मतदान: एक जबाबदारीची जाणीव

भारतीय संस्कृतीत अनेक उत्सव आपण साजरे करीत असतो. सण, समारंभ, जन्मदिन असे… असाच लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव कोणता असेल? तर निवडणूक….. निवडणुका म्हटले की मतदान आलेच. आणि मतदान करताना एक जबाबदारीची जाणीव ठेवून आपण मतदान करणे आवश्यक आहे. यामध्ये शासन स्तरावर, शाळा स्तरावर मतदानासाठी जनजागृती केली जात आहे. मला माझे पहिले मतदान आठवते…. एक अविस्मरणीय क्षण!… तो एक उत्साह आणि जबाबदारीची जाणीव.

       सर्वात मोठी लोकशाही असणारा भारत देश… परंतु मतदान होत असताना शंभर टक्के व्हायला हवे ते होत नाही. का बरे? यामागचे कारण काय? तर सुशिक्षित वर्ग मतदानाबाबत खूप उदासीन असतो. तर ही स्थिती बदलायला त्यांची मानसिकता बदलायला हवी. मतदानाच्या आधीपासूनच वेगवेगळ्या प्रसार माध्यमाद्वारे मतदान जनजागृती केली जाते. मतदानासाठी सरकारी सुट्टी ही दिली जाते. बरेच सुशिक्षित मंडळी सुट्टी देऊन ही मतदानासाठी जात नाहीत तर सुट्टी घरीच मजेत साजरी करतात. खरंतर एक-दोन तासाच्या कामासाठी सुट्टी देणे आवश्यक नसूनही सुट्टी दिली जाते. परंतु अनेक जण त्याचा उपयोग मतदानासाठी करत नाहीत, मस्त एन्जॉय करून सुट्टी घालवतात. मतदानासाठी जात नाहीत. या लोकांमध्ये जबाबदारीची जाणीव  आहे का? हे आपल्याला दिसतेच.  आज आपल्याला लोकशाहीचा अभिमान असायला हवा. मतदान करणे हे आपल्याला राज्यघटनेने दिलेला एक हक्क, कर्तव्य, अधिकार आहे आणि ते आपण बजावले पाहिजेच. गरीब श्रमिक मतदान करतात आणि आपले देशाप्रती कर्तव्य बजावत असतात. परंतु जे मतदान करत नाहीत त्यांचे सर्वेक्षण करायला हवे. किती जणांनी मतदान केले नाही? आणि का? हे जर कळाले तर त्यावर आपल्याला उपाय काढता येईल. कधी – कधी असे वाटते की मतदान न  होणे हे काही राजकीय पुढार्‍यासाठी सोयीचे तर नाही ना? बघा यावर्षीचा उन्हाळा, तापमान आणि मतदान… यामुळे नक्कीच मतदानाच्या टक्का घसरण्याची शक्यता वाटतं आहे. त्यात २० मे मुंबईमध्ये मतदानाचा दिवस.. अर्ध्यापेक्षा जास्त मुंबई या उन्हाळ्यामध्ये खाली होताना दिसत आहे. परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या मतदानाचा हक्क मतदान करून बजावायला हवा आणि देशाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करायला हवी आणि चांगले सरकार नेमून द्यायला हवे.

   काहीजण मतदान करीत नाहीत याची वेगवेगळी कारणे असू शकतात. काहींना वाटते आजकाल सगळा कारभार भ्रष्टाचाराचाच आहे, कशाला मतदान करायचे? काहींना वाटते मी मतदान न केल्याने काय होणार आहे? तर आपण कशाला मतदान करायला हवे, काहींना वाटते आपला उमेदवार निवडून येणारच आहे. तर आपल्या एका मतांनी काय होणार आहे.

 आपल्या देशाच्या राज्यकारभार कोणत्या पक्षाच्या हाती द्यायचा याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे आणि घटनेने दिलेली ही एक मोठी देणगीच…. तरीही मतदार राजा मतदानापासून अलिप्त राहतात. तर सर्वांनी मतदानाच्या दिवशी मतदान करून आपली जबाबदारीची जाणीव  पूर्ण करायला हवी म्हणून मी आठवण करून देत आहे की… आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात 100% मतदान व्हायला हवे. परंतु उलट परिस्थिती आज आपण पाहतोय खरंतर कोणत्या पक्षाच्या हाती देशाचा राज्य कारभाराची धुरा द्यायची हे केवळ 50 ते 60 टक्के मतदान करणाऱ्या लोकांमुळेच ठरते. काहीजण मत देणारे तर उरलेले मतदान न करणारे असतात.

       तर सर्वांनीच विचार करून कोणत्याही आमिषाला बळी न जाता प्रामाणिकपणे योग्य त्या उमेदवाराला आपले मत देऊन आपले कर्तव्य बजावायला हवे. काहीजण लोभाने मतदान करीत असतात. आजकाल ही परिस्थिती थोडीफार बदललेली आहे. भले तो उमेदवार कसाही असो पण पुढील पाच वर्षे आपणास त्याच्या हाती आपल्या देशाचा कारभार सोपवणार आहोत हा विचार आपण सर्वांनी करूनच मतदान केले पाहिजे. काहीजण असा विचार न करता मतदान करून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवताना दिसतात.

    मला इतके सांगायचे आहे की देशाच्या प्रत्येक नागरिकांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे तरी मतदानाचा हक्क बजावून योग्य उमेदवारास मत देऊन मतदान करून एक संवेदनशील नागरिक असल्याची जबाबदारीची जाणीव स्वतःमध्ये करून घ्यायला हवी, मतदानाच्या दिवशी मत देऊन आपला हक्क बजावायलाच  हवा.

देशाच्या विकासासाठी

करूया आपण मतदान

कर्तव्य हक्क बजावुनी

बाळगू लोकशाहीचा अभिमान

सौ. संगिता तुळशीराम पवार

विक्रोळी (मुंबई)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button