व्यवसाय शिक्षण: ब्युटी आणि वेलनेस

सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील 800+ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण दिले जात आहे. यात प्रामुख्याने ब्युटी आणि वेलनेस, ऑटोमोबाईल सर्विस टेक्निशियन, रिटेल, हेल्थकेअर, मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, स्पोर्ट्स, मिडिया आणि एटरटेंटमेंट, ट्रॅव्हल्स आणि टुरिझम, अॅग्रीकल्चर, बँकिंग आणि फायनान्स हे दहा अभ्यासक्रम शिकविले जातात. यात 70 गुणांचे प्रात्यक्षिक व 30 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.  

आज आपण ब्युटी आणि वेलनेस अभ्यासक्रमाविषयी अधिक जाणून घेऊ या.

आज महिला असो वा पुरुष दोन्हीही आपल्या सौंदर्याप्रती जागरूक झालेले आहेत. यामुळेच ब्युटी आणि वेलनेस या क्षेत्रात अनेक नवनवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. भारतात ब्युटी आणि वेलनेस या व्यवसायात दरवर्षी वीस टक्क्यांनी वाढ होत आहे. या व्यवसायात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजही अनेक ब्युटीशियन भारतात प्रशिक्षण घेऊन विदेशात यशस्वीपणे व्यवसाय करीत आहे. भारतातील प्रशिक्षित ब्युटीशियनची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.  ब्युटीशियन व्यवसायातले आधुनिक तंत्रज्ञान युवतींना आत्मसात व्हावे म्हणून माध्यमिक शाळेतच विद्यार्थिनीना ब्युटीशियनचे प्रशिक्षण दिले जात आहे.

ब्युटी आणि वेलनेस या अभ्यासक्रमांतर्गत फेशियल, मेनिक्युअर, पेडीक्युअर, व्हॅक्सिंग, थ्रेडिंग, ब्लिचिंग, मेकअप, स्क्रीन ट्रीटमेंट, आधुनिक हेअर केअर मध्ये हेअर कटिंग, हेअरस्टाईल, हेअर कलरिंग, हेअर लाईटनिंग, हेअर स्पा, हेअर ट्रेटनिंग, हेअर कर्लिंग, हेअर प्रेसिंग आदींचे प्रशिक्षण दिले जाते.

विशेष फेशियल, बायोलीफ्ट फेशियल, पॅसाफिल, अक्ने, ओलेजन, अरोमा थेरपी, विधुत प्रवाह आणि गोल्ड फेशियलचे प्रशिक्षण दिले जाते.

मेनिक्युअरमध्ये रेग्युलर, फेंच, स्पा, पॅराफिन, हॉट स्टोन, लक्झरी, ब्राझिलियन, युरोपियन, हॉट ऑईल व इलेक्ट्रीक मेनिक्युअरचे प्रशिक्षण दिले जाते.

  पेडीक्युअरमध्ये रेग्युलर, स्पा, पॅराफिन, स्टोन, फ्रेंच, मिनी, साल्ट, फिश, इलेक्ट्रीक मेनिक्युअरचे प्रशिक्षण दिले जाते.

मेकअपमध्ये डे, नाईट, करेकटीव्ह, ब्राईडल मेकअपचे प्रशिक्षण दिले जाते. त्वचाचे प्रकार, त्वचाची काळजी कशी घ्यावी, चेहऱ्यावर मुरूम होण्याची कारणे, प्रकार, उपचार व लक्षणे आदि शिकविले जाते.

विविध सौदर्य प्रसाधने व त्यांचे उपयोग, मेकअपचे प्रकार, महत्त्व, त्यासाठी लागणारी साधने, उपकरणे, साहित्य जसे मेकअप ब्रश, फौंडेशन ब्रश, कन्सिलर, ब्लशर, आय लायनर, स्मजर, लिप ब्रश, क्लिन्झर, टोनर, मॉईश्चरायझर, कॉम्पट पावडर, काजळ, मस्कारा, आई ब्रो पेन्सिल, लिप लायनर, लिपस्टिक, लिप ग्लॉस, आई शडो आदींचा वापर कसा करावा, विविध प्रकारचे व्यायाम, संतुलित आहार, शरीर व वजन व्यवस्थापन, आयुर्वेद आदींचे प्रशिक्षण दिले जाते.

ब्युटी आणि वेलनेसचे चार वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी  आयटीआयमध्ये २५ टक्के आणि तंत्रनिकेतनमध्ये १५ टक्के आरक्षणही ठेवण्यात आले आहे, तसेच सौंदर्य उत्पादक, ब्युटीशियन, हेल्थ स्पा, सौंदर्य सल्लागार, सौंदर्य उपचार तज्ञ, मेकअप आर्टिस्ट, इलेक्ट्रोलॉजिस्ट, जेल टेक्निशियन, मसाज थेरीपीस्ट, स्टाईल हेअर ड्रेसर, मेनिक्युअरिस्ट, पेडीक्युअरिस्ट, अरोमाथेरपीस्ट, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सलून व्यवस्थापन, ब्युटी प्रशिक्षिका आदि अनेक प्रकारचे व्यवसाय तसेच नोकरीचे द्वारे खुले होतात.

ब्युटीशियनचे काम सौंदर्य खुलविणे हे आहे. ब्युटी पार्लर साठी स्वत:चे दुकान असल्यास पन्नास हजार रुपयात ब्युटी पार्लर सुरु करू शकतो. या व्यवसायातून दहा ते पंधरा हजार रुपये प्रती महिना कमवू शकतो. दोन ते तीन लाख रुपये भांडवलातून ब्युटी पार्लर व्यवसाय सुरु केल्यास त्यातून वीस ते तीस हजार रुपये प्रती महिना कमाई होऊ शकते. आज गावोगावी अन गल्लोगल्ली ब्युटी पार्लर सुरु झालेले आपण पाहतो, असे असतांना या संधीचे सोने करायलाच हवे, नाही का?

प्रशिक्षिका राजश्री कोष्टी, शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button