मुख्यपृष्ठ कथा
बालपणीच्या आठवणी मनात आल्या की आपण आनंदाच्या डोहात बुडून जातो. शरीर आणि मन एक होऊन जातं.
चाळीस पन्नास वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झालेला आहे, खरं बालपण तर त्यांनीच अनुभवलं. बालपणीची एक जरी आठवण मनात आठवली की आनंदाचा, स्वप्नांचा गारवा पूर्ण शरीरात संचारला जातो. एक वेगळीच आनंदाची अनुभूती, गंमत वाटत असते. आजही दु:खाच्या वेळी बालपणीची एक आठवण सुद्धा त्यावर औषध म्हणून काम करते. बालपणीची खरी मजा, खरं सुख याच दशकांतील लोकांनी अनुभवले आहे.

मला ३ वर्षाचे असताना बालवाडीत टाकले.. पुढे तीन वर्ष तिथेच मुक्काम झाल्यावर पहिलीत आगमन झाले. एक वायरची पिशवी, त्यात एक दगडी पाटी, पेन्सिल, आलकंपी, जरमेलच्या डब्यात शेव मुरमुरे घेऊन पहिलीच्या वर्गात प्रवेश केला. आई सोबत होतीच. सर्व नवीन, बाई, इतर पोरं, पोरी सर्वच अनोळखी. हे सारं बघून मी भोकाड पसरलं आणि पळत पळत माघारी आईला येऊन बिलगलो. मला घरी जायचयं, मी परत जुन्याच शाळेत जातो, पण इथे नको, आई घरी जाऊ आपण.. परिणाम तोच झाला आई मला एकटं ठेऊन घरी निघून गेली. सुमारे अर्धा तास रडून रडून थकल्यानंतर मी नाईलाजाने रडणे बंद केले. बाईनी जवळ बोलावून विचारपूस केली. छान वाटलेय.. नंतर शिकविण्यास सुरुवात झाली, १..२..३.. म्हणायला सांगितले. गाणी म्हटली, डब्यातील खाऊ खाल्ला, गोल काढला, सुटली शाळा..
अशी ही शाळा चार आठ दिवसात आवडू लागली.
सफेद शर्ट, खाकी पँट, हातात कापडी पिशवीत पाटी, एक दोन पुस्तके, पाटी वरची पेन्सिल, डबा इत्यादीने शालेय आनंदी प्रवास सुरू झाला.
वडील पोलीस खात्यात नोकरी करीत असल्याने दर चार पाच वर्षाला बदली अन् माझी नवीन शाळा.
पाचवीनंतर हायस्कूलात गेलो. खेडे गावात बदली झाल्याने घरापासून ३ किमी दूर शाळा. वेळ १२ ते ५.
रेडिओवर कामगार सभा सुरू झाली की तयारी करून आम्ही ४-५ मित्र निघायचो. पायी पायी.. पायात ना चप्पल ना बूट.. अनवाणी.. शॉटकटचा रस्ता नदीतून जात असे. नदीला बाराही महिने पाणी नसे. दुपारची वेळ.. नदीतील वाळू तापलेली.. अन् आमचा त्यावरून अनवाणी खडतर प्रवास… चटके सहन करीत शाळेत पोहचल्या पोहचल्या नळ चालू करून त्या खाली पाय धरायचं.. तेव्हा कुठं बरं वाटायचं..
ज्यांनी घरचा अभ्यास केलेला नाही त्यांना प्रसाद वाटप झाल्यानंतर शिकणं – शिकवणं सुरू व्हायचे. आनंदात कोणतेही टेन्शन न घेता शिकत होतो आम्ही सारे अन् शिकवत होते सर.
