
आज अनेकदा शैक्षणिक अपयशाचे खापर शिक्षकांवर फोडले जाते. निकाल कमी आले, तर शिक्षक निष्क्रिय आहेत, विद्यार्थ्यांची प्रगती नाही, म्हणजे शिक्षकांना दोष. अशी एक सरधोपट मानसिकता तयार झाली आहे. हा दृष्टिकोन चुकीचा आहे. प्रत्येक शिक्षक आपल्यापरीने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. शिक्षण हे एकत्रित प्रयत्नांची प्रक्रिया आहे. इथे दोष देणं नव्हे, तर सहकार्य हे महत्वाचं आहे.
शिक्षण हा समाजाच्या उन्नतीचा पाया आहे. शिक्षणाद्वारे व्यक्तीच्या विचारसरणीला, आचारविचारांना, आणि व्यवहाराला दिशा मिळते. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अत्यंत महत्त्वाची असते पण यासाठी जबाबदार कोण? फक्त शिक्षक की पालक, समाज, शासन, शैक्षणिक संस्था आणि स्वतः विद्यार्थी सुद्धा ही विचार करायला लावणारी योग्य अशी व्यापक व महत्वाची बाब आहे.
शिक्षक हे शिक्षणाच्या व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचे स्तंभ असतात. ते केवळ ज्ञानदाते नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि व्यक्तिमत्त्व घडवणारे असतात. शिक्षकाचे कार्य केवळ पुस्तकातील ज्ञान देणे इतके मर्यादित नसते ते विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात, त्यांच्या जिज्ञासेला खतपाणी घालतात आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतेची वाढ करतात. शिक्षक वर्गात शिस्त निर्माण करतात, वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण देतात, मूल्यशिक्षण देतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्यांच्यावर लक्ष केंद्रित करतात.
तरीही शिक्षकांची भूमिका “प्राथमिक आणि सशक्त” असली, तरीही ती “एकमेव आणि संपूर्ण” जबाबदारी नाही.
विद्यार्थ्याची सुद्धा अभ्यास करने ही स्वतःची जबाबदारी असते.
विद्यार्थी हा शैक्षणिक प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो. कोणत्याही ज्ञानप्रक्रियेचा परिणाम हा विद्यार्थ्याच्या सहभागावर अवलंबून असतो. शिक्षकांनी कितीही उत्कृष्ट अध्यापन केले, तरी जर विद्यार्थीच उदासीन असेल, तर त्या शिक्षणाचा लाभ मर्यादित राहतो. शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्याची चिकाटी, आत्मप्रेरणा, अभ्यासाची सवय, वेळेचे नियोजन आणि जिज्ञासा महत्त्वाची असते.
जसे डॉक्टर औषध देतो, पण रुग्णाने ती वेळेवर घेतली पाहिजे; तसेच शिक्षक शिकवतो, पण विद्यार्थ्याने ती समजून घेतली पाहिजे, ती आचरणात आणली पाहिजे. अभ्यासासाठी जबाबदारी घेणे, अडचणी मान्य करणे, आणि प्रगतीसाठी प्रयत्न करणे ही स्वतः विद्यार्थ्याची प्राथमिक भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बाबत पालकांची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची आहे.
पालक हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील पहिले शिक्षक असतात. त्यांची सवयी, मूल्ये, अभ्यासविषयक दृष्टिकोन आणि प्रेरणा यावर पालकांचा मोठा प्रभाव असतो. शिक्षण ही केवळ शाळेतील गोष्ट नाही, तर ती घरातही सुरु असते. घरातील वातावरण, संवाद, आधार, शिस्त व प्रोत्साहन यांचा विद्यार्थ्याच्या प्रगतीवर मोठा परिणाम होतो.
कधीकधी पालक केवळ शिक्षकांवरच संपूर्ण जबाबदारी टाकतात आणि स्वतः काहीही सहभाग घेत नाहीत. ही वृत्ती चुकीची आहे. पालकांनी नियमित संवाद साधावा, अभ्यासाची सवय लावावी, डिजिटल व्यत्यय टाळावा आणि भावनिक आधार द्यावा.

समाजाची भूमिका सुद्धा विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी महत्त्वाची आहे. विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व समाजात घडते. समाजातील मूल्यव्यवस्था, वातावरण, सामाजिक असमानता, दारिद्र्य, गुन्हेगारी, माध्यमांचा प्रभाव, सोशल मीडियाचे आक्रमण या सगळ्याचा शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होतो. जर समाजात सकारात्मकता असेल, शैक्षणिक गरजांची जाण असेल, तर विद्यार्थी प्रोत्साहित होतो.
