शिवा: प्रकाशाची वाट

आज सकाळीच शिवा उठला होता. स्वत:ची अंघोळ उरकुन आईला म्हटला, “मी जातो पुण्याला, मला शहरात कामासाठी बोलविले आहे. मला कामाला संतोष लावणार आहे. आता किती दिवस गावात बसुन राहायचे. कामधंदा काही नाही.” हे ऐकुन शिवाच्या आईला ही खुप आनंद झाला होता. आपला पोरगा शहरात जाऊन, काम करणार. नोकरीला लागणार…! आपल्या घराण्यात अजुन कोणीही नोकरीला गेलं नाहीत. तू जातोस तर खुप आनंद झाला आहे. अशी आई शिवाला म्हणाली. त्यावर शिवा म्हणाला,”काही काळजी करु नकोस.”शिवा पुणेची माहिती आईला देऊ लागला. शाळेमागचा संतोष नाही का? तो पुण्यात आहे. तो म्हटला..! माझा एक मिञ आहे. तो कंपनीत मॅनेजर आहे. तुझ्या कामाबद्दल मी बोललो आहे. तु येशील का पुणेला..! असा त्याने आग्रह केला आहे. म्हणुन मी जात आहे.गेल्यावर आठ दिवस, मी येणार नाही कारण कारण पहिले ट्रेनिंग आठ दिवस आहे. त्यामुळे लगेच येता येणार नाही. मी संतोषकडेच थांबणार आहे. चल..! आवर मला भाकरी बांधुन दे. आता लगेच सातची पहिली गाडी येईल. मला पुढे पोहचायला उशीर नको व्हयाला.    

