मिरगातल्या पावसाचे आगमन चक्रीवादळं, ढगांचा गडगडाट अन् विजांचा कडकडाटाने होई. संपूर्ण आसमंत लख्ख प्रकाशाने उजळून निघायचे.
मृगसरी कोसळल्याने मातीचा सुगंध चहूदिशेला दरवडत असे. बळीराजाही सुखावला जायचा. आपल्या वावरात पिकपेरणी करण्यासाठी त्याची लगबग सुरू होई.
त्या मिरगातच १३ जून रोजी आमच्या शाळा सुरू व्हायच्या.
शाळेत जाण्याकरिता चेहऱ्यावर आनंद लकाकत असे. घरात अठरा विश्व दारिद्र्य मागून-पुढून फुगड्या घालीत. माय अन् बा ला दुसऱ्यांच्या शेतात मोलमजूरीसाठी जावावे लागत; म्हणून माय पहाटे लवकर उठून चुलीवर भाकऱ्या थापायची. कामावर जातांना मला मात्र शाळेत जाण्याविषयी सूचना देऊन जात असायचीच.
मीही केसांना घरातील गोडेतेल चोपडून केस व्यवस्थित करत तयारी करायचो. शाळेचा गणवेश हा पांढरा शर्ट व खाकी रंगाची चड्डी असा होता.
मळकट शर्ट व चड्डीला ढुंगणावर दोन भोकांना ठिगळ असायचीच. पाहणांऱ्या चक्षूतून जणू क्लोजअप फोटू निघायचा. तशीच चड्डीवर करगोटा वर करून शाळेत निघायचो. तेव्हा नादारीची वाटली नाही लाज. दप्तर म्हणजे हातात एक नायलॉनची पिशवी. त्यात अनेक पिढ्यांनी वापरलेली जुनी बालभारतीची पुस्तके, पत्रीपाटी – पेन्सिल इत्यादी साहित्य असे. पावसात भिजू नये म्हणून डोक्यावर शेतातील युरिया खताच्या गोणीची इरली. पाऊस आला की, पुढून ओलेचिंब भिजत जात असत. पायात पायताण नसल्याने चिखल गारा तुडवत शाळेत धूम ठोकत जायचो.
शाळा गावाबाहेर कोसभर अंतरावर होती. शाळेला एक मोठा चढ होता. तो चढल्यावर ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर’ नामक फलक असलेले साधारणतः १०फूट उंचीचे भले मोठे प्रवेशद्वार. शाळेत प्रवेश केल्यावर रस्त्याच्या दुतर्फा मेहंदीची झुडपे, लगतच्या बाजूला ब्रह्मदेशीय बुच्याची गगन ठेंगणी फुलझाडांची रांग जणू काही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उभी आहेत की काय? असे वाटायचे. विस्तीर्ण जागेत गुलमोहर, कडुलिंब, सुबाभूळ व बोरींची गर्द दाटी होती. मध्येच टुमदार दोन्ही बाजूला कौलारू इमारत. इमारतीच्या मध्यभागी विविध रंगानी नटलेली पुष्पलतांची मांडवावर चढवलेली आरास. छोटेखानी बागेत असलेल्या फुलांची झाडं व गोलाकार कारंज्या. हा शालेय परिसर जणू हिरवाईने पांघरलेला शालूच.
आमचा वर्ग उजवीकडील इमारतीत भरायचा. दगडी बांधकाम असलेल्या भिंती. शेणामातीने सारवलेली विद्यार्थ्यांची भारतीय बैठक व्यवस्था होती. दर शनिवारी मुले गोठ्यातील शेण गोळा करून आणून देत व मुलीं वर्गखोल्या स्वच्छ सारवत असत.
शाळेत काटे गुरुजींचा मोठा दरारा होता. उंच, धिप्पाड शरीरयष्टी व शिस्तीचे भोक्ते असलेले व्यक्तिमत्त्व. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवाजानेच काफरं भरायचे. गुरुजी घराकडे येताच दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांचे तोंडचे पाणी पळायचे. तसेच शाळेत घोडगावकर गुरुजी, भरत शिसोदे गुरुजी, पवार गुरुजी, सरला पाटील बाई, कल्पना सोनवणे बाई इत्यादी शिक्षक कार्यरत होते.
त्यात आमच्या वर्गशिक्षिका कपूबाई होत्या. नारळ जसे वरून टणक असते; पण आतून ते मऊ असते. त्याप्रमाणे त्या होत्या. आपल्या टेबलाभोवती मुलामुलींची बैठक व्यवस्था करून त्या इतिहास विषय प्रत्यक्ष जिवंत करीत.
आमच्या वर्गाच्या दोन तुकड्या होत्या. एके दिवशी भरत गुरुजींच्या वर्गातील एक विद्यार्थी आमच्या वर्गात आला. बाई अध्यापन करीत होत्या. तो बाईंना म्हणाला,”बाई आमच्या गुरुजींनी हागरी सांगितली.”त्याच्या या उच्चारणाने संपूर्ण वर्ग खो-खो हसायला लागला होता.
