There is no greater gift than that of sharing a favourite book. पुस्तकांच्या आदान-प्रदान यातूनच वाचन संस्कृती वृद्धिंगत होईल.
शालेय संस्कृतीत वाचनाचे महत्त्व आहेच, पण वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी हा प्रयत्न कमी पडतो कां? वाचन दुय्यम ठरलेल्या संस्कृतीत यशोशिखर गाठणे हेच आज ध्येय राहिले आहे. वाचन, मनन, चिंतन कुठे गेले? पॅकेज च्या युगात वाचना शिवाय ही पैसा मिळत असेल तर वाचायचं कशाला? केवळ वाचन नाही, तर जीवन कसं वाचायचं यापेक्षा जीवन कसं वाचवायचं हे आज महत्व पूर्ण ठरत आहे. वेळ वाया न घालवता ठराविकंच वाचायचं, परीक्षेला येणार आहे तेच वाचायचं, जीवनात आवश्यक ते न वाचल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पुस्तकातलं वाचलं की परीक्षेत यश मिळतं. यशस्वी जीवन जगणं पुस्तकात शिकवलं जात नाही. जास्त गुण कसे मिळवायचे ते तंत्र शिकवलं जातं. गुणवत्तापूर्णआयुष्य, प्रदूषण मुक्त आयुष्य कसं जगायचं, वैज्ञानिकदृष्टिकोन कसा अंगीकारायचा हे पुस्तक वाचून कळत नाही. प्रदूषण म्हणजे काय हे कळण्यासाठी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाचून नव्हें तर ते निसर्ग वाचून कळेल, कारण ते भोगत आहेत त्याचे परिणाम.
तसेच माणसें वाचायला कोण शिकवणार? माणसें वाचलीं म्हणून पुलंनी व्यक्तिचित्र लिहिली. सखाराम गटणे, चितळे मास्तर आजही जिवंत आहेत. आयुष्य सुधारायला पुस्तकातलंच वाचलं पाहिजे असे नाही तर, निरीक्षणातून माणसें, निसर्ग वाचायला हवे..
वाचन आपण फक्त पुस्तकां पुरतं मर्यादित केलं आहे. मुलांना माणसं वाचता यायला हवीत, निसर्ग वाचता यायला हवां, पर्यावरण वाचता यायला हवें, वैज्ञानिक दृष्टिकोन वाचता यायला हवा, जगता यायला हवा.
कुटुंबातच वाचन राहिलेलं नाही, मग मुलांना वाचां असं कोणत्या तोंडाने म्हणणार?
वादविवाद केवळ कुटुंबातंच राहिले नाही तर, सिरीयल मधले वादविवादही मुलांना लक्षात ठेवावे लागतात. मुले कधी वाचणांर, कशांसाठी वाचायचं, त्याने जीवनाची प्रश्न सुटणार आहेत का?
घरात जर आई-वडिल भांडणंच करत असतील, संवाद नसेल, रोजी रोटीचा प्रश्न असेल, तर अशा वेळी केवळ वाचून प्रश्न सुटणार आहेत का?
वाचल्यानंतर मनन चिंतनातून जे निर्माण होईल ते आवश्यक. वाचन त्याला समजले की नाही, वाचलेलें लक्षात ठेवतो का? वाचन त्याला किती समजलें, वाचलेलें किती लक्षात ठेवतों आणि वाचलेलं तो सादर कशाप्रकारे करतों यांच्याकडेही जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.
शाळेतल्या वाचन निर्मितीसाठी आपल्याला वरवरचे प्रयत्न करून चालणार नाहीत. आमचे कुटुंब पण समृद्ध हवं. आमच्याकडील वाचनालयें समृद्ध हवीत. वाचनालय अधिक समृद्ध करायला हवीत.
मुलांमध्ये वाचनाची गरज व आवड निर्माण व्हायला हवी. एखादं पुस्तक वाचावं असं वाटलं की माणसं शेवटपर्यंत एका बैठकीत वाचलेली उदाहरण आहेत. अशी पुस्तके मुलां समोर का येत नाहीत?