   आईने जवळची शंभराची नोट पदराला बांधलेली सोडली आणि शिवाच्या हातात टेकवली. शिवाला ही आनंद झाला. खर्चासाठी आईने पैसे दिले. शिवानी आपल्या मुठीत घेऊन खालच्या खिशात घातले. गावात तो एस. टी. पकडण्या साठी बसस्टॅडला गेला. तो पर्यंत एस.टी. आली नव्हती. तेथे उभा असलेला सदा म्हणाला,”काय शिवा, कुठे चाललास?” कुठे नाही, पुणेला निघालो आहे असे बोलत पर्यंत एस.टी. आली. शिवाने एस. टी. त  मधल्या सिटवर जागा पकडून बसला. तेवढ्यात डबल बेल झाली. एस.टी.हालली. एक पुणे दया. शिवाने तिकिट काढले. प्रवास हा त्याचा शहरातील पहिलाच होता. कसे पुणे शहर असेल..! किती मज्जा असेल. आपल्याला नोकरी लागल्यावर आईला पण, पुण्याला घेऊन येऊ..! आता शहराची स्वप्न बघत बस धावत असताना, त्याच्या मनाची ही गती, स्वप्नांची गती वाढत होती. दिवा स्वप्न तो पाहत प्रवास करत चालला होता. प्रवासातील पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होतील का? हे त्याला माञ बिलकुल माहीती नव्हते पण शहरात तो माञ स्वप्न घेऊन आला होता. तीन तासांच्या प्रवासानंतर शिवा पुणेच्या शिवाजीनगर एस.टी. स्टॅडला उतरला. उतरल्यावर त्याला समोर भेळवाला, वडापाववाला, ऊसाचा रसवाला, चणेफुटाणे विकणारा नजरेस पडला. रिक्षावाल्यांचा आवाज.. चलो भाई…कहा जाना है..! हम वहा छोड देते है । असे म्हणत रिक्षावाल्यांनी त्याच्या भोवती गर्दी केली. शिवा शरीराने बलदंड, उंच, काळासावळा, धिप्पाड शरीरयष्टीचा असल्याने रिक्षावाले त्याला म्हणायला लागले.”साहेब.. कुठे जायाचे आहे. मी सोडतो.”असे म्हणत त्याच्यामागे आदबीने लागले. शिवा कावराबावरा झाला. आता काय करायचे म्हणुन त्याने समोरील हॉटेलच्या बाहेर लटकवलेल्या कॉईन बॉक्सकडे पाहिले. त्या कॉईन बॉक्स जवळ जाऊन त्याने संतोषचा नंबर फिरवला. संतोषचा फोन बरोबर लागला. याचा शिवाला आनंद झाला. मी शिवा, शिवाजीनगरला आलो आहे. कसे तुझ्याकडे यायचे ते सांग..? मी गावावरुन शिवा आलो आहे. संतोषने त्याला सांगितले, “तु रिक्षाने येऊ नकोस. एस.टी. स्टॅडच्या बाहेरच डाव्या बाजुला शहरातील पीएमटी. बस सेवा आहे. त्या बसने तु ये आणि स्वारगेटला उतरणे. मी तेथे घेण्यास येतो. तू तेथुन कुठे जाऊ नकोस.”संतोष पोहचण्यास वेळ लागणार होता. त्यामुळे शिवाला बस स्टापला उतरल्यावर कुठेही न जाण्याची ताकीद दिली. थांब म्हणत संतोषचा फोन कॉईन बॉक्सचा एक रूपया संपल्यामुळे फोन कट झाला. शिवा त्या पीएमटी. बस स्टापवर गेला. स्वागरगेट गाडीची कॅबीनमध्ये बसलेल्या खाकी कपड्यातील एका कर्मचा-याला विचारले. स्वारगेट बस कुठे लागते. हि समोरची बस आहे. लगेच निघेल. बसा, त्यात.! शिवाने बस मध्ये चढुन, खिडकीतील सिट पकडले. स्वारगेट गाडीत शिवा बसला आणि हि शहरातील गर्दी व गोंगाट पाहुन शिवाला आश्चर्य वाटत होते. कसे राहतात हे शहरातील लोक..! संतोषने उशीर होऊ नये याची काळजी घेतली. संतोष शिवाची बस येण्याअगोदरच स्वारगेट बस स्टाॅपला येऊन थांबला. उशीर होणारा त्याने टाळला होता. शिवा बस मधुन उतरला तर समोर संतोषला पाहुन खुप आनंदी झाला. दोघेजण गप्पा मारत संतोषच्या शुक्रवार पेठीतील घरी गेले. शिवाने सकाळपासुन काहीच खाल्ले नव्हते. त्याला खुप भूक लागली होती. तेवढ्यात संतोष बोलला, “शिवा तु काही खाल्लेस का नाही..? चल आपण जेवण करु या..! “शिवाने आपल्या पिशवीमधुन आईने दिलेला डबा काढला. कापडयाच्या पिशवीत चार भाकरी, लाल लसण्याच्या चटणीचा ठेसा आणि मेथीची भाजी दिलेली काढली. संतोष म्हटला,”शिवा तुझा डबा मी आज खाणार..! तु माझे ताट घे! शिवा अरे हा गावचा मेवा शहरात कधीच खायाला मिळत नाही.” जेवण दोघांची छान झाली. तु आलास,बरे वाटले. गावी कसे … बरे आहे ना..? सर्व खुशाली विचारुन संतोषची झाली. शिवाच्या कामाबद्दल चर्चा झाली.                                             

संतोषने शिवा बद्दल लगेच मॅनेजरला फोन लावला. तेव्हा त्या मॅनेजरने लगेच बोलावले आहे असे सांगितले. शिवा व संतोष त्या कंपनीत गेले. सुरक्षा रक्षकाने त्या दोघांना हटकले. तेव्हा बोडके साहेबांना भेटायचे आहे. त्यांनी बोलविले आहे असे सांगुन आत कॅबीनकडे दोघांनी मोर्चा वळविला.”बोडके साहेब, मी आत येऊ का?” अशी परवांगी घेत शिवा व संतोष दोघे कॅबिनमध्ये गेले. हाच तो शिवा. मी तुम्हाला त्याबद्दल सांगितले होते. बोडकेसाहेबांनी त्याच्याकडे वरपासुन खालीपर्यंत शिवाकडे पाहिले. धिप्पाड शरीरयष्टी पाहुन साहेब खुश झाला आणि संतोषला म्हटला असेच मला उमेदवार पाहिजे.

