कला (आर्ट्स) शाखेला गतवैभव प्राप्त होईल काय?

मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, असे विचार मांडणाऱ्या प्लेटोच्या मते, “मानवाचे शरीर व आत्मा यांच्यातील उत्कृष्टतेचा पूर्णत्वाप्रत विकास म्हणजे शिक्षण होय”. “शिक्षण म्हणजे संपूर्ण जीवनाची तयारी होय”.

“विद्या विहीन: पशुभि समान:”

“विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाजी” हे आपण ऐकून आहोतच.

     सध्या इयत्ता दहावी नंतरचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांपुढे अनेक शाखा उपलब्ध आहेत. जवळपास दोन दशकांपूर्वी कला (आर्ट्स) शाखेतून बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी डी.एड.चे शिक्षण घेऊन शिक्षकी पेशा स्वीकारला. परंतु पुढे शासनाने हवे त्याला डी. एड. व  बी. एड. महाविद्यालयांची खैरात वाटायला सुरुवात केली. यात प्रामुख्याने राजकारणी व त्यांच्या जवळच्या लोकांचा समावेश होता.

     जवळपास २०१२ च्या पुढे शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया अतिशय संथ गतीने म्हणजेच अगदी नाही प्रमाणे राबविली तसेच शासनाने स्वयं अर्थ सहाय्यीत शाळा व महाविद्यालये वाटायला सुरुवात केली. याचा परिणाम अनुदानित शाळांवर झाला. मागील दोन दशकांपूर्वी दहावीनंतर विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यापूर्वी कमी टक्केवारी म्हणजेच ५० टक्के च्या आत असलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक कमीत कमी दहा वेळा तरी विचार करायचे. परंतु अलीकडे शासनाने गुणांची अट शिथिल करून उत्तीर्ण विद्यार्थ्याला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची मुभा दिली. याचा परिणाम असा झाला की, ज्या विद्यार्थ्याला सायन्सचे स्पेलिंग सुद्धा लिहिता येत नाही, असे विद्यार्थी आता विज्ञान शाखेला प्रवेश घेत आहे आणि स्वयंअर्थसाहित शाळा त्यांना ते देत आहेत. काही कॉलेजेस तर विद्यार्थ्यांना कॉलेजला नियमीत न येता बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची हमी सुद्धा देत आहेत. याचा परिणाम असा झाला की, गत वैभव प्राप्त असलेल्या कला म्हणजेच आर्ट्स,   शाखा जी आपल्याला मानवतेचे ( Humanities) शिक्षण देते आणि ज्यातून उत्तम विचारवंत, अर्थतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, लेखक, कवी, वकील, न्यायाधीश, गायक, संगीतकार, प्रशासकीय अधिकारी आणि महत्त्वाचे म्हणजे उत्तम राजकारणी तयार होतात तीच आता शेवटच्या घटका मोजत आहे.  हीच वेळ वाणिज्य शाखेवर सुमारे पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी आली होती. परंतु सध्या या शाखेला अच्छे दीन आले आहेत. कालाय तस्मौ नम:

     कला शाखेचे आपले एक महत्त्व आहे. या शाखेतून विद्यार्थ्यांना जगाचा व प्रामुख्याने आपल्या देशाचा भूगोल, इतिहास, राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, विविध भाषा इत्यादींचे शिक्षण मिळते. परंतु अलीकडे मुलांना तसेच पालकांना वाटतं की, आपलं मूल लवकरात लवकर शिकून स्वतःच्या पायावर उभं झालं पाहिजे असं वाटतं आणि तसं वाटणं काही वावगं देखील नाही.