काय वाचन करायचं त्याचा विवेक योग्य वयात यायलां पाहिजे. अनुवंशिकता व भवताल वाचन संस्कृती रुजविण्यासाठी महत्वाचे घटक आहेत.
घरांत पूर्वी वाचन होतं. अध्यात्मच्या पोथ्या, चांदोबा मासिकं असायची. वाचनाचं वातावरण होतं.
आम्ही पुस्तके वाचून शेवटी आयुष्यात निराशेला जवळ करणार असू तर त्या वाचनाचा काय उपयोग? वाचनाने संवेदना निर्माण व्हायला हवी. संवेदना कृतीत निर्माण व्हायला हवी. प्रदूषणाचा झंझावात दिल्लीला धडकला आहे हे आमच्या मुलांना वाचू द्या. किती मुले वर्तमान पत्र हातात धरतात, वाचतात. नाही वाचलं तरी त्यांना त्या निसर्गाचा निरीक्षणातून कळणारच आहे.
वाचन रुजवाव लागेल.
संस्कृती रुजवण्यासाठी वाचन संस्कृती हा त्याचा एक भाग आहे. शालेय शिक्षणात केवळ वाचन संस्कृती न्हवे तर संस्कृती रुजवणं ही आज काळाची गरज आहे.
आम्हाला नैतिक संस्कृती रुजवावी लागेल. त्याच्यासाठी शाळेकडे काय प्रयत्न आहेत? मुलांनी काय वाचावे, कसे वाचावे यांचे नियोजन करावे लागेल. असं काहीतरी करा की मुलांना आपल्या संस्कृती, परंपरेविषयी अभिमान वाटेल, ते वाचावं वाटेल. तसं काहीच घडताना आज दिसत नाही.
करण्यासारखे खुप आहे वॉटर बेल ची संकल्पना सुरू केली तसं reading bell ची संकल्पना रुजवायला, काय हरकत आहे?
मुलांनी एक तास फक्त वाचन करायचं मग त्याचा अर्थ समजावून सांगायचा, आंबेडकरांनी सलग छत्तीस तासाचा अभ्यासाचा विक्रम केला. त्याच्यानंतर अनेक जणांनी तसा देखावा केला पण पुढे काय? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
आगरकरांनी दिव्याखाली अभ्यास केला त्याचे पुढे काय? अनेकांनी संघर्षातून वाचन चालू ठेवले. व्यक्तिमत्त्व घडविले तसे आज होताना दिसत नाही.
केवळ वाचन संस्कृतीच्या कार्यशाळा घेऊन चालणार नाही तर तळागाळात व तळागाळापर्यंत काम करावे लागेल. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी बाल साहित्याचा दर्जा सुधारावा लागेल. बाल साहित्य संमेलनाचा ही दर्जा सुधारावा लागेल. बालकांचा सहभाग संमेलनात जास्त हवा. केवळ औपचारिक उत्सव न होता विशेष प्रयत्न करावे लागतील. कोणतीही संस्कृती सहज रुजत नाही ती रचलीं तरच रुजतें. त्या दृष्टिकोनातून आम्हाला वाचनाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल तरच वाचन संस्कृती रुजेल.
पुस्तकाचे गाव भिलार प्रसिद्धीला आलं, प्रत्येक गावात भिलार सारखें वाचन कोपरें कां नाही तयार होऊ शकत? पण ते केवळ पर्यटन स्थळ होउ नये.
बाहेरून येणारे जास्त वेळ बसून वाचत नाहीत, कारण वेळ नाही, परतायचं असतं, फक्त पुस्तकाचे कपाट पाहून पुस्तके चाळतात आणि गावातले काही लोक पुस्तकें, त्या प्रमाणात कमी वाचतात.
शाळेत सुद्धा पुस्तके वाचनाला उपलब्ध करता येण्यासाठी योजना हवी.