मधली सुट्टीत रिंगण करून जेवणाची मजा घेत, सर्वांच्या डब्यातील खाऊ, चिंचा, बोरं, जांब, पोहे संपल्यानंतर १० मिनिटे पकडा पकडी, कापडी बॉलने आबाढोबी, लपाछपी खेळत असताना घंटा वाजायची. शाळा भरायची. लेमनची गोळी शर्टाच्या खालील कोपऱ्यात ठेऊन दाताने तोडून शेजारी बसलेल्या मित्राला अर्धी देत असताना मोठा आनंद व्हायचा.. त्यावेळी वर्गात सर्व मित्र मैत्रिणी एकोप्याने शिकत असे. यात ना कधी गरिबीचा अडसर आला ना कधी जातीचा! दोन तासांनंतर शाळा सुटली की धूम ठोकत सकाळपेक्षा कमी वेळेत घरी हजर.. पाटी दफ्तर भिरकावले की खेळायला मैदानात.. आम्ही सारे मित्र मैत्रिणी विविध खेळ खेळत.. कोणताही भेदभाव न करता..

सहामाही परीक्षानंतर दिवाळीची सुट्टी…
सुट्टीत विविध प्रकारचे खेळ खेळत, आईला दिवाळीचा फराळ करायला मदत करून दारावर एक वायर, होल्डर, पिन आणून आकाश कंदील लटकवला की झाली दिवाळी सुरु.. नाणाविविध खेळ खेळत, मित्र मैत्रिणींच्या घरी फराळ खात खातच सुट्या संपायच्या.. अन् शाळा सुरु व्हायची. तीन चार महिने नियमित शाळा – घर असा प्रवास करून वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करत करत अखेरचे आनंदाचे दिवस यायचे.. विविध वार्षिक स्पर्धा, बक्षिसं, स्नेहसंमेलन, नाचत, गाणे म्हणत, बक्षिसे घेत.. कार्यक्रम पार पडायचा. शाळेत दरवर्षी एक आदर्श विद्यार्थ्याची निवड करीत त्याला बक्षीस दिले जायचे. पाचवीत असताना आदर्श विद्यार्थी म्हणून बक्षीस घेतांना मला खूप मोठा आनंद झाला होता.
वार्षिक परीक्षा देऊन इयत्ता संपायची.
१ मे निकालाचा दिवस.. लवकर उठून तयारी करून आई वडिलांच्या पाया पडून सातला शाळेत हजर. आईचे शब्द आठवायचे, ‘तुझा पहिला नंबर आला पाहिजे!’
त्याची पूर्तता करून निकालाचे पिवळे पत्रक घेऊन पळतच घर गाठायचो.. आई.. आई .. बघं.. आला की नाही पहिला नंबर .. देवापुढे साखर ठेवत आनंदात खेळायला धूम ठोकायचो. या वयात ना कशाची चिंता, ना कशाची भीती ना काळजी. त्यावेळी आमचे खेळ.. भवरा, गोट्या – गोटया, विटी दांडू, (विटी म्हणजे पॅराशुट तेलाची प्लॅस्टिकची बाटली) लंगडी लंगडी, गज, टायरची चकारी, आबाधोबी, बॅट बॉल (मोजे मध्ये जुनं कपडा घालून शिवलेला चेंडू), लपाछपी…असे अनेक खेळ खेळून आलं की आई भूक लागली काहीतरी खायला दे.. कधी कधी तर मित्रांच्या घरीच जेवण करून स्वारी रात्री झोपायलाच आठ वाजता घरी.. दिवसभर बाहेर खेळणे, उंदडणे, शेतातील झाडावरील चिंचा, आंबे, जांब, बोरं (चोरून) तोडून खाण्यात त्यावेळी जी मज्जा यायची त्याची सर आजकालच्या पिझा, बर्गर, वडापावला सुद्धा नाही येणार! तब्बल दीड महिना असा खास कार्यक्रम चालायचा.
