पूर्वीच्या काळी आईबाबांचा मुलांना धाक असे. वावगे वागलेले काहीच खपवून घेतले जात नसे. त्यामुळे शाळेला दांडी मारून आमराईत गेले किंवा शाळा बुडवलेली बाबांच्या कानावर पडले की शिक्षा ठरलेलीच! गुरुजींनी काही तक्रार केली तर गुरुजींना मुलांना बदडुन काढण्याची पूर्ण परवानगी असायची. उलट घरातही मार ठरलेलाच! रात्री बेरात्री घराबाहेर भटकायला वाव नसायचा. शिवाय परीक्षेत कमी मार्क पडलेले, नापास झालेले अजिबात चालत नसे. त्या काळी प्रत्येक गोष्टींना बंधने असायची. आतासारखे मॉल्स, पिकनिक किंवा मित्र-मैत्रिणींसंगे भटकंती नसायची. तंबूतल्या थेटरात सिनेमा पाहायला एक रुपये तिकीट असायचे ते ही कटाकटीने जायला मिळायचे.
आठवड्यातून एखाद्या वेळीच लिमलेटच्या गोळ्यासाठी पाच, दहा पैसे हातावर टेकवले जात. बाबांना किंवा ज्येष्ठ व्यक्तींना काही उलटून विचारायची किंवा बोलायची मुलांच्यात हिंमत नसायची. त्यामुळे त्या वयाच्या मुलांना बाबा हिटलरच वाटत! काही हवे असेल तर आईकडे मस्का लावला जाई. चांगल्या वागणुकीची गॅरंटी घेतली जाई. मगच आईचेही हृदय पाघळले जाई. नाही तर प्रत्येक गोष्टीत नन्नाचा पाढा ठरलेलाच. त्यांचा होकार फक्त अभ्यासाच्या वस्तू आणण्यासाठी असे. या व्यतिरिक्त सर्व गोष्टी त्यांच्यासाठी वायफळ खर्चाच्या. मुलांनी फक्त मन लावून अभ्यास करण्याचे ध्येय ठेवावे अशी त्यांची कल्पना असायची. त्यामुळे वर्षातून दोन वेळा नवी कपडे न मागता देणे आणि घरातील भरपेट भोजन हे पालक म्हणून देण्याचे त्यांचे परमकर्तव्य असायचे. त्याकाळी चैनीला काही वाव नसायचा. काळ बदलला, त्याकाळी विद्यार्थी असणारी मुले आता बाबा झाली. आपल्या मनातील, हृदयातील सुप्त भावना, इच्छा-आकांक्षा पूर्ण होण्यासाठी त्यांना आता चांगली संधी प्राप्त झाली. कारण गुरुजी आणि बाबांच्या शिस्तीत शाळा शिकून त्यांनी चांगली नोकरी मिळवली. लग्न होऊन सुसंस्कृत, सुगरण पत्नी लाभली. जीवनाचे सार्थक झाले. परंतु आपल्या बालपणीच्या सुप्त इच्छा मुलांकडून पूर्ण करू अशी भावना निर्माण झाली. मुलांना फिरायला नेणे, मॉल्समध्ये मस्त शॉपिंग, स्पोर्टसच्या वस्तू खरेदी करून आणि नवीन कपडे सणासुदीला फटाके, मिठाया यांची रेलचेल. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर मुलांच्या अभ्यासाची सहज चौकशी करणे असे प्रेमळ बाबा. मुलांना शिकायला चांगल्या शाळा, भरपूर फी असणारे क्लास लावल्याने चांगले मार्क्स मिळणार अशी खात्री. तसेच कार्यालयीन कामकाजात व्यस्त असल्याने फावल्या वेळेत मुलांशी गप्पा गोष्टी करणे, बैठे खेळ खेळणे यामुळे मुलांना बाबांचा धाक वाटेनासा झाला.
मुलांना मित्राप्रमाणे वागवले गेल्याने आतल्या आत कुढत बसण्यापेक्षा मुले बाबांना आपले मनोदय बिनधास्त सांगू लागली. खांद्यावर हात टाकून बोलण्याची त्यांच्यात हिंमत आली असून प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणे नसल्याने मित्र-मैत्रिणींसोबत पिकनिक, शॉपिंग होऊ लागले. बाबांचा धाक वाटण्याऐवजी मुले आपले सर्व अनुभव बाबांशी शेअर करू लागली. एखादी मुलगी आवडली आहे आणि तिच्याशी लग्न करायचे आहे एवढे सांगण्यापर्यंत असा मोकळेपणा आला आहे. त्यामुळे पालकांशी बोलताना मुलांच्या मनात दडपण राहत नाही. आई-वडील ही तितकेच मुक्तपणे त्यांच्याशी संवाद साधतात. मुलगी आईची मैत्रीण बनते आणि नवीन पिढीत समरस होणारे पालक आतून-बाहेरून सुखी समाधानी होतात. नात्यातील दरी राहत नाही. आई-वडील उच्चशिक्षित, समजदार असल्याने मुलेही समाधानी राहतात.
सौ. भारती सावंत
खारघर, नवी मुंबई 9653445835