हल्ली मुलांचं शिक्षण म्हणजे काय? असा प्रश्न त्यांच्या पालकांना विचारला, तर १० वी, १२ वी नंतर मेडिकल, इंजिनिअर, फार्मसी किंवा कॉम्प्युटर असेच काही सरधोपट मार्ग सांगितले जातात. मुलांना विचारले तर आनंदच दिसून येतो. बऱ्याचदा आई वडील सांगतात तोच त्यांचा मार्ग ठरत असतो. फारसा विचार करण्याची तसदी ते घेत नाही. तशी त्यांना आवश्यकता वाटत नाही, तसेच संस्कार त्यांच्यावर केले जातात. कारण आई वडीलांना आपल्या मुला-मुलींना सर्व काही उपलब्ध करून द्यायचे असते. त्यासाठी त्यांना कोणतेही कष्ट होऊ नये अशीच अपेक्षा असते. आपण म्हणू तिच पूर्व दिशा असते. एकंदरीत करिअर म्हणजे पैसा, प्रतिष्ठा याकडे जाणारा मार्ग! असा काहीसा समज! आपल्या ज्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, त्या मुला- मुलींच्या बाबतीत पूर्ण करून घ्यायच्या असा एक मतप्रवाह दिसून येतो. यामध्ये बऱ्याचदा मुला-मुलींच्या आवडीनिवडीचा काही विचारच केला जात नाही नाही असे होते. मुलामुलींचे करिअर घडवणे, हे एक दिव्य ठरावे! तसे अवघडच काम! त्यासाठी पालकांनी थोडी पूर्वतयारी करायला हवी. विचारमंथन करायला हवे. मार्गदर्शन घ्यायला/द्यायला हवे. विविधांगी पर्यायांचा विचार करायला हवा. भविष्यातील योग्य-अयोग्य बदलांच्या बाबत विचार करूनच त्यांना योग्य मार्गदर्शन व्हायला हवे. करियरसाठी कोणतेही विचार मुलामुलींवर लादले जाऊ नये, तर ते त्यांच्या आयुष्याचे स्वतः शिल्पकार ठरावे, यासाठी प्रत्येकाने काही मुद्दे लक्षात घेणे मला आवश्यक वाटते.

१. आयुष्य –
आपल्याला माणसाचा जन्म ही एक संधी मिळालेली असते. हे “आयुष्य” जगायचं कसं? किडा-मुंगी सारख की माणूस म्हणून? किडे मुंगीसुद्धा आपलं आयुष्य प्राणपणाने जगतात. आपल्याला तर सगळं काही मिळालं आहे. फक्त त्याचा उपयोग करता आला पाहिजे, त्यासाठी हवे आहेत प्रयत्न, कष्ट, जिद्द आणि ध्येय! शिवाय आपण मार्ग निवडणार कसा? ठरवणार कसा? म्हणून आयुष्यात जगण्यासाठी ध्येय हवेच आणि हे ध्येय ठरवण्यासाठी आपल्याला शिक्षण, संस्कार मदत करतात. त्यासाठी विचार मात्र आपले आपल्यालाच करायचे असतातं. त्याची सुरुवात आपल्याला करायची आहे चला तर मग ठरवू आपण आपल्या “जीवनाचे ध्येय”
जगु आणि जगवू, आनंद घेऊ आणि देऊ, आयुष्याच्या या संधीचं, सोनं आपण करू.
२. ध्येय –
बरेचदा आपल्याला आपल्या जीवन प्रवासाची दिशा माहीतच नसते. आपला प्रवास दिशाहीन सुरू असतो. केवळ इतरांचा पाठलाग करत इतर जण धावतात म्हणून आपण त्यांचे पाठीमागे पळत असतो. आपलं आयुष्य आपण वेगळेपणाने जगू शकतो हेच आपल्याला माहित नसते. वेगळी आडवळणाची वाट स्वीकारायला आपण तयारच नसतो. त्यामुळे नंतर बऱ्याचदा आपला भ्रमनिरास होतो. कारण पुढचे परिणाम आपल्याला माहीत नसल्यामुळे!
हे टाळण्यासाठी आपण आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवले पाहिजे. अर्थात आपल्या आवडी निवडी नुसार, क्षमतेनुसार, परिस्थितीनुसार, सर्व बाबींचा विचार करून. प्रत्येकाची आवड-निवड व्यक्तीसापेक्ष वेगवेगळी असू शकते. त्यासाठी आपण स्वतःचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक असते. आपली परिस्थिती, गरज, स्वभाव, सभोवतालचे वातावरण, या सर्वांचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. त्यातून आपले“व्यक्तिमत्व” घडत असते आणि त्यातूनच आपण आपले ध्येय ठरवायचे असते. त्यासाठी थोडा अभ्यास करायला हवा.
३. व्यक्तिमत्व –
प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून एक वेगळा जीव असते. प्रत्येकाचं शरीर, स्वभाव, आवडनिवड या सर्वच बाबी इतरांपेक्षा वेगळे असतात. या जीवाची जडणघडण आयुष्यातील प्रत्येक दिवस, त्या दिवसाचा अनुभव करत असतो. त्या जीवनातील सर्व क्षमता आणि आलेले सर्व अनुभव यांच्या मिश्रणातून एक नवीन रसायन तयार होते. ते म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे असू शकतात. हे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी आपल्याला स्वतःला असते. त्यासाठी आपल्याला आपले आई वडील, मित्र, शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुभवांची मदत मिळू शकते. अर्थात त्याचा आपण किती फायदा घेणार हे मात्र पूर्णतः आपल्यावर अवलंबून असते. जसे घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते, पण पाणी पिणे घोड्याला ठरवायचे असते. तसे आपले व्यक्तिमत्व कसे घडवायचे हे आपल्याला ठरवायचे असते. त्यासाठी आपण “प्रयत्न” मात्र केले पाहिजे.
४. प्रयत्न –
“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे” असं आपण म्हणतो. पण ते प्रत्यक्षात आणत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा अपयश मिळाल्याचे खापर मात्र आपण दुसऱ्यावर फोडून मोकळे होतो. अनेक कारणे सांगतो मात्र, आपण योग्य प्रयत्न केलेच नाही हे मान्य करत नाही. पण त्यामुळे नियम बदलत नाही. कोणत्याही ध्येयासाठी, ध्येय प्राप्तीसाठी, प्रयत्न करणं अत्यावश्यक ठरते. प्रवास केल्याशिवाय आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोचू शकत नाही किंवा ते एक दिवास्वप्न ठरू शकते. तसे प्रयत्न, परिश्रम केल्याशिवाय यश मिळणे, ध्येय प्राप्ती होणे हे शक्य नसते. “कष्टेविणं फळ नाही” हेच खरे! यानुसार कष्ट करणे हे अत्यावश्यक ठरते. काहीवेळा एखाद्याला कष्ट न करताच ध्येय प्राप्ती झाली असा आपला गैरसमज होण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्याला नाण्याची दुसरी बाजू माहित नसते किंवा आपण ते विविध निमित्त सांगून ध्येय प्राप्तीच्या वाटेवरून पळ काढत असतो. मात्र त्याच वेळी आपण आपला आत्मविश्वास गमावत असतो. त्यापासून स्वतःला दूर नेत असतो व आपले आयुष्य दिशाहीन करत असतो.
कैलास बडगुजर, टिटवाळा ८८८८२८४२६५