प्राथमिक शिक्षण हा बालकांचा मुलभूत हक्क असल्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे देशाला पर्यायाने केंद्र आणि राज्याला बंधनकारक झाले आहे म्हणून निपुण भारत अभियान व निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृतीकार्यक्रम असे कार्यक्रम आपल्याला राबवावे लागत आहेत. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे MDG आणि SDG च्या ध्येयानुसार आपण बांधील आहोत. हे ध्येये संयुक्त राष्ट्रसंघाच्या १८९ राष्ट्रांनी निश्चित केलेल्या MDG (Millenium Development Goals) सह्स्त्राब्दी विकास ध्येये सप्टेंबर २००० मध्ये न्यूयार्क मधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात उपस्थित १४९ प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षरीने अंतिम करण्यात आले. सह्स्त्राब्दी विकास ध्येय हे २००० ते २०१५ पर्यंत साध्य करायचे होते. MDG च्या आठ ध्येयापैकी जागतिक दर्जाचे शिक्षण हे दुसरे ध्येय होते. हे ध्येय साध्य करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलोत म्हणून सन २०१५ पासून ते २०३० पर्यंत SDG (Sustainable Development Goals) शास्वत विकासाचे १७ ध्येय घोषित करण्यात आले. त्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षण हे संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवून दिलेले शास्वत विकासाचे चौथे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्याचे भारताचे सुद्धा एक दीर्घकालीन उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी केंद्र शासनाने ‘निपुण भारत मिशन’ (National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy – NIPUN Bharat) हा उपक्रम जुलै २०२१ मध्ये आणला.

निपुण भारत मिशनचा उद्देश म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पर्यंत इयत्ता तिसरी अखेर सर्व मुलांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करून देणे होय. महाराष्ट्र राज्यानेही याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून. यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय, कृती कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे ‘निपुण भारत’ हे ध्येय साध्य करण्याची वाटचाल जोमाने सुरू केली आहे. निपुण भारत मिशन अभियानाचे मूळ उद्दिष्ट म्हणजे इयत्ता ३ री पर्यंत १०० टक्के विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या मूलभूत कौशल्यांमध्ये प्रावीण्य प्राप्त करणे होय. मुलभूत प्राथमिक शिक्षण पुढील अभ्यासक्रमाचा पायाभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. शाळेतील मुलांना केवळ वाचता येऊन चालणार नाही, तर वाचनासोबत वाचलेल्या मजकुराचा अर्थ लक्षात घेऊन विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देता येणे अपेक्षित आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना स्पष्टपणे वाचता, लिहिता आणि गणिती संकल्पना समजून घेता यावे हा मुख्य हेतू निपुण भारताचा व निपुण महाराष्ट्र अभियानाचा आहे.
निपुण भारताचे शासन निर्णय पाहता, महाराष्ट्र शासनाने २७ ऑक्टोबर २०२१ रोजी निपुण भारताच्या अंमलबजावणीसाठी “निपुण महाराष्ट्र” नावाने राज्यस्तरीय धोरण जाहीर केले. यानुसार इयत्ता बालवाडी ते इयत्ता ३ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवून अंतिम उद्धिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यामध्ये क्षमता वृद्धी सारखे शिक्षक प्रशिक्षण, शैक्षणिक साहित्याचा नाविन्यपूर्ण वापर, तंत्रज्ञानाचा वापर, SQAAF सारखे मूल्यमापन पद्धती आणि पालक सहभाग यावर भर देण्यात येत आहे.
निपुण महाराष्ट्र अभियानाची अमलबजावणी करण्यासाठी ५ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने कृती आराखड्यात सुधारणा करताना राज्य शासनाने अध्ययन क्षमतांच्या लक्ष्यांमध्ये वास्तववादी दृष्टीकोन स्वीकारलेला दिसत आहे. जरी अंतिम उद्दिष्ट १००% विद्यार्थ्यांना निपुण करणे हेच असले, तरी कमीत कमी ७५% विद्यार्थ्यांनी इयत्ता ३ पर्यंत अपेक्षित क्षमतांपर्यंत पोहोचणे हे प्राथमिक लक्ष्य निश्चित करण्यात आले. यात शिक्षकांच्या भूमिकांना अधिक स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले आहेत. कृतिकार्यक्रमामुळे प्राप्त करायचे उद्दिष्टे कमी करून शिक्षकांना प्रोत्साहन दिले आहे. हे करत असताना शासनाने शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचे विशेष गौरव करण्यात येणार आहे.