शाळेबाहेरील ट्यूशन संस्कृती, आकर्षक परंतु दिशाहीन करिअरचे मार्गदर्शन, स्पर्धात्मक दडपण यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो. समाजाने शिक्षणाकडे ‘गंभीर आणि सकारात्मक’ दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. वरील घटका सोबत शासन व शैक्षणिक संस्थांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे.
शैक्षणिक धोरणे, अभ्यासक्रम, परीक्षा प्रणाली, शिक्षकांचे प्रशिक्षण, शाळेतील मूलभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, अभ्यासाचा भार, आणि मूल्याधारित शिक्षण या सर्व बाबी सरकारच्या व शैक्षणिक संस्थांच्या नियोजनावर अवलंबून असतात.
जर शाळेतच पायाभूत सुविधा नसेल, शिक्षणसामग्री अपुरी असेल, शिक्षकांची कमतरता असेल, तर शिक्षक कितीही इच्छाशक्तीने शिकवत असले, तरी विद्यार्थ्याची प्रगती अडथळ्यात येते. सरकारने शिक्षकांचे सक्षमीकरण करणे, अभ्यासक्रमातील सुसंगती ठेवणे आणि शिक्षणाची व्याप्ती वाढवणे ही मूलभूत जबाबदारी आहे.
विद्यार्थ्यांना आधुनिक काळातील नव्या आव्हानांची ओळख व्हायला हवी. यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रगती मध्ये फरक पडतो.
आज शिक्षण क्षेत्र अनेक आव्हानांचा सामना करत आहे. डिजिटायझेशन, ऑनलाईन शिक्षण, वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम, मानसिक आरोग्याचे प्रश्न, सोशल मीडियाचा प्रभाव, तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे झालेली एकाग्रतेची कमतरता इ. अशा काळात शिक्षकांची भूमिका आणखी गुंतागुंतीची झाली आहे. शिक्षक फक्त ज्ञानदाते न राहता समुपदेशक, मार्गदर्शक, तंत्रशिक्षक आणि भावनिक आधारदाते बनले आहेत. तरीही, या सगळ्या बदलांमध्ये इतर घटक, विशेषतः पालक आणि शासन, यांची भूमिका अजूनच निर्णायक झाली आहे. शिक्षकांना वेळोवेळी आवश्यक ते साधनसामग्री, प्रशिक्षण आणि पाठिंबा मिळत नसेल, तर ते योग्य रीतीने आपली भूमिका पार पाडू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत सर्व स्तरातून शिक्षकांवर दोषारोप करने योग्य नाही.
आज अनेकदा शैक्षणिक अपयशाचे खापर शिक्षकांवर फोडले जाते. निकाल कमी आले, तर शिक्षक निष्क्रिय आहेत, विद्यार्थ्यांची प्रगती नाही, म्हणजे शिक्षकांना दोष. अशी एक सरधोपट मानसिकता तयार झाली आहे. हा दृष्टिकोन चुकीचा आहे. प्रत्येक शिक्षक आपल्यापरीने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. शिक्षण हे एकत्रित प्रयत्नांची प्रक्रिया आहे. इथे दोष देणं नव्हे, तर सहकार्य हे महत्वाचं आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिक्षकांचा वाटा निश्चितच फार मोठा आहे, परंतु तो एकमेव नाही. शिक्षक म्हणजे एक दीपस्तंभ असतो मार्ग दाखवणारा पण मार्गावर चालण्याची इच्छाशक्ती विद्यार्थ्याची असावी लागते, आधार देणारे पालक हवेत, रस्ता तयार करणारी संस्था हवी आणि प्रवास समजून घेणारा समाज हवा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत जबाबदारी ही सामूहिक आहे. शिक्षक हे या प्रक्रियेचे मध्यवर्ती बिंदू असले, तरी त्यांच्या भोवती पालक, विद्यार्थी, शासन, समाज व संस्थांचा परिपूर्ण सहभाग लागतो. त्यामुळे केवळ शिक्षकांवर जबाबदारी टाकणे अन्यायकारक ठरेल. शिक्षण ही एकत्रित प्रयत्नांची, सहकार्याची आणि सकारात्मक दृष्टीकोनाची प्रक्रिया आहे, हे लक्षात घेणे सर्वांचे कर्तव्य आहे.
कु. लता गणवीर
दर्यापूर, अमरावती 7028639409