्के लोकसंख्या 25 वयोगटाच्या खाली आहे. या वयोगटातील व्यक्ती आपल्या सुंदरतेप्रती अधिक लक्ष देतात. आज प्रत्येक महिला आपल्या सौंदर्याप्रती जागरूक झालेली आहेत. यामुळेच ब्युटी पार्लर या क्षेत्रात अनेक नवनवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. भारतात ब्युटी इंडस्ट्री या व्यवसायात दरवर्षी तीस टक्क्यांनी वाढ होत आहे. संपूर्ण जगात भारत या व्यवसायात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजही अनेक ब्युटीशियन भारतात प्रशिक्षण घेऊन विदेशात यशस्वीपणे व्यवसाय करीत आहे. भारतातील प्रशिक्षित ब्युटीशियनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. 2021 पर्यंत ब्युटी इंडस्ट्री दोन लाख करोड पर्यंतचा व्यवसाय करू शकते. ब्युटी इंडस्ट्री पुढील पाच वर्षात तिप्पट होईल असा अंदाज एफआयसीसीआय या संस्थेने वर्तविला आहे. ब्युटीशियन व्यवसायातले आधुनिक तंत्रज्ञान युवतींना आत्मसात व्हावे म्हणून आज सरकारी तसेच खासगी संस्थेत विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
शासकीय आयटीआयमध्ये इयत्ता दहावीनंतर बेसिक कॉस्मेटोलॉजी हा एक वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. खासगी संस्थेत तीन महिन्यापासून ते चार वर्षापर्यंतचे विविध अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. पर्ल अकादमी, शहनाझ हुसेन ब्युटी अकादमी, लक्मे अकादमी, व्हीएलसीसी, जुडी ब्युटी अकादमी, आयएसएएस इंटरनेशनल ब्युटी स्कूल आदी संस्था ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देतात. या अभ्यासक्रमांतर्गत फेशियल, मेनिक्युअर, पेडीक्युअर, व्हॅक्सिंग, थ्रेडिंग, ब्लिचिंग, मेकअप, स्क्रीन ट्रीटमेंट, आधुनिक हेअर केअर मध्ये हेअर कटिंग, हेअरस्टाईल, हेअर कलरिंग, हेअर लाईटनिंग, हेअर स्पा, हेअर ट्रेटनिंग, हेअर कर्लिंग, हेअर प्रेसिंग विशेष फेशियल, बायोलीफ्ट फेशियल, पॅसाफिल, अक्ने, ओलेजन, अरोमा थेरपी, विधुत प्रवाह आणि गोल्ड फेशियल, मेनिक्युअरमध्ये रेग्युलर, फेंच, स्पा, पॅराफिन, हॉट स्टोन, लक्झरी, ब्राझिलियन, युरोपियन, हॉट ऑईल व इलेक्ट्रीक मेनिक्युअर, मेकअपमध्ये डे, नाईट, करेकटीव्ह, ब्राईडल मेकअप आदींचे प्रशिक्षण दिले जाते.
विविध सौदर्य प्रसाधने व त्यांचे उपयोग, मेकअपचे प्रकार, महत्त्व, त्यासाठी लागणारी साधने, उपकरणे, साहित्य जसे मेकअप ब्रश, फौंडेशन ब्रश, कन्सिलर, ब्लशर, आय लायनर, स्मजर, लिप ब्रश, क्लिन्झर, टोनर, मॉईश्चरायझर, कॉम्पट पावडर, काजळ, मस्कारा, आई ब्रो पेन्सिल, लिप लायनर, लिपस्टिक, लिप ग्लॉस, आई शडो आदींचा वापर कसा करावा, विविध प्रकारचे व्यायाम, संतुलित आहार, शरीर व वजन व्यवस्थापन, आयुर्वेद आदींचे प्रशिक्षण दिले जाते.
ब्युटी क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सौंदर्य उत्पादक, ब्युटीशियन, हेल्थ स्पा, सौंदर्य सल्लागार, सौंदर्य उपचार तज्ञ, मेकअप आर्टिस्ट, इलेक्ट्रोलॉजिस्ट, जेल टेक्निशियन, मसाज थेरीपीस्ट, स्टाईल हेअर ड्रेसर, मेनिक्युअरिस्ट, पेडीक्युअरिस्ट, अरोमाथेरपीस्ट, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सलून व्यवस्थापन, ब्युटी प्रशिक्षिका आदि अनेक प्रकारचे व्यवसाय तसेच नोकरीचे द्वारे खुले होतात.
ब्युटीशियनचे काम सौंदर्य खुलविणे हे आहे. ब्युटी पार्लर साठी स्वत:चे दुकान असल्यास पन्नास हजार रुपयात ब्युटी पार्लर सुरु करू शकतो. या व्यवसायातून दहा ते पंधरा हजार रुपये प्रती महिना कमवू शकतो. दोन ते तीन लाख रुपये भांडवलातून ब्युटी पार्लर व्यवसाय सुरु केल्यास तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता, संवाद कौशल्य, व्यवसायाची आवड आदींच्या जोरावर या व्यवसायातून त्यातून वीस ते नव्वद हजार रुपये प्रती महिना कमाई होऊ शकते. आज गावोगावी अन गल्लोगल्ली ब्युटी पार्लर सुरु झालेले आपण पाहतो, असे असतांना या संधीचे सोने करायलाच हवे, नाही का?
मधुकर घायदार, नाशिक 9623237135