      अलीकडे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मध्ये न जाता घरी अभ्यास करून तसेच शिकवणी लावून अभ्यास करणे फार आवडतं. याचा परिणाम अनुदानित शाळा आणि कॉलेजेस वर झालेला दिसतो. स्वयं अर्थ सहाय्यीत शाळा व कॉलेजेस मध्ये विद्यार्थी संख्या ओसंडून वाहत आहे. कला शाखेतून विद्यार्थ्यांना मानवतेचे शिक्षण मिळते. जी आज काळाची गरज आहे. विविध धर्माचे तत्त्वज्ञान याच शाखेतून शिकविले जाते. जगाचा इतिहास तसेच आपल्या देशाचा वैभवशाली इतिहास, सामाजिक परिस्थिती यांचे अध्ययन याच शाखेतून केले जाते. परंतु सध्या याच शाखेला विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. याचा दुरगामी परिणाम समाजव्यवस्थेवर होणार आहे. सध्या समाजात गुन्हेगारी, व्यसन, भ्रष्टाचार, लैंगिक शोषण यांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. ग्रामीण भागातील बरेच विद्यार्थी शॉर्टकटचा मार्ग अवलंबितात. दहावी झाले की लगेच आय.टी.आय करून पुण्या, मुंबई व नागपूर सारख्या ठिकाणी प्रायव्हेट कारखान्यांमध्ये नोकरी करतात. बऱ्याच मुलांकडे कमी वयात पैसे आले म्हणजे समजूतदारीचा, संस्काराचा तसेच उच्च शिक्षणाचा अभाव असल्यामुळे असे मुलं  व्यसनाच्या आहारी जातात. कला शाखेतून समाजशास्त्र सारख्या विषयांतून विद्यार्थ्यांना कुटुंब व्यवस्था, व्यसन म्हणजे काय? व्यसनाचे प्रकार, त्याचे दुष्परिणाम, गुन्हेगारीवर्तन म्हणजे काय? सामाजीकरण, संस्कार, स्त्रियांच्या समस्या, स्त्रियांचे अधिकार, स्त्रियांची कार्यक्षेत्रे इत्यादींबाबत शिक्षण दिलं जातं. मुलांनी कमीत कमी बारावीपर्यंतचे मानवतेचे शिक्षण घेतले तर त्यांच्यामध्ये 18 वर्षाचे वय गाठल्यामुळे समजूतदारपणा येतो. त्यांना काय चांगले आणि काय वाईट, हे कळायला लागतं. आपण ऐकतो, “पैसा खूप काही आहे परंतु तो सर्व काही नाही”. अलीकडे मुलांना मोबाईल, हॉटेलिंग, मोटरसायकलसाठी लवकरात लवकर पैसा हातात आला पाहिजे, असे वाटते. परंतु कमी वयात पैसा हातात आला की मुलांना संगतीतून वाईट गोष्टी सुचतात.

      कला शाखेतून शिक्षण घेणे हे एक संस्कारी पिढी घडविण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. तरी शासनाने कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना मानवतेचे शिक्षण देणे देशाच्या हिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरण, २०२० नुसार इयत्ता नववी ते बारावी पर्यंत हवा तो विषय निवडण्याची मुभा उपलब्ध होणार आहे. परंतु २०३४ उजाळले तरी हे धोरण लागू झाले नाही. या धोरणानुसार शाखा भेद समाप्त होऊन विद्यार्थ्यांना हवा तो विषय निवडता येणार आहे. त्यानुसार विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना कला शाखेचे विषय सोबतच वाणिज्य शाखेचे विषय देखील निवडता येतील. चाकोरीबद्द शिक्षणातून विद्यार्थ्यांची सुटका होणार. परंतु हे धोरण लागू केव्हा होणार, याकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे. कदाचित या नवीन शैक्षणिक धोरणामुळे तरी कला शाखेला गतवैभव प्राप्त होईल, ही अपेक्षा तरी मृगजळासम ठरू नये.

लेखक प्रा. डॉ. अमित सु. धांदे

श्रीमती चंद्रभागाबाई पाकोडे कनिष्ठ महाविद्यालय, मंगरुळ दस्त.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button