आपण अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकतो की, मी कधीच काही वाईट केले नाही तरीही मला आजारांनी त्रास दिला आहे. माझ्यासोबत असे का होत आहे? देव खरच खूप कठोर आणि निर्दयी, क्रूर आहे का?
सर्वप्रथम, आपण हे समजून घेतले पाहिजे की आपले कर्म आणि देव यांच्यात काहीही संबंध नाही, म्हणून आपण आपल्या समस्या आणि दुःखांसाठी देवाला दोष देऊ नये.
जर आपण सदगुणी असु तर आपल्याला जीवनात समृद्ध आणि आनंद नांदेल. जर आपण लोकांना त्रास दिला असेल किंवा पापी कृत्ये केली असतील तर आपल्याला विविध रोगांचा त्रास होतो आणि इतर कष्ट होतील.
आपल्या कृतींचा आपल्यावर नक्कीच परिणाम होतो. कधी आपल्या कर्माचा परिणाम आपल्याला या जन्मात तर कधी पुढच्या जन्मात मिळते, पण ते आपल्याला नक्कीच मिळतेच. तात्पर्य म्हणजे आपल्या कृतीच्या प्रभावापासून आपण कधीच मुक्त होत नाही, ही गोष्ट वेगळी आहे की त्याचा परिणाम लगेच दिसून येत नाही.
असे म्हणतात की माणसाचे कर्म त्याला कधीच सोडत नाही. आपल्या वर्तमान जीवनात जे काही चांगले किंवा वाईट घडते, त्यामागे आपल्या मागील जन्माची कर्मे कुठेतरी असतात. आपले भाग्य आपल्या मागील जन्माच्या कर्माच्या आधारे ठरते. जर आपल्या भूतकाळातील कर्मांमध्ये पापाचा जास्त सहभाग असेल, तर आपले वर्तमान जीवन देखील दुःखदायक होईल आणि आपल्याला दुर्दैवाला सामोरे जावे लागेल.
भगवान शिव शंकर माता पार्वतीला समजवितांना म्हणतात,
पूर्व जन्म कृतं यत्तु पापं व पुण्यमेव वा । इह जन्मनि भो देवि! भुज्यते सर्वदेहिभिः ॥
पुण्येन जायते विद्या पुण्येन जायते सुतः ।
पुण्येन सुंदरी नारी पुण्येन लभते श्रियम ॥
अर्थ :- हे देवी! माणसाने मागील जन्मी जे काही कर्म (पाप आणि पुण्य) केले असतील ते या जन्मी भोगावे लागतात. केवळ पुण्य ज्ञान देते, केवळ पुण्यच पुत्र आणि सुंदर पत्नी देते आणि केवळ पुण्यच अनेक प्रकारची संपत्ती देते.
आजचे जीवन हे मागील कर्माचे फळ असते. आता जे करता आहात, त्याचे फळ पुढे कधितरी मिळणारच. कर्म आणि त्याचे फळ यात कारण-कार्य संबंध आहे.
काहीही कारण दिसत नसताना व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडताना दिसतात, त्याची उपपत्ती कशानेच लागत नाही. म्हणून त्याची जोड त्यांनी पूर्वजन्माच्या कर्माशी घातली व पूर्वीच्या कर्माचे फळ म्हणून आजचे भोगणे असते, असा हा सिद्धान्त सांगतो.
आत्म्याच्या अमरत्त्वाचा सिद्धान्त, कर्माच्या कारण-कार्यभावाचा सिद्धान्त, सृष्टीचे अचल निसर्गनियम, नीतिशास्त्राचे नैतिक नियम इ. अनेक गोष्टींची सांगड घालून शास्त्रकारांनी पूनर्जन्म आहे, असे तर्कतः सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हा जन्म कोण घेतो? आत्मा तर सर्वत्र भरून राहिलेला आहे. तो कुठे जात नाही आणि येत नाही. तो स्थिर, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त व स्वभाववान आहे. जन्म घेतो तो जीव होय.
शंकराचार्यांच्या भाषेत अंतःकरणाधिष्ठित चैतन्य म्हणजे जीव होय. त्यालाच सर्व भोग भोगावे लागतात आणि अनेक जन्मांच्या रहाटगाडग्या सारख्या चक्रात अडकावे लागते. तर जैनांनीही जीवच जन्माला येतो व संसारचक्रात अडकतो असे सांगितले आहे. जगद्गुरु संत तुकाराम म्हणतात..
जन्माचे ते मूळ पाहिले शोधून ।
दु:खाशी कारण जन्म घ्यावा ॥
अर्थ :- “जन्म” कशासाठी होतो, याचे मूळकारण शोधले तर असे दिसते की “जन्म दु:ख सहन करायला”जन्माला यावे लागते
हे सगळे झाले सिद्धान्त. सिद्धान्त तेव्हाच खरा ठरतो जेव्हा त्याला अनुभवाची जोड असते. मला दूरवर कुठेतरी पाणी दिसले आणि ते पिण्याची मला प्रवृत्ती झाली. म्हणजे मला तहान लागलेली आहे आणि दूरवर पाणी दिसते आहे. मी तिथे गेलो, पाणी घेतले, ते पिलो आणि माझी तहान शमली तरच मघाशी दूरवर दिसलेले पाणी खरे होते. असा त्याचा अर्थ आहे. ते पाणी फक्त डोळ्यांनी दिसले, पण मला ते पिता आले नाही व माझी तहान शमली नाही, तर ते पाणी खरे नव्हते तर ते खोटे होते. ते एक मृगजळ होते. असा याचा अर्थ होतो.