शाळेत मुलांना वाचू द्या. त्यांच्यावर फक्त शिकवणंच थोपवलं जातं. त्यांना स्वतःला शिकू दे. Less is more प्रमाणे कमीत कमी अडथळा त्यांच्या अध्यापनात आणा.
मुलांना स्वतःहून एखादी कृती करू द्या. वाचन करण्याची त्याला संधी कुठे आहे? एकापाठोपाठ एक विषयाचे अध्यापन केलं जातं. तोंड उघडायला त्यांना संधीच नाही. शाळा सुटली की कोचिंग मध्ये ही तेंच. सगळी कडे तोंडावर बोट. घरी आलं की मोबाईलवर बोट. वाचनाच्या संधी शाळेत किती आहेत?
व्यक्त होण्याच्या संधी किती आहेत, हेही पाहायला हवं.
अध्यापनाच्या नादात वाचन शाळेत होतंच नाही. घरी प्रसारमाध्यमांचे वर्चस्व असल्यामुळे शक्य होत नाही. पूर्वी खूप गोष्टीचे पुस्तक वाचली गेली. आज ती भवतालींच नाहीत. आज ती दुर्मिळ म्हणून दुर्मिळच आहेत, त्याला कोणी हात लावत नाही. मुलांनी उड्या मारत वाचावी अशी पुस्तके हवीत.
काही गोष्टी व्यक्तिमत्व विकासात खूप पूरक आहेत. वाचन त्यापैकीच एक. वाचन जीवनाची दिशा देऊ शकतं. पूर्वीच्या पिढीला वाचनाशिवाय पर्याय नव्हता. प्रसारमाध्यमं, मोबाईल इंटरनेट नव्हतें. शाळेत आठवड्यातून एका मुलाने परीपाठ घ्यायची जबाबदारी त्याच्यावर दिली तर वाचन करून तो तयार होईल. मुले वाचत नसतील यानिमित्ताने मुले वाचतील व मुले व्यक्त होतील. शाळेत फक्त अध्यापनात वेळ जातो. अध्ययन करण्याची संधीच मिळत नाही. मी काय शिकलो, त्याचा मला कितपत उपयोग आहे. लक्षात राहत नसेल तर पूर्वी शब्द पाठ करणे, पाढे पाठ करणे यामुळे वाचन, लेखन आणि लक्षात राहण्याची प्रक्रिया व्हायची. पाठांतरातून वाचन आणि वाचनातून पाठांतर करत करत वाचनाची गोडी लागते.
मुलांना वाचतं करण्यासाठी आधी आम्हाला बदलावं लागेल. वाचलेलं सगळं लक्षात राहतं असं नाही, थोडं लक्षात ठेवण्या साठी पुनर्वाचन प्रयोग करावा. वाचलेलं पुन्हा पुन्हा वाचायचं लक्षात राहीपर्यंत, पाठहोई पर्यंत, स्वतःला व्यक्त होई पर्यंत. वाचन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेतून मुलांना घडवावे लागेल. वाचन साहित्य उपलब्धता कमी आहे हे मान्य करावे लागेल. ग्रामीण भागात कुठे वाचनाचे साहित्य उपलब्ध आहे?
मुलांनी काय वाचावे, कधी,कोठें, किती वाचावे हे ठरवावं लागेल. शहरात वाचन साहित्य उपलब्ध असले तरी, मोबाईल मुळे मुले फक्त कार्टून पाहतात.
जे लोक मोठे झाले त्यांनी लहानपणी खूप वाचलेले आहे. त्यांच्या घरात वाचनाचे साहित्य उपलब्ध असायचे किंवा कुठूनही ते पुस्तके आणून वाचायची, अधाशासारखी आणि म्हणून ते चांगले लेखक किंवा इतर क्षेत्रात नांव कमावू शकले.
आज मुलांमध्ये सणांच्या मागची कारणें जाणून घेण्याची उत्सुकता नाही. सण म्हणजे गोड खाणे आणि नवीन कपडे खरेदी करणे, मौजमजा करणे हाच अर्थ आहे. सहल म्हणजे सुद्धा जाऊन मौजमजा करणे. एखाद्या किल्ल्याच्या इतिहास काय आहे एखाद्या ऐतिहासिक ठिकाणच्या महत्त्व काय आहे याच्याबदलउत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी.
