कवी कुसुमाग्रज यांनी केलेल्या या आवाहनाचे सार्थक होण्यास १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस उजाडला. पक्षी पिंजऱ्यातून उडाला. स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली. असंख्य बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले. बघता बघता स्वातंत्र्याचा प्रवास ७६ वर्षांचा होत आहे.
एखाद्या राष्ट्राच्या जीवनात ७६ वर्षांचा कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी, राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची ७६ वर्ष पूर्ण करणे अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. आपली स्वातंत्र्यविषयी कोणती स्वप्ने होती? स्वातंत्र्याकडून आपल्या कोणत्या अपेक्षा होत्या? आज सत्य “काय आहे” कुठे होतो आपण आणि आता भविष्यात कशी पावले उचलावी लागतील? याचा विचार आपल्याला करायला लागेल. आपण काय कमावलं काय गमावलं? यांचे सिंहावलोकन करण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिज समृध्द देश आहे. उत्तरेला हिमालय उभा आहे. पायी सागरच्या लाटा लोळण घालत आहेत. देशातून गंगा – गोदावरी व ब्रह्मपुत्रा सारख्या रक्त वाहिन्या वाहत आहेत. फिनिक्स पक्षी आकाशी भरारी मारतो आहे. सैनिक आणि जवान डोळ्यात तेल घालून देशाची सीमा रक्षण करत आहेत. किसान लोकराजा बनला आहे. आपल्या देशाला शिमला, कुलू, मनाली, उटी सारखी समृध्द पर्यटन स्थळे लाभली आहेत एकूणच आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे.
आपल्या देशाला पौराणिक आणि ऐतिहसिक संस्कृतीचा वारसा लाभला आहे. अनेक जाती, धर्माचे, भाषांचे लोक येथे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर यांच्यासारख्या थोर संतांची भूमी असलेल्या आपल्या देशाची संस्कृती आज जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. भारत एकाच वेळी अध्यात्मात आणि विज्ञानात अग्रेसर होत आहे. अनेक खेळ प्रकारात भारताने जागतिक दर्जाची कामगिरी केली आहे.
गेली १५ वर्षे साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये नामवंत लेखक, साहित्यिक व कलावंतांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. नक्कीच भारत जागतिक पटलावर एक सशक्त व स्वावलंबी देश बनत आहे ही आपणा सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे.
अभय जयंत लोहार, इयत्ता ८ वी
शाळा: डी. आर. हायस्कूल
ता. जि. नंदुरबार