त्याची ट्रेनिंग आज पासुनच सुरु करतो. मग शिवाने तीन दिवस पुर्ण ट्रेनिंग घेतली. त्यात तो अव्वल दर्जामध्ये पासही झाला. संतोषला हि वाटले. चला एका चांगल्या मुलाचे भविष्य घडत आहे. तीन दिवसांच्या ट्रेनिंगनंतर शिवा परत घरी आला. त्याचा चेहरा पडलेला पाहुन संतोष म्हणाला,”काय झाले” शिवा त्यावर दबक्या आवाजात म्हणाला, “काही नाही, त्यांना दहावी पासच उमेदवार पाहिजे. माझे नववी पर्यंत शिक्षण आहे.”काय करायचे हा प्रश्न संतोषला पडला. तो शिवाला बोलला, नाराज होऊ नको.बघतो..! मी काय करायचे ते. बोडकेसाहेबांना शिवाच्या कमी शिक्षणाबद्दल विनंती केली. पण कंपनीची पॉलीशी दहावी पासचीच आहे. बोडके साहेबांनी संतोषला सॉरी म्हटले. काम होणार नाही सांगितले. शिवाने ही सर्व चर्चा ऐकली आणि शिवा नाराज होण्यापेक्षा संतोषलाच खुपच वाईट वाटले. माझ्या गावाकडचा हा मुलगा कामाला लागला असता तर त्याचे एक तरी कुंटुब सुधारले असते. संतोषचा प्रयत्न असफल झाला. शिवाचे नोकरीचे स्वप्न क्षणात विरुन गेले. शिवाने दुपारच्या गाडीने परत गावी घरी जायाचे ठरविले.

आता येथे शहरात राहुन करणार काय? म्हणुन शिवा परत आपल्या गावाला बॅग गळ्यात अडकवून निघाला. संतोष त्याला म्हटला काळजी करु नको. मी परत प्रयत्न करतो. शिवाला संतोषने शिवाजीनगर एस.टी.स्टॅडला सोडले. गावची बस नुकतीच दोन नंबर प्लॅटफॉर्मला लागली होती. शिवा एस.टी.त बसला आणि संतोषने त्याला बायss बायss केले. त्याला बायचा हात करुन निरोप दिला. संतोषला मनापासुन खुप वाईट वाटले. आपण त्याला खास गावावरुन बोलविले. त्याच्या भविष्यात काही तरी प्रकाश मिळेल.. त्याचे जीवन बदलेल. पण नियतीच्या पुढे कोणाचे काय चालते का..! स्वत:च्या मनाला खात संतोष त्या पाठमो-या एस.टी.कडे अगदी दिसेना होई पर्यंत पाहत राहीला. शिवा भविष्याची निव टाकण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. त्याच्या गरिबीला कुठे तरी स्वप्नांची चंदेरी झालर मिळाली असती. शिवा बद्दल असलेली तळमळ आणि त्याच्या प्रामाणिक स्वभावाचा संतोषला नेहमी ठेवा वाटत असे. शिवा हा एक गरिब कुटुंबातील असला तरी त्याच्यावर झालेले संस्कार माञ कौतुक करणारे होते. शिवा हा आयुष्यात काही तरी करेल या अपेक्षेने मी त्याला शहरात बोलविले होते. शिवाने माझ्यावर भरोसा ठेवुन आला होता. पण त्याच्या अर्धेवट शिक्षणाने त्याची आयुष्याची प्रगतीची वाट माञ अंधाराकडे घेऊन जाणारी ठरली आहे. शिक्षणाच्या अंधकारामुळे जीवनात प्रकाशाची वाट दिसत नाही हेच खरे आहे. समोरच्या इराणी हाॅटेल मध्ये संतोष गेला. एक चांगला कडक चहा पिऊनच आता घरी जाता येईल. तसा माझा पाय येथुन निघणार नाही. मनाला एक टोचणी बसावी तसे संतोषला वाटत होते. शिवाचा झालेला गावकडचा परतीचा प्रवास संतोषला सहन होत नव्हता. मन सारख स्वत:ला खात होत. असा हा त्याच्या आयुष्यातील आलेला मोका शिवाला का नाही मिळाला..? या आणि अशा अनेक प्रश्नांनी संतोषचे मन बेचैन झाले होते.”साहब..!चाय..!” असा वेटरने आवाज दिल्यावर आपल्या तदरींत असलेला संतोष भानावर आला. समोरच्या चहाच्या कपाकडे पाहत संतोष हळहळ करत होतो. शिवाचे काम झाले पाहीजे होते.चहाचा घोट घेत घेत.. चहा आपल्या पोटात रिचवुन संतोष त्या इराणी हॉटेलच्या बाहेर पडला. घड्याळकडे नजर गेली. तेव्हा त्याच्या लक्षात आले. खुपच मला बाहेर येऊन उशीर झाला आहे. संतोषने शिवाच्या कामाच्या विचारात आपले घर गाठले.