म्हणजे भारतीय न्यायशास्त्रात सत्य कशाला म्हणावे, याविषयी सांगताना ‘सफलप्रवृत्तीजनकत्त्व’ असा एक निकष सांगितलेला आहे. त्यालाच ‘फलतःप्रामाण्यवादी उपपत्ती’ असे म्हणतात. इंग्रजीमध्ये त्यालाच ‘प्रॅग्मॅटिक थेअरी ऑफ ट्रूथ’ असे म्हणतात. म्हणजे मी एखादी गोष्ट गृहित धरून चाललो आणि त्यातून माझ्या प्रवृत्ती जर सफल झाल्या, तर मी गृहित धरलेले सत्य होते, असा याचा अर्थ होतो. ‘ईश्वर आहे’ असे गृहित धरून मी चाललो आणि त्यातून माझ्या अनेक गोष्टी सफल झाल्या तर ‘ईश्वर आहे, ’ हे माझे गृहितक सत्य ठरते.
हा सिद्धान्त पुनर्जन्माला लावला तरी पुनर्जन्म सिद्ध होतो. कारण त्याला अनुभवाची जोड असते. पुनर्जन्माचा अनुभव घेता येतो, देता येतो. या जगात जन्माला येताना व्यक्ती मागील अनेक प्रकारचे ‘पॅटर्न’ व ‘फॉर्म्स’ घेऊन जन्माला येत असते. त्यानुसार त्याच्या व्यक्तिमत्त्वाची घडण होत असते.
एकाच संस्कारात ठेवलेल्या दोन जुळ्यांची जीवने तपासली तरी हेच यातून दिसून येते. दोन सख्खे भाऊ, बहिणी किवा एकाच घरातील अनेक सदस्य वेगवेगळ्या वृत्तीचे, प्रवृत्तीचे, विभिन्न विचारांचे असतात. त्यांना येणारे अनुभवही वेगवेगळे असतात.
व्यक्तीला जो अनुभव येतो तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. एकच गोष्ट प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची दिसते, जाणवते. या अनुभवाला कारण असतात त्याच्या पाठीमागील स्मृतींच्या चौकटी. प्रत्येकाच्या स्मृती वेगवेगळ्या असतात त्यामुळे त्यांना येणारे अनुभवही वेगवेगळे असतात.
मागे अनेक जन्म घेऊन जीव जन्माला येत असतो. प्रत्येक जीव त्याच्या लाखो वर्षांच्या इतिहासाच्या बंधनाने बद्ध आहे. त्यातून सुटण्यासाठीच अध्यात्माचे प्रयोजन झालेले आहे.
शरीर मरते पण जीव जन्म घेतो. या संसारचक्रात पुनःपुन्हा येत राहातो. तीच तीच माणसे त्यालाही पाहावी लागतात. त्यांच्याशीच संबंध येत राहातात. यातून सुटका सहजासहजी होत नाही. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात.
अनेक आजारांची कारणेही मागील जन्मातील कर्मात असतात. त्या कर्मापर्यंत जाऊन ते उजागर केले की त्यातून निर्माण झालेला आजार बरा होतो. याच्यावर हजारो लोकांनी प्रयोग केलेत व ते यशस्वीही झालेले आहेत. याच्या एक पाऊल पुढे जाऊन असेही करता येणे शक्य आहे असे मला वाटते की, जसे मागील जन्मातील विशिष्ट कर्मामुळे वा घटनेमुळे विशिष्ट आजार होतो. तसेच या जन्मात भोगाव्या लागणाऱ्या परिस्थितीलाही मागील जन्मातील अनेक कर्मे व घटनाच कारणीभूत असतात. त्या त्या वेळेप्रमाणे त्या फाईली ओपन होतात आणि आपल्या समोर विशिष्ट परिस्थितीच्या रूपाने सामोऱ्या येतात.
मग जर आपली परिस्थिती बदलायची असेल तर ज्या कोणत्या फाईलीमुळे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे, तिथंपर्यंत पोहोचून या जन्मातील परिस्थितीसुद्धा बदलणे शक्य आहे.
प्रत्येक जन्मात काम करण्याची शक्ती देवाने माणसाला दिली आहे. या जन्मातही आपण चांगले आणि पुण्यपूर्ण कार्य केले तर आपल्या मागील जन्माची सर्व पापे नष्ट होऊन आपल्या दुर्दैवाचे रुपांतर सौभाग्यामध्ये होऊ शकते.
येथे जाणून घ्यावे की, अशा काही गोष्टींबद्दल जे आपल्या मागील जन्माचे पाप कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, फक्त ते करताना आपला हेतू पूर्णपणे शुद्ध असावा. म्हणून म्हणतो की, आपल्या आजच्या परिस्थितीला आपणच कारणीभूत असतो व ती बदलण्यासाठी आपण प्रयत्न केला तर आजची कसलीही परिस्थिती आपणच बदलू शकतो ! म्हणूनच आपण आपल्या भाग्याचे निर्मातेही बनू शकतो. मागे झालेल्या चुका सुधारू शकतो. नव्याने सुरुवात करू शकतो आणि हवे तसे आरोग्यपूर्ण, समृद्ध जीवन निखळ आनंदाचा अनुभव घेत जगू शकतो.