फिनलंडमधील शिक्षण जगात सर्वोत्कृष्ट मानले जाते. फिनलंडमधील अभ्यासाचा पॅटर्न विद्यार्थी फ्रेंडली आहे. तिथे मुलांना ना गृहपाठ मिळतो ना पेपर तपासल्यावर त्यांना मार्क दिले जातात, तेथील मुलं इतकी सक्षम आहेत की ते स्वतःचं मूल्यमापन स्वतःच करतात.
जर तुम्ही गुगलवर जगातील सर्वोत्कृष्ट शाळा बद्दल सर्च केले तर फिनलंड या देशाचं नाव अव्वल स्थानी येईल. फिनलंड आज पासून नाहीतर अनेक दशकापासून याबाबतीत खूप पुढे आहे. फिनलंडची शिक्षण व्यवस्था केवळ विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य देत नाही, तर सर्जनशीलतेला सतत प्रोत्साहन देते. त्याचा फंडा हा जास्त मार्कांसाठी स्पर्धात्मक शर्यत नाही. ही व्यवस्था त्या सर्व देशांसाठी आदर्श ठरते, जे आजही आपल्या विद्यार्थ्यांना संख्येच्या शर्यतीत परीक्षांमध्ये आणि स्पर्धेत अडकवून दबाव आणि तणाव वाढवते.
फिनलंडमधील औपचारिक शिक्षण हे वयाच्या सातव्या वर्षापासून सुरू होते. सात वर्षांपूर्वी प्रत्येक मुलाला बालपणाचे शिक्षण दिले जाते आणि त्यांची काळजी घेतली जाते. यामध्ये प्रत्येक मुलाकडे विशेष लक्ष दिले जाते. या सुरुवातीच्या शिक्षणाचा औपचारिक शिक्षणाशी काहीही संबंध नसून तो त्याच्या आरोग्यावर आणि एक चांगला माणूस होण्यावर भर देतो.
फिनलंड व्यवस्था प्रत्येक मुलाची ऊर्जा ओळखण्याचा प्रयत्न करते. इथली मुलं घरात क्वचितच गृहपाठ करतात; इथल्या शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य आहे की ते मुलांना त्यांच्या पद्धतीने शिकवू शकतात, जेणेकरून त्यांचा अभ्यास होईल आणि प्रयोगाचा पर्यायही आहे. यामुळे मुलाला आनंदाने शिकण्यात रस निर्माण होतो.
फिनलंडमध्ये मुले सोळा वर्षापर्यंत कोणत्याही प्रकारच्या राष्ट्रीय परीक्षेला बसत नाहीत ते त्यांचे अनेक आधारावर मूल्यांकन करतात. एकंदरीत मूलभूत शिक्षण धोरण असे आहे की शिक्षकाने मुलांमध्ये स्वतःचे मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. यामुळे मुले स्वतः त्यांच्या वाढीबाबत आणि शिकण्याच्या प्रक्रिये बाबत सजग असतात.
फिनलंडच्या शाळा प्रामुख्याने स्थानिक नगरपालिकेद्वारे नियंत्रित केल्या जातात परंतु त्यातील बहुतांश निकष केंद्र सरकारने बनवले आहेत. जर आपण अभ्यासक्रमाबद्दल बोललो तर शाळांना त्यांच्यानुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. जगातील इतर देशांतील शाळा पेक्षा फिनलंड मधील शाळा मुलांसाठी अधिक अनुकूल आहेत. तेथे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तर ही उत्तम आहे.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फिनलंड समाजात शिक्षकांना खूप महत्त्व आणि आदर दिला जातो. देशाच्या विकासात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मानले जाते. फिनलंड हा देश बुद्धिमत्ता आणि शैक्षणिक धोरणा मध्येही जगात आघाडीवर मानला जातो. तिथे स्पर्धा फारशी दिसत नाही. समाजात एक ब्रीद वाक्य आदर्श आहे ज्याचा प्रभाव देखील दिसून येतो. तो म्हणजे वास्तविक विजेते स्पर्धा करत. त्यामुळेच येथे गुणवत्तेला वाव नाही आणि चांगल्या शाळा व शिक्षकांचे मानांकनही नाही.
सर्व मुलांना वयाच्या नवव्या वर्षापर्यंत शाळेत शिकत असताना परीक्षा नसतात. नववीनंतर मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी असते. फिनलंडमधील शाळा या सर्व साधारण नऊ ते पावणेदहाला भरतात. जेणेकरून मूलं पूर्ण झोपेनंतर शाळेत येतील. शाळेला दुपारी दोन ते पावणे तीन पर्यंत सुट्टी आहे. तिथे वर्गाचा दिवसाचा कालावधी मोठा असतो पण दर 45 मिनिटानंतर मुलांना पंधरा मिनिटांचा ब्रेक दिला जातो. मुलं त्या वेळात खेळू-बागडू शकतात अर्थात वर्ग चालू असतानाही मूलं हवं ते करू शकतात आणि बाहेरही जाऊ शकतात. वर्गात शिक्षकांशी किंवा इतर मुलांशी गप्पाही मारू शकतात. वर्गात मुलांची आणि शिक्षकांची बसण्याची व्यवस्था ही मजेशीर असते.