          

   शिवा मनात म्हटला, माझे शिक्षण दहावी पर्यंत असते तर हि संधी कामाची गेली नसती. मला शहरात राहता आले असते. शिक्षण नसल्यामुळे शिवाच्या आयुष्यातील संधी हुकली होती. शिवा गावात परत पोहचला. अनेक दिवस.. महिने गेले. शिवा काय पुन्हा शहरात येण्याचे नाव घेत नव्हता. तो मनातुन खुपच खचला..! आपले अर्धेवट शिक्षण म्हणजे आपली चुक आहे. आपल्या नशिबाला दोष देत, त्याने गावात कामधंदा करायला सुरुवात केली. माती खोदकामाला शिवा जाऊ लागला. ऊस चाळायला जाऊ लागला. विहिरीच्या कामावर जाऊ लागला. आता शिवा पक्का गावकरी झाला होता. भिवाचे लग्न झाले. लवकरच दोन मुले ही झाली. त्याचा जगण्याचा संघर्ष हा माञ चालूच होता. त्याच्या मनात नेहमी खंत राहीलेली कि आपण शिक्षण घेतले नाही. पुर्ण शिक्षण घेतले नाही. म्हणुन आपल्यावर ही वेळ आली आहे. शिवाने मनात ठरविले. आता आपल्या मुलांना तरी चांगले शिक्षण देऊ या. त्यांना शिक्षणासाठी पाहिजे तेवढे कष्ट करायचे. शिवाचा मोठा मुलगा आता सातवीत गावाच्या शाळेत जात होता. शाळा चांगली मोठी होती. बारकी पोरगी ही पाचवीला शिकत होती. त्याचे कष्टमय जीवन सुरुच होते. शिवा तसा मित्तभाषीय होता. कधीही कोणावर धावुन…ओरडुन बोलेला नाही. कधीही खाली मान घालुन शांतपणे बोलायचा. त्याचा हा विनम्र स्वभाव ब-याच वेळा त्याच्या प्रगतीच्या सुध्दा आड येत असे. शिवाचा दिनक्रम रोज चालू होता. सकाळी कुदळ, पहार, फावडी खांद्यावर टाकायची… आणि जो मालक बोलवेल. त्याच्या शेतात कामाला जायाचा..! तशी त्याची हालाकीची जिंदगीच होती. माती उकरुन, कष्ट करणा-या माणसांचे काय जीवन असणारं..! रोज कामाला गेल तरचं त्याच्या कुटुंबाचे पोट भरायचे..!                

   शिवा नेहमीप्रमाणे शेतावर कामाला गेला होता. दुपारचे जेवण करुन पुन्हा कामाला लागणार होता. तेवढ्यात त्याची बायको राधा शेतावर पळत आली. बायकोला पाहुन शिवा घाबरलाच. नक्की काहीतरी झाले असल्याशिवाय बायको शेतापर्यंत येणार नाही.”काय झालं? पार शेतावर पळत आलीस…!”शिवा बायकोला बोलला. त्याची बायको तर मग मोठ्याने रडायलाच लागली. “काय सांगू.. शाळेची फी भरली नाही म्हणुन आपल्या गणुला सरांनी खुप मारले आहे. त्याचा हात पिरगळ्यामुळे मोडला आहे. तो घरी रडत आला आहे.” हे ऐकुन शिवाला खुप वाईट वाटले. आपली ही आबाळ आणि मुलांच्या शिक्षणाची फी भरता ही आपल्याला येईना. कसे काय करावे. ह्यामुळे त्याचे डोके सुन्न झाले होते. कुदळ व फावडे खांद्यावर टाकले आणि सरळ घर गाठले.मु लांच्या रडकुंड्या चेह-याकडे पाहताना शिवाला आपल्या मनाचा हुंदका आवरता आला नाही.”अरे..! बाळांनो? मी शिकलो नाही पण तुम्हाला मला लय शिकवायच हाय..! पण ही गरिबी काय सुधरु देईना..!” शिवा स्वत:च्या मनाला धीर देत मुलाला घरात घेऊन गेला. काही काळजी करु नकोस. आता डॉक्टरकडे जाऊन येऊ..! मला उद्या कामाचे पैसे मिळणारं आहेत. उद्या भरतो. काळजी करु नकोस. पोरगं गणू माञ रडत बसला होता. बाप काय बोलतोय याकडे त्याच लक्ष नव्हत. त्याचे रडु गप्प करत शिवाने गणूला जवळ घेतले. बघतोय तर काय..! बोटांवर जखम झालेली होती. हे काय गणू..? तेव्हा गणू अजुन मोठ्याने रडू लागला. काल ही मला सरांनी बेंचवर बोट ठेवुन मारले आणि फी का भरत नाहीस..? असे माझ्यावर ओरडले. पण मी ते सहन केल. आज परत मला मारले. मी काल सांगणार होतो तुम्हाला..! पण तुमचीच दोघांची भांडणे झाली पैशांवरुन..! म्हणुन मी काही बोललो नाही काल. शिवाचा जीव शिक्षणासाठी तिळतिळ तुटत होता. गणू बरोबर ब-याच मुलांना शाळेत त्या राऊत सरांनी चांगले बेदम मारले होते….