१५ जूनला शाळा भरायची.. नवीन वर्ष सुरू, पुढील इयत्ता पास झालेल्या मित्राची पुस्तके घ्यायची. निम्म्या किमतीत.. कॅलेंडरच्या पानाचे किंवा पेपरचे (वर्तमानपत्राचे) नवीन कव्हर प्रत्येक पुस्तकाला लावायचे.. असलेल्या जुन्या वह्यांचे कोरे पाने फाडून घेत त्याची वही घरीच शिवायची. दप्तराची पिशवी, शर्टाचे बटणं, पँटला ठिगळ दिले की झाली तयारी.. नवीन इयत्तेची…
खरे बालपणात या वेळच्या मुलांनीच अनुभवले असे मला नेहमी वाटते. त्यावेळी माणसा – माणसामध्ये माणुसकी भरगच्च भरलेली होती हो.. सर्व जण एकमेकांच्या सुख दु:खात हसत हसत सहभागी व्हायची. एकत्रित सर्व सण साजरा करायची. इंटरनेटचा स्पर्शही नसल्यामुळे, आम्ही सर्व मैदानी खेळाशीच जोडलेले असायचो कारण तेव्हा नव्हते सोशल मिडिया, ना घड्याळ. आयुष्यात सगळ्यांनाच आपलं म्हणावं, आपलं मानावं, असं आमच्या बालपणाने आम्हाला शिकवलं.
आजकालच्या मुलांना काय कळणार बालपणीच्या आठवणींचा आनंद काय असतो ते.
लिहण्यासारख्या भरपूर आठवणी आजही ताज्या आहेत.. त्यातील काही निवडक…
पास / नापास एवढेच आम्हाला माहीत होतं…
शिकवणी काय भानगड आहे हे आम्हाला माहीत नव्हते…
दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स लावणे, हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा…
कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या व्यवस्थित रचण्यातच आमचं कौशल्य अवगत होतं.
पाचवीपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत, लिहीत कॅल्शियमची कमतरता भरून काढायची आमची सवय.
पुस्तकामध्ये पिंपळाच्या झाडाची पानं आणि मोरपिस ठेवून आम्ही खूप हुशार होऊ शकतो? असा आमचा विश्वास होता..
अभ्यास करतांनाचा वेळ आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक, शर्टची कॉलर चावून घालविला होता..
शाळेत शिक्षकांचा मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना, वर्गाबाहेर तासनतास उभ राहतांना आमचा ‘स्वाभिमान’ कधीही आडवा येत नव्हता…
एकदा शाळेत नाव टाकले की परत आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी फिकीर नव्हती, पुन्हा वर्षभर कधीच ते शाळेत आले नाही आणि आमच्या शिक्षणाचा आर्थिक भार त्यांना कधीच जाणवला नाही.
आम्ही सायकलवर ट्रिपल सीट किती फिरलो हे आता आठवतही नाही…
शाळेत गुरुजी मारायचे आणि घरी सांगितले तर घरी ही पुन्हा मार बसायचा! शाळेत आणि घरी मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाची प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की, ‘चला, कालच्या पेक्षा तरी आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून…
आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही काय काय करु शकतो..
आम्ही शाळेत मुले मुली एकत्र शिकत असतांना आताचे ‘चाळे’ कधी ध्यानीमनी देखील आले नाही. आय लव यू हा शब्दच आम्हाला माहीत नव्हता, पण आम्ही सर्वांवर निरागस, नितळ प्रेम केले.
आज आम्ही खस्ता खात, संघर्ष करत शिक्षण पूर्ण करून जगात वावरतोय. आमच्यापैकी काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय तर काही मोठे अधिकारी झालेत..
आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की, आम्ही वास्तव दुनियेत जगलो आणि वास्तवात वाढलो.
शाळेत, घरी, मैत्री, नात्यांमध्ये राजकारण करणं आम्हाला कधी जमलंच नाही. त्याबाबतीत आम्ही मूर्खच राहिलो.
आपल्या नशिबावर विश्वास ठेऊन आम्ही आजही अनेक स्वप्नं पहातोय. हीच स्वप्न आम्हाला जगायला आज मदत करताय.. आम्ही आज चांगले असू किंवा वाईट पण बालपणी शाळेत आणि मैदानी खेळात जी मज्जा आम्ही केली ते आत्ताच्या मुलांना स्वप्नवत वाटते.. पण आमचाही एक ‘जमाना’ होता.
मधुकर घायदार, नाशिक 9623237135