मुलांच्या अनेक संकल्पना स्पष्ट नाहीत, त्या वाचनाने स्पष्ट होतील. शालेय पातळीवरीलचा विद्यार्थी फक्त परीक्षेसाठी पाठांतर करतो, अर्थ न समजता त्यामुळे, त्याच्या पुढचं काही वाचायचं असं त्याला वाटतच नाही. परीक्षेत जेवढंच विचारलं तेवढंच अभ्यास करायचा.
२१ अपेक्षित ही सवय आमच्या मुलांना लावली गेली, आवांतर काहीच पाहायचं नाही. जी काही शक्ती आहे ती फक्त परीक्षेत येणाऱ्या प्रश्ना साठीचं वाचण्यासाठी राखून ठेवायची. इतर वाचन होणार कसं?
पुस्तकाच्या मागे दिलेला स्वाध्याय सुद्धा जास्त वाचण्यासाठी मुलांना उद्युक्त करत आहे असं वाटत नाही. स्वाध्याय पूर्ण करणे म्हणजे उरकणे एवढाच अर्थ घेतला जातो. स्वाध्याय मधून वाचनाची गोडी कशी निर्माण करता येईल, यासाठी स्वाध्याय स्वरूप बदलणे आवश्यक आहे. स्वाध्याय यांत्रिकपणे पूर्ण केले जातात. अनेक प्रोजेक्ट दुकानातून तयार आणले जातात. पालक ही याला साहाय्य करतात.मुलांचे गृहपाठ सुद्धा करण्याइतपत पालक संवेदनशील व सहनशील झाले आहेत. आपल्या मुलाला शिक्षा मिळू नये हेच उदात्त कारण त्यामागे आहे. पण याच्यामुळे मुलगा घडत नाही बिघडत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.
कुठे स्वतःची वैचारिकता विद्यार्थी वापरतात? परीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर वैचारिक दारिद्र्यता त्याचे दर्शनच घडते. जास्तीत जास्त मुले कसे पास होतील त्यासाठी सोपे प्रश्न काढायचे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक तपासलंला जात नाही. पास होणे हेच ध्येय राहते.
मुलांमधील बुद्धिमत्ता तपासली जात नाही वृद्धिंगत केली जात नाही आणि त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. मुलांना काही वाच म्हणलं की पालकांची, शिक्षकांची खिल्ली मुलं उडवतात.त्यांचे त्यांचे नियोजन ठरलेले आहे. कोणते गेम्स खेळायचे, मग ते आत्महत्या कडे नेणारे असले तरी. त्यांना त्याची पर्वा नाही. ज्यात त्यांचं मन रमेल त्याच प्रकारची कृती ते करताना दिसत आहेत. याच्या पासून परावृत्त करण्यासाठी फार प्रयत्न लागतील. नैतिक शिक्षण द्यावे लागेल ते कुटुंबापासून द्यावे लागेल, तरच काही आशादायक चित्र निर्माण होऊ शकते. येईल.
गृहपाठ, स्वाध्याय, प्रोजेक्ट यामध्ये विद्यार्थी स्वयंअध्ययन किती करतो?
आमचा विद्यार्थी स्वयंअध्ययन करतच नाही त्याला ती सवय लावायला हवी. पाठ्यपुस्तकाच्या चाकोरीबाहेर शिक्षक जात नाही, त्याच्यामुळे विद्यार्थी जाण्याचा प्रश्नच नाही.
परीक्षेत निबंध विचारला असता आजही मुले निबंध पाठ करतात. हे थांबायला हवं. एखाद्या विषयावर त्यांना आपलं मत लिहिता यायला हवं आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा वाचन भरपूर असेल. आशय असेल तरच वैचारिक तरंग निर्माण होतात. विषय, आशय, संकल्पना या बाबी पासून आमची मुले खूप दूर आहेत.