यापुर्वी अशा प्रकारच्या अनेक तक्रारी राऊतसरांविषयी आल्या होत्या. पण बोलणार कोण? कारण शाळेचे संस्थापक यांचा तो जावई होता. पैशांनी गडगंज श्रीमंत व राजकीय पार्श्वभूमी असलेला संस्था चालक होता. पण त्यालाही एकच मुलगी होती. तीनेही पळून जाऊन लव्ह मॅरेज लग्न केले. त्यामुळे नाचक्की होऊ नये म्हणुन शाळेच्या संस्थापकाने आपल्या मुलीला व जावयाला आपल्याकडेच ठेवले. जावयाचे शिक्षण कमी असल्यामुळे सुरुवातीस त्याला क्लार्क म्हणुन  शाळेत प्रवेश देऊन कामावर ठेवले. कुठे बाहेर नोकरीसाठी जाण्याची गरज नाही म्हणुन जावयाला आपल्या शाळेतच कामाला लावले. पुढे त्याने पुढचे शिक्षण घेतले. शिक्षक म्हणुन त्याच शाळेत परमंन्ट कामाला रुजू झाला. राऊतसर जणू शाळेचा बॉस म्हणुनच वागत असे. सर्व बाकी शिक्षकांशी प्रेमाने न वागता, ते उध्दटपणे वागत असे. अशा वागण्यामुळे प्रामाणिकपणे काम करणा-या शिक्षकांच्यावर माञ बदनामीची वेळ आली होती. प्रत्येक शिक्षकाकडे नेहमी पंचनिष्ठा ह्या पाहिजेच, त्या म्हणजे विद्यार्थीनिष्ठा, व्यावसायिक निष्ठा, विज्ञाननिष्ठा, समाजनिष्ठा, राष्टनिष्ठा होय. पण असे वशिल्याने लागलेले शिक्षक माञ या निष्ठेची पार विष्ठा करुन टाकतात. शाळेच्या संस्थापकाचा जावई राऊतसर या कोणत्याही निष्ठेत माञ बसत नव्हता. शिक्षकीपेशा हा निष्ठा म्हणुन नाहीतर… नोकरी आणि पगार मिळणार आहे म्हणुन तो त्यांनी स्विकारलेला होता. कसेबसे शिक्षण अर्धेवट पुर्ण केलेले व वशिल्याचे टट्टू जर शिक्षक पेशात आले असल्यामुळे इतर निष्ठावंत व प्रामाणिक शिक्षकपेशा स्विकारलेल्या शिक्षकांना बदनाम व्हावे लागते. संस्थापकाच्या जावयाची अरेरावीपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता. बाकी शिक्षक व कर्मचारी ही राऊतसरांच्या या अशा वागण्यामुळे हैराण झाले होते. अनेक मोठ्या वर्गातील मुलींची छेड काढणे. त्यांच्याशी शारिरीक सलगी करणे. अशा ही गोष्टी करण्याची मजल राऊतसरांनी मारली होती. काही मोठ्या वर्गातील मुलींनी या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळुन अनेक विद्यार्थींनी विष प्राशन केले होते. त्यातील दोन विद्यार्थींनींचा जीव सुध्दा गेला होता. अशा या बेशिस्त राऊतसरांच्या वागण्याला लगाम कोण घालणार..! त्यांच्या या वृत्तीमुळे शिक्षणक्षेञ बदाम होण्याची वेळ आली होती. शाळेची प्रतिमाही खराब होण्याची मुशिबत आली होती. पालकांकडून विविध प्रकारच्या फी आकारणी करुन विद्यार्थी व पालकांची लुटच सुरु केली होती.                 

