शिक्षण कसे हवे?

शिक्षण… हे सध्या मानवाच्या विकासासाठी एक मूलभूत गरज आहे, असे आपण सहज म्हणू शकतो. कारण अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य यासाठी शिक्षणाची नितांत आवश्यकता दिसून येत आहे. मानवी जीवन आनंदी बनवण्यासाठी शिक्षण एक महत्त्वाचे माध्यम ठरू शकते. पुरातन काळी सुद्धा शिक्षणाने माणूस सुखी होत गेला, याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. पण पूर्वीचे शिक्षण हे आजच्यासारखे कागदी घोडे बनवणारे नसून एक जीवन उपयोगी असे सर्वकष शिक्षण होते. शिक्षण देण्याची गुरुकुल पद्धती ही प्रत्येकाचा सर्वांगीण विकास घडवणारी होती. तसेच प्रत्येकाच्या कुटुंबात होणारे अनौपचारिक शिक्षण हे सुद्धा आपापला व्यवसाय पुढे साकारण्या साठी उपयुक्त व पुरेसे असे होते. पण आताच्या शिक्षणाचे काय? शिक्षण कसे हवे? हा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत एक गहन व गुंतागुंतीचा ठरत आहे. यातून मार्ग काढणे, शिक्षणाचे स्वरूप ठरवणे, हे दूरगामी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

       या प्रश्नाचे उत्तर ठरवताना मला वाटते संपूर्ण भारताचा परिपूर्ण अभ्यास करून शैक्षणिक तत्वज्ञान मांडणाऱ्या भारतीय शिक्षण तज्ञांचा विचार नक्कीच करायला हवा. यामध्ये प्रामुख्याने स्वामी विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर यांच्यासारख्या विचारवंतांचा अभ्यास, त्यांचे तत्त्वज्ञान यांचा पाठपुरावा आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून झाले पाहिजे, हे जगभर सर्वांनी मान्य केले आहे. मात्र भारतात अजूनही त्याचा अवलंब केला जात नाही. इंग्रजी राजवटीच्या काळातील इंग्रजाळलेल्या शिक्षणाचे महत्त्व अजूनही कमी होत नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमाचे सर्वत्र अवडंबर केले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षणापासून आपण दूर जाता आहोत, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षणाची आवड निर्माण होणे हे शिक्षणाचे उद्देश सफल होण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरते. येथेच आपण अपयशी ठरतो. यानंतरचे पुढील शिक्षण हे केवळ पदव्या देणारे नसून व्यावसायिक, औद्योगिक दृष्ट्या प्रत्येकाला सक्षम बनवणारे असे हवे. त्यासाठी शिक्षणाची मांडणी ही व्यवसायाभिमुख, उद्योग निर्मितीस प्राधान्य देणारी, स्वतःला(प्रत्येकाला) सक्षम बनवणारी अशी हवी. केवळ पदवी मिळाली की नोकरी मिळते, अशी विचारसरणी निर्माण करणारे शिक्षण नसावे.  यासाठी शैक्षणिक धोरण हे प्रत्येकाचा सर्वांगीण विकास करणारे हवे.

         माध्यम आणि शिक्षण हे उत्तम असले तरी शिक्षण देणारे शिक्षक हे सर्वोत्तम असायला हवे. शिक्षक हा शिक्षणाचा एक महत्त्वाचा घटक ठरतो. पालक, विद्यार्थी, शिक्षक या त्रिसूत्रीमध्ये प्रत्येक घटकाला समान महत्व आहे. शिक्षक कसा आहे? पात्र आहे की अपात्र? अनुभवी आहे की कामचलाऊ? आपल्या कामाशी प्रामाणिक की अप्रामाणिक? यावरच शिक्षणाचा दर्जा ठरतो आणि विद्यार्थ्यांचा विकास सुद्धा! शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरतो. अगदी बालवाडीच्या शिक्षकांपासून, वैविध्यपूर्ण पदवी व्यावसायिक शिक्षणापर्यंतचे शिक्षक हे सर्वकष पात्र असायला हवे. तरच विद्यार्थ्याला खरे शिक्षण प्राप्त होईल, यात शंका नाही. सर्वांना संधी हवी, यासाठी जाती आरक्षणाच्या मदतीने होणारी शिक्षकांची निवड कितपत योग्य आहे? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यातूनच पुढे शिक्षणाचा दर्जा कितपत टिकून राहील याविषयी सुद्धा शंका निर्माण होते. दिले गेलेले शिक्षण हे उपयुक्त ठरेल का? याविषयी चिंता निर्माण होते. हे सर्व प्रश्न, त्याबाबतचे सत्य नाकारता येत नाही. तसेच दिले जाणारे शिक्षण हे मुलांचे केवळ ज्ञान वाढवते की त्यांना संस्कारीत करते, हे सुद्धा पाहणे क्रमप्राप्त ठरते.  आजचे शिक्षक ज्ञानी आहेत तसेच संस्कारीत आहेत का? याबाबत तसे समाधान होत नाही.

त्याचप्रमाणे शिक्षण देणाऱ्या संस्था या शिक्षणाची दुकाने ठरु नयेत. यातून मिळणारे शिक्षण हे समाजासाठी, देशासाठी उपयुक्त कसे होईल? याबाबत शिक्षणसंस्थांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करणे व ती तशी करून घेणे हे शासनाचे आद्य कर्तव्य ठरावे. एकंदरीत शिक्षण संस्थांमध्ये मांडलेल्या शिक्षणाच्या बाजारामुळे आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत, याची जाणीव संस्थाचालकांना आणि संबंधित अधिकारी वर्गाला जेव्हा होईल तेव्हाच चांगल्या शिक्षणाचा श्री गणेशा होईल, असे म्हणता येईल. त्याबाबतचे सत्य वेगळे सांगायला नको.

        एकंदरीत प्रत्येकाला शिक्षणाची योग्य संधी मिळावी, योग्य मार्गदर्शन मिळावे, आर्थिक सहकार्य मिळावे, शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्माण व्हावे. केवळ टक्केवारी मिळवणे हा जीवनाचा हेतू न होता शिक्षण हे जीवन उपयुक्त कसे होईल, त्यातून प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःच्या पायावर कसा उभा राहू शकेल, तसेच इतरांना सुद्धा उभे राहण्यास मदत करू शकेल, असे शिक्षण एकंदरीत भारताचा विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.         एकंदरीत शिक्षण हे स्वच्छ, संस्कारीत व निरपेक्ष असावे. सर्वांगीण उपयुक्त, उद्योग प्रणित असावे. शिक्षणाने केवळ आर्थिक उन्नती न होता प्रत्येकाचा सर्वांगीण विकास व्हावा. शिक्षणाने मानवाला यंत्र रूप देऊ नये, मानवामध्ये मानवता निर्माण व्हावी असे शिक्षण असावे, असे प्रत्येकाला वाटते, वाटत असावे असे मला वाटते.

कैलास भाऊलाल बडगुजर

टिटवाळा, ठाणे 8888284265

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button