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृतिकार्यक्रम म्हणजे निपुण भारत अभियानाची ध्येये प्राप्त करण्यासाठीच घेतलेला पुढाकार असून प्रगतीच पावूल म्हणाल्यास वावगे ठरणार नाही. हा कार्यक्रम ५ मार्च ते १५ जून पर्यंत चालणार आहे. यामध्ये प्रत्येक महिन्यातील ५ तारीख व २० तारीख अश्या दोन दिवशी मुलांचे मूल्यमापन करण्यात येणार असून हे मूल्यमापन पर्यवेक्षीय यंत्रणेच्या निगराणीखाली केल्या जाणार आहे. अश्या पद्धतीने एकूण आठ वेळा मूल्यमापन करून उच्च क्षमता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. याची अंतिम मूल्यमापन १५ जुलै रोजी पर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील शाळेने एक स्वयंसेवक व शिक्षकांच्या मदतीने ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अध्ययन अध्यापन केल्या जात आहे.
निपुण महाराष्ट्र अभियानात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (SCERT) यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरत आहे. SCERT पुणे ही संस्था निपुण महाराष्ट्राच्या योजनांची आखणी, अभ्यासक्रम नियोजन, शिक्षक प्रशिक्षण आणि मूल्यमापन प्रणालीच्या संदर्भात केंद्रबिंदू ठरलेला आहे. त्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कृतिकार्यक्रम, शैक्षणिक साहित्याचा वापर, मूल्यमापन साधने, विविध चर्चासत्रे व प्रशिक्षण सत्रे यामुळे शिक्षक अधिक समृद्ध झाले आहेत. SCERT चे प्रशासन जिल्हाप्रशासन व तालुका स्तरावरील प्रशासानास अमूल्य असे मार्गदर्शन व संवाद सत्र चालू करण्यात आले आहेत. यामध्ये शासनाने ५ मार्च ते १५ जून २०२५ पर्यंत कृती कार्यक्रम राबवण्यासाठी समृद्ध असा आराखडा तयार करून दिलेला आहे.

शासनाकडून चावडी वाचन हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यातून लोकसहभागातून वाचन संस्कृतीची चळवळ उभारली जात आहे. चावडी वाचन हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत अभिनव आणि लोकसहभागावर आधारित उपक्रम आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ शाळेमध्येच नव्हे, तर समुदायामध्येही वाचन करण्याची सवय लागावी यासाठी ‘चावडी’ (ग्रामसभेची पारंपरिक जागा) येथे वाचन सत्रे घेतली जाता आहेत. यामुळे आपल्या पाल्याला काय येते आणि काय येत नाही याची प्रचीती येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाचन लेखन येते त्याचं पाहून मागे असलेली मुले त्यांच्या बरोबर येण्यासाठी जोमाने प्रयत्न करत आहेत. चावडी वाचनामुळे विद्यार्थी शिकण्याबाबत अधिक उत्साही झाले आहेत. वाचनाची गती व आकलन सुधारले आहे. वडीलधारी लोकांमध्येही वाचनाविषयी नव्याने आवड निर्माण झाली आहे. ‘निपुण भारत अभियान’ ही केवळ शैक्षणिक योजना नसून, देशाच्या सामाजिक-शैक्षणिक विकासासाठी आवश्यक असलेली चळवळ आहे. महाराष्ट्र राज्याने याकडे गांभीर्याने लक्ष दिले असून ‘निपुण महाराष्ट्र’ या माध्यमातून राष्ट्रीय उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी सुसंगत प्रगतीच पाउल टाकले आहे. शासन, शिक्षक, पालक, SCERT आणि लोकसहभाग हे या यशस्वी वाटचालीचे आधारस्तंभ ठरत आहेत. विशेषतः चावडी वाचन यांसारखे उपक्रम ही केवळ शाळेबाहेरची वाचन चळवळ नसून शिक्षणातील सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहेत. अशा सर्व प्रयत्नांमुळे महाराष्ट्र निश्चितच निपुण भारताकडे ठामपणे वाटचाल करत आहे. म्हणून २०२६ पर्यंत महाराष्ट्र निपुण भारताचे सर्व उद्धिष्ट प्राप्त करणार पाहिलं राज्य ठरणार यात काही शंका नाही.
लेखक भद्रे राजू गौतम, एम. ए. राज्यशास्त्र (सेट), संशोधक विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरळी, ता. बिलोली, जि. नांदेड, मोबाईल 8180981359
शिक्षक ध्येय नेटवर्क: श्री. विजय वसंत अहिरे
उपसंपादक, साप्ताहिक शिक्षक ध्येय, नंदुरबार, मो. 9421538621