इच्छा तिथे मार्ग

उच्चपदापर्यंत पोहोचण्यासाठी गरिबी आड येत नाही. परिस्थिती कशी असली, तरी तिच्यावर मात करून ध्येय गाठता येते, असाध्य ते साध्य करता येते, हे डहाणू तालुक्यातील एका आदिवासी युवकाने दाखवून दिले आहे. महेश सूरज गोरात असे या युवकाचे नाव आहे.

डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेला आणि कासा येथील माध्यमिक शाळेत शिक्षण घेऊन नंतर महाविद्यालयीन शिक्षणात बीएस्सी (आयटी) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महेशच्या डोक्यात वेगळे काहीतरी करण्याचा मानस होता. पुढे त्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात एम. एस्सी करत असतानाच मायक्रोसॉफ्ट कंपनीत त्याची डाटा सायंटिस्ट म्हणून निवड झाली.

४४ लाखांचा पगार

महेश मधील गुणवत्ता हेरून बिल गेटस्‌च्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत त्याला ४३ लाख ७७ हजार रुपये पगार दिला आहे. याशिवाय जॉइनिंग बोनस म्हणून वीस लाख रुपये दिले आहेत. शिवाय दरवर्षाला वेगळे पॅकेजही मिळणार आहे. घरात कोणीही शिकलेले नसताना आणि मार्गदर्शन नसताना, गरिबी पाचवीला पूजलेली असताना केवळ एका ध्येयाने प्रेरित होऊन त्या ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी अतोनात कष्टाची तयारी महेशने ठेवली होती. त्यासाठी त्याला त्याच्या शिक्षकाची मदत झाली. हे शिक्षकही असा, की मदतीचे या कानाचे त्या कानाला कळू न देण्याची त्यांची अट होती. या मदतीतून आपण घडल्याचे महेश अभिमानाने सांगतो.

आयुष्याच्या वेगळ्या वाटेवर

दुर्गम, आदिवासी भागातील मुलेही संधी मिळाली, की असाध्य ते साध्य करू शकतात, हे महेशने आपल्या ध्येयपूर्तीतून दाखवून दिले आहे. त्याला आयुष्यात व्हायचे वेगळेच होते; परंतु एका वेगळ्या टप्प्यातून मायक्रोसॉफ्टने त्याला दिलेली संधी त्याला दुसऱ्या दिशेने घेऊन गेली; परंतु त्याच्या आयुष्याचे कल्याण झाले. त्याचे डाटा विश्लेषणातील ज्ञान आणि त्याची हुशारी लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट कंपनीने केवळ त्याला नोकरी दिली नाही, तर अमेरिकेचे ग्रीन कार्डही दिले. वर्षानुवर्षी अमेरिकेत राहणाऱ्यांनाही सहजासहजी असे ग्रीन कार्ड मिळत नाही.

राष्ट्रपतींनी दिल्लीला बोलवून केला सन्मान

एक आदिवासी मुलगा डहाणू तालुक्यातून येतो आणि तो अमेरिकेच्या एका मोठ्या कंपनीत उच्च पदाची नोकरी मिळवतो याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत बोलावून कौतुक केले. त्याचा सत्कार केला.

डहाणू येथील आदिवासी प्रकल्प विभागाचे सत्यम गांधी व अन्य सहकाऱ्यांनी महेशचा सत्कार केला. नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ग्रामीण भागातील मुलांनी यशाचा झेंडा रोवला असताना आदिवासी दुर्गम भागातून आलेल्या मुलाने यशाची एक वेगळीच वाट इतरांना दाखवली असून त्याचे हे यश निश्चितच अनेक आदिवासी दुर्गम भागातील मुलांना प्रेरणादायी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button