बराच काळ एकच शिक्षक असतो. सहसा इतर देशांमध्ये पुढील वर्गात मुलांचे दरवर्षी शिक्षक बदलतात परंतु फिनलंड मध्ये असे घडत नाही जिथे शिक्षक सहा वर्षे सारखेच असतात जेणेकरून ते त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगले ओळखतात आणि त्यांचे चांगले मार्गदर्शक म्हणून काम करतात विद्यार्थी देखील त्यांच्याशी पूर्णपणे संपर्क साधतात अनेकदा हे शाळेतील शिक्षकही त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी कुटुंबासारखे बनतात. त्यामुळे दोघांमध्ये जो परस्पर संबंध निर्माण होतो तो नेहमीच अबाधित राहतो.
फिनलंडमधील शाळेतील वातावरण अतिशय अल्हाददायक असते. साधारणपणे शाळेतील वातावरण मुलांसाठी त्रासदायक, तणावपूर्ण असते. काही मुले शाळांमध्ये अधिक दबावाखाली असतात परंतु फिनलंडमधील शाळा सामान्यतः कमी तणावपूर्ण आणि मुलांची अधिक काळजी घेतात. दिवसभरामध्ये त्यांना मधल्या काळात अनेक वेळा खाणे आणि इतर कामासाठी ब्रेक मिळतो त्यामुळे ते अधिक आरामशीर राहतात शिक्षक देखील मध्यंतराने फ्रेश होतात.
फिनलंडमध्ये एकही शाळा खाजगी नाही तेथे शिक्षण हे पूर्णपणे मोफत आणि अनिवार्यसुद्धा आहे. शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारी सर्व पुस्तक, वह्या, संगणक, कला, क्रीडा या करता लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. तसेच माध्यान्य भोजनही मोफत दिले जाते. विद्यार्थ्यांना गणवेश नसतो.
फिनलंड मध्ये सात वर्षाच्या आधी मुलांना शाळेत टाकणं हा गुन्हा समजला जातो. सात वर्षापर्यंत मुलांनी आपलं बालपण जगून घेतलं पाहिजे असं तिथं मानलं जातं. छोट्या मुलांना पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही तर तिथं त्यांना खेळणं, मोकळेपणानं जगणं, इतरांशी मैत्री करणं, परस्पर सहकार्याची भावना त्यांच्यात निर्माण होईल अशा गोष्टी त्यांच्या शाळेत जाण्याची पूर्वतयारी म्हणून शिकवल्या जातात.
फिनलंडमध्ये शिक्षक होणं हे फार महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचा समजलं जातं. शिक्षकाची पदविकेबरोबरच इतरही सवयी, वर्तणूक योग्य असावी लागते.
या देशात प्रत्येक शिक्षकाला स्वतःचे शैक्षणिक प्रयोग करण्याची पूर्ण मुभा दिली जाते. प्रत्येक शिक्षकाने जुन्या घाण्याचा बैल होण्यापेक्षा अभ्यासात शिकवण्याच्या पद्धतीत सतत नाविन्य आणावं आणि नियमितपणे काळाच्या पुढे राहावं अशी अपेक्षा असते. एका अर्थाने तिथला प्रत्येक शिक्षक हा संशोधक असतो.
आज फिनलंड श्रीमंत देशामध्ये खूप वरच्या स्थानावर आहे. शांत आणि सुखी जगण्याचा बाबतीत ही क्रमांक एक वर आहे. भ्रष्टाचार मुक्त व्यवहारात, लैंगिक समानतेत, सुरक्षिततेत व शांततेत फिनलंड जगात नंबर एक वर आहे. बालवाडीच्या (अंगणवाडीच्या) कोंडवाड्यात घुसुमटलेली, अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेली, मार्क्स व परीक्षा पद्धती असलेली, शिक्षकांना अशैक्षणिक कामाकडे वळवणारी, खाजगीकरणाकडे वाटचाल करणारी आपली शिक्षण व्यवस्था फिनलंडच्या ज्ञानरचनावादी शिक्षण व्यवस्थेच्या दिशेने नेता येईल काय?
औदुंबर अंकुश चंदनशिवे
जि.प. शाळा शिरभावी ता. सांगोला जि. सोलापूर 9552644084