महत्त्व अक्षयतृतीयेचे..

हिंदू संस्कृतीत सण सोहळ्यांना फार महत्व प्राप्त झाले आहे. हे सण साजरे करण्याच्या पाठीमागे काही ना काही तरी इतिहास असतोच. हिंदू संस्कृती उच्च संस्कृती मानली जाते. त्या संस्कृतीच्या विचारानुसार मनुष्यजन्म प्राप्त होणे म्हणजे जन्म-मरणाच्या चक्रातून कायमची सुटका करून घेण्याची ही एक संधी असते. मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनाचं सोनं करण्याची ही संधी असते. नाहीतर पुन्हा तो जीव त्याच त्या फेऱ्यांत अडकत राहतो. अक्षय तृतीया या दिवसाचे महत्त्व म्हणजे या दिवशी भुकेलेल्यांना, तहानलेल्यांना पाणी देणे. वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्रदान केल्यास आपल्या गाठीशी पुण्य जमा होते. अक्षय म्हणजे क्षय न होणारे, अक्षय रहाणारे होय. त्यामुळे या सणादिवशी दानधर्म करण्याला फार महत्त्व आहे. खऱ्या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. कोणाविषयी कृतज्ञता तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांच्या महतीसाठी.या देहाला त्यांच्यामुळेच सर्वकाही मिळाल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे, चैतन्य मिळाले आहे. तसेच कृतज्ञता व्यक्त व्हावी पितरांविषयी. त्यांच्यामुळे आपल्याला मनुष्याचा जन्म मिळालेला आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, जलदान, वस्त्रदान करण्यात येते. वैशाख महिन्याच्या शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी करण्यात येते. या दिवशी निसर्गाचे दर्शनदेखील फार विलोभनीय असते. कारण चैत्र पालवीचा हा ऋतु. वसंताचे आगमन झालेले असते आणि वृक्ष लतिकांवरची जुनी पाने गळून आता त्या ठिकाणी कोवळी पोपटी पाने उगवलेली असतात. सर्व झाडांना नवीन फुलोरा फुललेला दिसतो. निसर्ग चैतन्याने भारून गेलेला असतो.
सर्व परिसर विविध फुलांच्या ,आंब्याच्या मोहराच्या गंधाने दरवळुन गेलेला असतो. पक्षी देखील आनंदाने चिवचिवत असतात कारण त्यांना खायला कोवळा चारा मिळालेला असतो. झाडांच्या पानांतून लपायला, फांद्यांच्या बेचक्यात घरटी बनवायला त्यांना जागा मिळालेली असते. फुलपाखरे, मधमाशा, भ्रमर यांना फुलांमधील मकरंद शोषून घेण्यासाठी चांगली संधी असते. झाडांना करडा तपकिरी रंग प्राप्त झाल्यामुळे पक्षांना लपायला जागा मिळते.आमराईमध्ये लगडलेल्या कैर्‍या खाण्यासाठी विविध प्रकारचे पक्षी किलबिलाट करत आम्रवृक्षांवर रूंजी घालताना दिसतात. बुलबुल, दयाळ, पोपट, फळांनी लगडलेल्या फांद्यांवर बसलेली दिसतात. कोकिळा सुरेल आवाजात गाणे गात असते. कोवळी तृणपाती तरारून उठलेली दिसतात.


रानफुले गंधाळून गेलेली असतात. सर्वत्र निरनिराळ्या गंधांनी भारित झालेला हा परिसर मोठा मनोहारी दिसतो. अवघी सृष्टी उन्हांत भाजून निघालेली असते आणि त्या घामेजलेल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी वृक्षाखाली छायेत झोपण्याचे सुख किती सुखकारक! त्याप्रमाणे आपल्या संस्कृतीत साडेतीन मुहुर्तातला हा अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन वास्तू, वाहन, वस्तू, व्यवसाय आरंभ शुभकार्य, सामाजिक कार्य केल्यास हमखास यश मिळते असे मानले जाते. यादिवशी लोक हमखास सोन्याची खरेदी करतात. धार्मिक रीतिरिवाजानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या दिवंगत आई,वडील, आजी, आजोबा, आप्तस्वकीय, पूर्वज यांच्या स्मरणार्थ ब्राह्मणांना जलकुंभ दान करतात. बऱ्याच लोकांना या दिवशी काम करण्याची संधी असते. वैशाख महिन्यात सर्वत्र गुऱ्हाळे जोरात चालू असतात. त्यामुळे उसाचा रस पिण्यासाठी सर्वत्र झुंबड दिसते. अक्षय तृतीया संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केली जाते.विदर्भात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. पितरांच्या स्मृतिप्रित्यर्थ घराघरातून अन्नदान केले जाते.
या दिवशी नैवेद्याला पुरणपोळी, चिंचेचे सार, कानवले, आंब्याची डाळ, कवठाची चटणी, पन्हे, डाळवडे, भात वरण, भाजी भजे असा साग्रसंगीत बेत असतो.न पितरांना खाऊ घालणे म्हणजे कावळ्यांना खाऊ घालणे असे समजले जाते.त्यावेळी कराची पूजा केली जाते. या दिवशी नागरी नांगराची पूजा करून शेतीच्या कामांना नांगरणीला सुरुवात करण्यात येते. म्हणजेच चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी होते. निसर्ग, इतर पशुपक्षी, शेती यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतो.

सौ. भारती सावंत
खारघर, नवी मुंबई 9653445835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button