राज्यातील ७५ विद्यार्थ्यांना बालदिनी ‘बालचित्रकार पुरस्कार’ जाहीर

शिक्षकांचे व्यासपीठ साप्ताहिक शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२५’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता.
या स्पर्धेसाठी श्री. देविदास शिवराम हिरे, कला शिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड, जि. नाशिक आणि श्री. अमित सुभाष भोरकडे, जि. प. शाळा, आसबेवाडी (मारापूर), ता. मंगळवेढा, जि. सोलापूर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे शिक्षक ध्येयचे संपूर्ण संपादक मंडळाने अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी); ब गट (इयत्ता सहावी ते दहावी); क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)
अ, ब आणि क गटातील एकूण ७५ उत्कृष्ठ बाल चित्रकारांना दिल्या जाणाऱ्या पारितोषिकांमध्ये सन्मानचिन्ह आणि प्रिंट सन्मानपत्र यांचा समावेश आहे.
तसेच या स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र आणि शिक्षक ध्येयचे डिजिटल अंक व्हाट्सअॅप नंबरवर पाठविण्यात येईल.
विजेत्यांमध्ये अ गटात… पुढे संपूर्ण विजेत्यांची नावे वाचण्यासाठी….
संपादकीय…
शाळेत चित्रकलेस दुय्यम स्थान
पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव व प्रयोगातून प्रत्येक विद्यार्थी शिकत असतो. प्रयोगातून घेतलेले शिक्षण चिरकाल स्मरणात राहते तसेच यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळून त्यांच्यातील जीवनकौशल्यांचा विकास होण्यास मदत होते. यातूनच नवीन कल्पक, उद्योजक, कलाकार घडण्यास मदत होते. विद्यार्थ्यांमधील कलागुण व सर्जनशीलतेला वाव मिळतो. प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होऊन कसे चालेल?
शाळेतील कार्यानुभव, चित्रकला, हस्तकला, पर्यावरण, शारीरिक शिक्षण, स्व:विकास, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसाय शिक्षण हे खरे तर विद्यार्थ्यांमधील कलाकाराला साद घालणारे विषय आहेत. हे सर्व विषय व्यवस्थित शिकविले गेल्यास अनेक उद्योजक, कलाकार तयार होतील पण खरच आजकाल हे विषय शाळेत प्रभावीपणे शिकविले जातात का?
शाळा ही फक्त परीक्षार्थी बनवायची इमारत नसून विद्यार्थ्यांच्या पंखामध्ये बळ देण्याचे काम ती करीत असते. आजही विद्यार्थ्यांना चित्रकला, कार्यानुभव आदी तास आवडतात पण दुर्दैव असे की एकतर या विषयांना शिक्षकच नसतात त्यामुळे या तासांना गणित, इंग्रजी, विज्ञानाचा तास घेतला जातो.
माती, रंग, कागद, कात्री, डिंक, पेन्सिल आदी साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या कलात्मक वस्तू म्हणजे हस्तकला. आजकाल शाळेत विविध प्रकारचे प्रकल्प, प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी स्वत: तयार करावे असे अपेक्षित असते पण असे घडते का? एकतर घरी ‘पालक’ ते स्वत: तयार करून देतात किंवा बाजारातून रेडीमेड विकत आणले जातात, हे वास्तव आहे. एवढेच काय इंजिनिअरींगचे प्रोजेक्टही रेडीमेड विकत घेऊन सबमिट केले जातात, असे केल्याने आपले पाल्य खरच कलाकार, उद्योजक होतील?
खेदाने नमूद करावेसे वाटते की, आजही शाळांमध्ये चित्रकला, स्व:विकास, व्यक्तिमत्त्व विकास, हस्तकला, कार्यानुभव, व्यवसाय शिक्षण इत्यादी विषयांना दुय्यम स्थान दिले जाते…?