शालेय पातळीवर काठिण्य पातळी साठी फक्त पाठांतर तेवढाच उपाय शोधला जातो. संबोध स्पष्टीकरण दुय्यम ठरलं जातं. संबोध स्पष्ट झाले तर वाचन प्रक्रियेला गती येईल. वाचन होताना दिसतंच नाही.
कुठे गेलं चांदोबा मासिक, कुठे गेलं पूर्वीच किशोर, कुठे गेली पूर्वीची पाठ्यपुस्तकें. सगळच कसं वाचनीय, रंजक अनौपचारिकपणे वाचलं जायचं, तसं आता का होत नाही? एखाद्या पुस्तक निर्मितीला जेव्हा कृत्रिमतेचा स्पर्श असतो तेव्हा ते वाचावंसं वाटत नाही.
जे जे उदात्त ते पाठ्यपुस्तकात यायलांच हवं.
मागच्या पिढीच्या कविता मूक पाठ असत. चालीवर त्या म्हणल्या जायच्या आणि आयुष्यभर त्या कविता लक्षात राहायच्या आणि कवितातेला अर्थ शोधता शोधता जीवन व्यतीत व्हायचं,कळायचं.
आज मुळात कविता पाठ होणे,चालीवर म्हणणे लांबच आहे.
किती मुलांना कविता पाठ आहेत. एखादं डिस्को गाणं त्यांना पाठ आहे. त्याच्यावर नाचता येतं, पण आमच्या असंख्य मुलांना बालकवी माहित नाही, त्यांचे हिरवे हिरवे गार गालिचे, कवितेतली माहीत नाहीत आणि निसर्गातले माहीत नाहीत. त्याला जबाबदार वाचन संस्कृती की संस्कृती?
खालील काही उपाय वाचन संस्कृती वाढविण्यासाठी उपयोगी पडतील. मुलांना मोठ्याने वाचण्यासाठी काही वेळ राखून ठेवा.
मुलांना माहितीही मिळेल व भाषा कौशल्यही वाढेल, ते कसं करायचं हे प्रत्येक शाळेने आपापले उपाय योजावेत.
मुलांना काय वाचायचं याची निवड करण्याची मुभा देण्यात यावी.काय वाचायचं ह्याची निवड मुलांना करू द्या. प्राप्त पुस्तकांमधून मुलांच्या घरून पुस्तक आणून त्याचे सामूहिक वाचन शाळेमध्ये करता येईल. प्रत्येकाने आपल्या घरून एक पुस्तक आठवड्याला आणून एका तासात त्याचं वाचन करायचं.
प्रत्येक मुलाने एक बाल साहित्याचे पुस्तक शक्य असेल तर शालेय ग्रंथालयास भेट द्यावे. म्हणजे त्याचा उपयोग इतर मुलांना होईल किंवा प्रत्येकाकडे घरांमध्ये जी काही बालसाहित्य संबंधित पुस्तके असतील ते वाचून झाल्यावर शाळेतल्या ग्रंथालयास द्यावेत. त्या त्या विषयात मूक वाचनासाठी वेळ द्यावा. शिक्षकांनीही मुलांना वाचून ही दाखवावे. त्यामुळे उच्चार, लय, चढ-उतार, संवाद याचे ज्ञान मुलांना होईल. वाचलेल्या पुस्तकांपैकी मुलांनी त्याच्यावर बोलावं, म्हणजे इतर मुलांनाही ते पुस्तक वाचावासं वाटेल.
एखादी संस्कृती रुचतें,म्हणून रुजतें. वाचन संस्कृतीचं ही असंच आहे. आजचे प्रश्न वाचन संस्कृती नसल्याचें परिणाम आहेत.हे बदलण्यासाठी केवळ मुलांना नव्हे तर, पालकांना आणि शिक्षकांना ही प्रयत्न करावे लागतील.
डॉ. अनिल कुलकर्णी
कोथरूड पुणे 9403805153