        आज १५ ऑगस्ट स्वातंञ्य दिन होता. शाळेत बाहेरगावचे प्रमुख पाहुणे आले होते. त्यांनी त्यावेळी खुपच छान विचार मांडले. गरिब मुलांसाठी व होतकरु विद्यार्थ्यांसाठी जर परमंन्ट शिक्षक असेल त्यांनी जर दरवर्षी एक मुलगा व एक मुलगी दत्तक घेऊन त्यांच्या फी भरण्यापासुन ते कपडे, स्कुल ड्रेस, सहल, शैक्षणिक उपक्रम फी स्वत: भरावी. स्वत:च्या शाळेतील असे गरिब व होतकरु विद्यार्थी दत्तक घेतले तर त्या विद्यार्थी वर्गास शिक्षण सहज घेता येईल. शहरात असे आम्ही यशस्वी प्रयोग केले आहे. यावर सर्व शाळेतील मुलांनी, पालकांनी, शिक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून या कल्पनेचे स्वागत केले. त्यासाठी परमंन्ट शिक्षकांचा मनाचा मोठेपणा व विशालदृष्टीकोन हवा आहे. समाजातील श्रीमंत व दानशूर व्यक्तींनी आपल्या उत्पन्नातील निदान दोन टक्के भाग…वाटा अशा होतकरु मुलांच्या शिक्षणांसाठी दान करावा. ज्यामुळे समाजातील गरजू विद्यार्थी आपले शिक्षण पुर्ण करतील. स्वत:च्या पायावर ते उभे राहू शकतील. त्यामुळे समाजाला त्याचा नक्कीच फायदा होईल.या विचारांची माणसे समाजात तयार झाली पाहीजेत. यावर अजुन जोरात टाळ्यांनी सर्व शाळेचा परीसर दणाणुन गेला. १५ ऑगस्टच्या आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. पाहुण्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अनेक शिक्षक प्रेरीत झाले. शाळा सुटल्याची तेवढ्यात घंटा झाली.      

   शिवाच्या मुलांच्या प्रकरणामुळे शाळेत पालकांनी तक्रारी केल्या. ही घटना एका पञकाराला कळाली. त्यांनी बातमीची सर्व माहीती गोळा केली. सर्व न्यूज चॅनेलला प्रसारीत केली. त्यामुळे मुख्याध्यापक, शाळा, प्रशासनावर दबाब आला. गावक-यांनी मध्यस्थी करुन गावाची, शाळेची बदनामी होऊ नये म्हणुन ते प्रकरण तेथेच मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या शाळेतील मारणा-या राऊत सरांची दुस-या शाखेच्या शाळेत बदली केली.       

शाळेनी या मुलांनकडून फी घेणार नाही. त्याची फी आम्ही भरु…अशा काही समजोता होणा-या गोष्टी घडल्या. पण शिवाच्या कुटुंबावर हा झालेला आघात शिवाला माञ सहन झाला नाही. माझ्या राहिलेल्या शिक्षणाच्या स्वप्नांना माझी मुले पुर्ण करतील. अशी प्रकाशाची वाट… मी बघत होतो. पण हे आयुष्यातील अंधाराचे प्रश्न…हे गरीबाचे प्रश्न….कधी ही सुटणार नाही का..? या विचारात शिवाने मुलाला छातीशी जवळ करुन मिठीत घेतले. मनात ढसाढसा रडत राहिला…!                       ।।समाप्त।।

प्रा. राजेंद्र दशरथ सोनवणे

(कवी – वादळकार, पुणे) मोबा. ९६५७३४८६२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button