आमची शाळा सायंकाळी पाच वाजता सुटली की, काही खोडकर विद्यार्थी पारिजातकाच्या झाडाचे काटेरी पर्ण मुलांच्या गालावर घासून घराकडे धूम ठोकत.
मी सन १९८८-८९ मध्ये इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असताना वडिलांना मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी धुळ्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तब्बल दोन महिने अँडमिट केले होते; तेव्हा माझी शाळेला तीन महिने दांडी झाली. मी परीक्षेत नापास होणार होतो. मी बाईंना मायकडून निरोप पाठविला, “मला जर नापास केलं तर कायमची शाळा सोडून देईल.”मग पुढच्या वर्गात ढकलण्यात आले. असेच रमतगमत पाचवीला गावातच न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये दाखल झालो. शाळेत सातवीपर्यंत अभ्यास काय असतो माहित नव्हता. मधल्या सुट्टीत शाळेला दांडी मारून बोरी नदीत मनसोक्त डुंबणे, मधमाश्यांचे पोळं काढणे, बाभळीचा डिंक काढण्यासाठी केरपट्टीतील झाडांवर चढणे, आंबे, बोरं, चिंचा पाडणे तर कधी रानातून भुंगा पकडून आगपेटीत बंद करून ठेवणे वा त्याला त्यापेटीत अन्न म्हणून पीठ ठेवणे तसेच त्यांच्या पायाला दोरा बांधून उडविणे असले उद्योग असायचे.
सुट्टीच्या दिवशी मरीआईच्या ओट्यावर लपवाछपवीचा खेळ खेळणे, सुरपारंब्याचा डाव मांडणे, भोवरा, गोट्या, विटीदांडू, आटयापाट्या, आबुधाबी, कंगनी, सायकल वा रिक्षाचे टायर फिरविणे म्हणजे जणू मर्सिडीज चालविल्याचा आनंद होई.
आम्हाला या शाळेत मुख्याध्यापक म्हणून लक्ष्मण ठाकूर सर कार्यरत होते तसेच राजेंद्र सूर्यवंशी सर, मधुकर मराठे सर, भालेराव सोनवणे सर, भगवान चौतमल सर, पांडुरंग शिसोदे सर, लोटन चौधरी सर, पु. सा आप्पा, नितीन सनेर सर, गोविंद साळुंखे सर, सुखदेव जाधव सर आदी शिक्षक लाभलेत.
आमच्या जडणघडणीला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचे कार्य केले असेल तर ते आमचे आठवीचे वर्गशिक्षक सुखदेव जाधव सर यांनी. ते आमच्या वर्गाला मराठी, हिंदी व चित्रकला हे विषय शिकवत. त्यांची अध्यापन पद्धतीची एक वेगळी हातोटी होती. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने आठवीपासून अभ्यासाकडे वळलो. ते आम्हाला चित्रकलेचे साहित्यही देत असत. त्याकाळी मी, उदय व विजय या तिन्ही मित्रांनी देवदेवतांची चित्रे काढून वर्ग सजावट केली होती. हिंदीच्या तासाला एखादा विद्यार्थी वर्गात गडबड करायला लागला की, जाधव सर म्हणायचे,”गधे कही के!” हे त्यांचे ठेवणीतले वाक्य होते. एकदा उत्तम बेलदार नामक विद्यार्थ्यांने विजय बडगुजर यास कादर खान म्हटलं.त्याने सरांकडे तक्रार केली. सरांनी त्याला विचारलं,”क्या हुआ?”
सर,”ये मुझे कादर खान कहता हैं।”
हा संवाद ऐकून सर्व वर्गात हास्यकल्लोड निर्माण झाला होता.
त्यावेळी सुरपारंब्या खेळ, सरकारी चिंच, वर्गातील पेनचोरी प्रकरण असे विविध छोटे मोठे किस्से वर्गात घडलेले. त्याकाळी खोडकर विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणजे शिक्षक दालनातील लाकडी खुंटीला टांगून पायावर प्रसाद मिळायचा.
अशातच १९९८ साली दहावीची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो.
माय मला नेहमी म्हणायची, “शिक्षणमा कोना दाया राहस नही भाऊ, तू शिकना तर तुले काम पडीन. नहीतर आम्हासारखा दुसराना मेर खुरपना पडीन.” या प्रेरणादायी शब्दांनी मनात कायमचं घर केलं. या जाणिवेतून, झपाटलेपणातून शिक्षणाची अंधारलेली वाट चाचपडत तुडवली.
श्री. ललित पाटील
सदस्य, मराठी भाषा राज्य अभ्यास मंडळ, बालभारती, पुणे
९२०९५१६५३५