साप्ताहिक शिक्षक ध्येय २ ऑक्टोबर २०२३, वर्ष ४ थे अंक २५ वा.
संपादकीय…
आपल्या आचारणातून संदेश…
अमर्याद काळाच्या वाटेवर काही माणसे आपल्या कर्तृत्वाची पाऊले उमटवितात. काहींची ठसठसीत उमटतात तर काहींची पुसटशी. काहींची उमटल्यासारखी वाटतात तर काहींची उमटतच नाही. महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री हे असे व्यक्तिमत्व होऊन गेले की त्यांनी काळाच्या पाऊलवाटेवर आपली दमदार पावलं ठळकपणे उमटविली आहेत.
आपणास जर खरेच जीवनात आणि जगात शांतता पाहिजे असेल तर या दोन महान नेत्यांच्या विचाराशिवाय आजतरी पर्याय नाही. आपण आज सैरभैर आणि बधीर झालो आहोत. फक्त पुतळे उभे करून किंवा 2 ऑक्टोबरला यांची जयंती साजरी करून काहीच हाती लागणार नाही, तर यांच्या जयंतीनिमित्त तरी आज आपण यांच्या विचारांची कास धरली पाहिजे, ठोस कृती केली पाहिजे.
अल्बर्ट आईनस्टाईन गांधीजींबद्दल लिहितात, “अशा प्रकारचा मनुष्य या पृथ्वीतलावावर वावरून गेला यावर पुढील पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन लिहितात, “जगाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत जे सांगितले आणि आचरून दाखविले असे एकमेव म्हणजे महात्मा गांधी.
प्रश्न हा आहे की, आपण गांधी चरित्रातून काही शिकणार आहोत का? आणि कधी? गांधीजी नेहमी म्हणायचे, “My Life is My Massage”. दिसायला साध्या पण प्रचंड आंतरिक उर्जा असलेल्या गांधीजींचे आपण वारसदार आहोत हे प्रत्येकाने विसरता कामा नये.
साधेपणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच लाल बहादुर शास्त्री. ‘जय जवान, जय किसान’ हा मंत्र त्यांनी दिला. कष्टमय जीवन, सरकारी गाडीचा त्याग, भेटवस्तूस नकार, प्रसिद्धीची हाव नसणे आदी गुण यांच्याकडून शिकण्यासारखे आहेत. दोन्ही नेत्यांनी सांगितलेली तत्वे खेड्यांचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, कौशल्य आधारित शिक्षण याबाबत आपण विचार आणि प्रत्यक्ष कृती कधी करणार आहोत?…
अंक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..