आज ‘शिक्षक दिन’ या दिवशी शिक्षकांचा सन्मान केला जातो. तो करण्याचे औचित्य बऱ्याच संस्था दाखवतात. शाळा आणि शाळेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते. परंतु शाळेसाठी विद्यार्थ्यांनी आटापिटा करायचे दिवस गेले आता मुलांसाठी कष्ट घेण्याचे दिवस शिक्षकांवर आले आहेत.
गुरू देतील जगाला आदर्श असा वसा
घडवतील ते नागरिक सबल करण भारता
एक आदर्श शिक्षक संपूर्ण जगाला आपल्या ज्ञानाने बदलू शकतो. त्याच्यामध्ये ती क्षमता असते. जी विद्यार्थ्यांना एक नवीन स्फूर्ती नवीन प्रेरणा देवून जाते आणि भविष्यात तो विद्यार्थी एक सुसंस्कृत नागरिक तयार होतो. त्याच्या कडे लोक आदराने बघतात, ह्याचे सर्व श्रेय आपल्या गुरूंना दिले जाते.
शिक्षकांमध्ये सर्व गुण असतात ज्याने प्रत्येक व्यक्ती ही सर्वगुणसंपन्न म्हणून जगात वावरते. आपल्या भारत देशाला सबल करण्यास सक्षम बनवण्यासाठी एक आदर्श व्यक्तीमत्त्व तयार होणं फार गरजेचं झालं आहे. यासाठी शिक्षक नेहमी प्रयत्नशील असतात आणि एका आदर्श शिक्षकांमध्ये हे गुण असणे खूप महत्त्वाचे आहे…
शिक्षकांमध्ये हजाराहून एकाकडून एखादी चूक घडली की, साऱ्याच शिक्षकांकडे त्याच नजरेने पाहणे चूकीचे आहे. अनेक आदर्श शिक्षक म्हणण्यापेक्षा सारेच आदर्श शिक्षक असतात. त्यांच्यातील गुणांकडे डोळेझाक करून चालणार
नाही…
शिक्षक म्हणजे शि- शिलवान, क्ष- क्षमाशील, क- कर्तृत्ववान. ज्यांच्या मध्ये हे सर्व गुण असतात तोच खरा आदर्श शिक्षक होय. आदर्श शिक्षक सुसंस्कारी, सुंदर व्यक्तीमत्त्व, वाचनाची आवड, वर्ग व्यवस्थापन, गणवेश, तसेच वर्गातील त्याच्या प्रवेशाने मुलामध्ये चैतन्य निर्माण व्हावे, अशा विचारांचा तो असावा. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक व सल्लागार असतो. त्यामुळे शिक्षक हा चारित्र्यसंपन्न, शीलवान व आदर्शाचे पालन करणारा असावा अशी अपेक्षा असते. शिक्षक जसा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा असतो, तसाच तो समाजाला मार्गदर्शन करणारा एक सामाजिक अभियंता देखील असतो. या पार्श्वभूमीवर एका आदर्श शिक्षकाचे व्यक्तीमत्त्व तसेच आदर्श त्याला शोभेल असेच असायला हवे, परंतू दुर्दैवाने आज काही शिक्षक आपले व्यक्तीमत्व गमावून बसत असल्याचे दृश्य पाहण्यास मिळत आहे.
ज्ञान, संस्कार, एक चांगलं व्यक्तीमत्व या गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्याला आई- वडिलांपासून तर मिळतातच पण या व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती म्हणजे ‘शिक्षक’ होय… प्रत्येक विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासह चांगले संस्कार एक शिक्षक देत असतो. त्यामुळे शिकवण्या बरोबर आणखी बरेच गुण आदर्श शिक्षकांमध्ये असणे आवश्यक आहे.
देव मानणार असताल तर देवा नंतर जो येईल असा शिक्षक असावा. शिक्षक हा सर्वोत्तम असावा, पण खूप वेळा असे होत नाही म्हणून विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दांत शिकविणारा असावा. खरं तर शिक्षक हा सर्वगुणसंपन्न असावा. पण हे बहुतांश शक्य नसते, त्यामुळे कमीत कमी त्याला दोन विषयाचे ज्ञान तरी व्यवस्थित असणे आवश्यक असते.
शिक्षकाला किती ज्ञान आणि हे महत्त्वाचे असतेच पण त्याच सोबत ते ज्ञान विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात आणि अनपेक्षितपणे समजेल असे देणे हे पण महत्त्वाचे ठरते. एक आदर्श ‘शिक्षक’ या शब्दाला योग्य असेल असाच जर सर्वगुणसंपन्न शिक्षक घडवायचा, शोधायचा असेल तर खऱ्या अर्थाने शिक्षक प्रक्रिया ही पारदर्शक व्हायला हवी . “आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ! “असे व्हायला नको…
चाणक्याचे असे विधान आहे की, सर्वात श्रेष्ठ राजा नव्हे, तर शिक्षक आहे. कारण तो उद्याची पिढी घडवत असतो. मातीच्या भांड्याला आकार देण्याचे काम तो करित असतो. समाजातील प्रत्येक घटक ईथेच असतो आणि तो जसा, जितक्या मेहनती ने घडवला जाईल तितकाच तो सुंदर घडवला जाईल. एक सुसंस्कृत, सुसंस्कारी व्यक्तीमत्त्व आदर्श शिक्षक घडवू शकतो.
पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षक हा जन्मालाच यावा लागतो.. हुशार विद्यार्थी सुध्दा एक चांगला शिक्षक होईलच असे नाही..
एक आदर्श शिक्षक हा कायम विद्यार्थी असायला हवा. त्याला वाचनाची आवड ही असायलाच हवी. त्याचे ज्ञान जेवढे प्रगल्भ होईल तितके च तो उद्याचा भावी नागरिक अधिक प्रभावी, सक्षम, स्वावलंबी घडवून देश सुजलाम सुफलाम राष्ट्र बनवू शकेल.
तसेच शिकवायचा विषय हा आधी शिक्षकाला नीट समजलेला असायला हवा.
आपल्याला समजलेला विषय हा विद्यार्थ्यांना शक्यतो सोप्या भाषेत आणि उदाहरणे देऊन समजावून सांगण्याची हातोटी हवी. आपल्या वर्गात बसलेले सर्व विद्यार्थी नसतात तर त्यातील बहुसंख्य केवळ परीक्षार्थी असतात. त्यामुळे त्या दोघांच्यात संतुलन ठेवत विषय कसा पुढे न्यायचा याची कला ही शिक्षकाकडे असायला हवी.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुंपणापर्यंतचे शिकवायचे असेल तर एका उत्तम शिक्षकाला क्षितिजापर्यंत चे ज्ञान हे असायला हवेच.
आपल्या विषयाच्या अनुषंगाने नवनवीन ज्ञान मिळवून, शैक्षणिक साहित्यांचा अवलंब करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवले आणि आपली तासिका प्रसन्न चित्ताने शिकविण्यासाठी खर्च करील त्यांचे विद्यार्थी नक्कीच ऐकतात. या उमलत्या कळ्यांमधील आंतरिक शक्तींचा सुगंध शिक्षकांनी दरवळून टाकला पाहिजे. एक चांगला शिक्षक आपल्या वाणीतून, आचरणातून, सहवासातून, आपल्या कार्याला देव मानून आणि शाळेतील मुलं ही त्या देवाची लेकरं समजून योग्य पद्धतीने आपल्या जवळील ज्ञानाचा उपयोग ही ईश्वराची लेकरं घडवण्यात केला तर खरा आदर्श निर्माण होईल यात शंका नाही. कळ्यांचे फुलांत, मातीचे एका आकर्षक भांड्यात, तसेच नकळत बालकाचे एका सुसंस्कृत नागरिकांत रुपांतर शिक्षक करू शकतात. असा असावा आदर्श शिक्षक.
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. या पुरस्काराने शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळते. आदर्श पुरस्कार मिळालाच पाहिजे असा अट्टाहास धरणारे खूप थोडे असतात, पण आपल्या कामालाच देव मानून मुलांमध्ये देव शोधणारे अगणित आहेत आणि असतात. तसेच कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीने काम करणारेही अगणित आहेत. तरीही प्रोत्साहन मिळाल्यानंतर जास्त प्रेरित होऊन शिक्षक काम करतात. आपले विद्यार्थी जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर आसनस्थ होतात, चांगले पद भूषवितात. तीच खरी शिक्षकांसाठी पावती असते, तोच शिक्षकांच्या कार्यासाठी खरा पुरस्कार असतो.
आज ज्यांच्या जन्मदिनी आपण शिक्षक दिन साजरा करतो, ते आदर्श शिक्षक, एक आदर्श व्यक्तीमत्त्व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन. ते म्हणतात की, खरे आदर्श शिक्षक ते आहेत, जे आपल्याला स्वतः बद्दल विचार करण्यास मदत करतात तसेच विचारांच्या विविध प्रवाहांना परिष्कृत करतात आणि सामंजस्य निर्माण करतात. ते नकाराची नाही तर सादरीकरणाची पद्धत अवलंबतात आणि दाखवतात की या वेगवेगळ्या विचारांच्या ओळी एकाच टोकाकडे कशा एकत्रित होतात.
पुढे ते म्हणतात, “जेव्हा आपल्याला वाटत की आपल्याला सारं ठाऊक आहे तेव्हा आपण शिक्षण थांबवतो.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी उत्कृष्ट शिक्षकाची फार सुरेख व्याख्या केली आहे, – शिक्षकाने कमीत कमी शिकवून विद्यार्थी स्वतः अधिकाधिक शिकेल या साठी त्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. शिक्षकाने अंतापर्यंत विद्यार्थी म्हणून च जगायला हवे.
बऱ्याचशा गोष्टींवर मात करून हे शिक्षक आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयत्न करतात. खरंच त्यांच्या त्यांच्या जिद्दीला चिकाटीने मानलेच पाहिजे. आज शिक्षक दिनानिमित्त या सर्व शिक्षकांना -ज्यांनी ज्यांनी शिक्षणाचा वसा घेतला आहे – त्या सर्व आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
कु. शितल तिर्थराज जायकर
(MA. D.Ed)
टाका, ता. अंबड, जि. जालना