माझ्या शैक्षणिक प्रवासातील एक अविस्मरणीय असा अनुभव..
जन्म आणि मृत्यू यांच्यामधील अंतर म्हणजेच आपले आयुष्य असते. सुरुवातीला ते एखादया नवीन वही सारखे कोरे करकरीत असते. कडू-गोड अनुभवांनी ही वही भरत-भरत ते पुढे सरकत राहते. तिच्यात चांगल्या-वाईट गोष्टींची भर पडत राहते. आयुष्यातील एका वर्षा मागून एक वर्षे ही मागे-मागे पडत जातात. ती आपल्या आयुष्यातून कायमची निसटून निघून जातात. सातत्याने काळ हा आपल्या आयुष्याला खात असतो. तो आपणास अंतिमच्या शास्वत सत्याकडे घेऊन जात असतो. हे आयुष्य आपण कायमपणे सुख-दुःखांच्या ऊन-सावल्यांनी जगत राहतो. आयुष्यातील संपणाऱ्या व सरणाऱ्या दर वर्षीच्या सरत्या वर्षानंतरच्या उगवणाऱ्या पहिल्या दिवशी अनेकजण आपला वाढदिवस हा कमी-अधिक प्रमाणात साजरा करीत असतात. त्यामध्ये काही क्षणापुरता तरी आपला छोटासा ‘आनंदोत्सव ‘ साजरा होत असतो. आपण आयुष्यातील नवीन वर्षाचे हसतमुखाने स्वागत करतो असे होता-होता कधी एकदाशी आपले बाल्य आणि तारुण्यातील आयुष्य संपून जाते. मग आपणास कधी एकदा म्हातारपण आले, हे कळत सुद्धा नाही. बघता-बघता आपण अगदी आयुष्याच्या शेवटच्या मावळतीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचतो. थकून, भागून गेलेला व क्षीण झालेला हा जीव शेवटच्या काही काळामध्ये भूतकाळातील आठवणींच्या जगात जगत राहतो. शेवटी आपले जगणे हे एकाकी बनू लागते. खंगल्या, भंगल्या व निस्तेज झालेल्या या आपल्या जीवाचा शेवट हा ‘ मृत्यू ‘ नावाच्या अंतिमच्या आयुष्यरुपी पानानी अखेर समाप्त होतो. क्षीण झालेला जीव शरीरातून निघून पंचमहाभूतामध्ये विलीन होतो. आपण जगाच्या विश्व तत्वात कायमचे विसावतो.आपल्या आयुष्याला त्या ठिकाणी कायमचा पूर्णविराम मिळतो.
याच आपल्या आयुष्याला हसरे करणारे असे काही क्षण आपल्या जीवनात येतात आणि ते भूर्रकन निघून ही जातात. परंतु हे क्षण आणि आठवणी आपल्या हृदय मंदिरी आपण कायमच्या आयुष्यभर मोरपिसासारख्या जतन करून ठेवतो. असाच एक माझ्या शैक्षणिक वाटेवरचा मला भावलेला एक छोटासा सत्यदर्शी, वास्तवादी आणि हृदयस्पर्शी मला आलेला एक छोटेखानी अनुभव. मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. लहान मुलांचे विश्व हे अगदी निरागस, निरामय आणि स्वच्छ असते. जणू त्या साक्षात परमेश्वराच्या सजीव मूर्तीच वाटतात. त्यांच्या रूपाने साक्षात परमेश्वरच आपल्याशी बोलतो आणि खेळत असतो. हसतमुखानी शाळेत येणारी अजाण बालके ही एक प्रकारचे शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हसू असते असे आम्ही भाग्यवंत शिक्षक विद्यार्थ्यांनाचे भाग्य घडविणारे एक भाग्यविधाते असतो. ईश्वर स्वरूप अशा एक सजीव विद्यार्थ्यांनाशी आमचे आपुलकीचे नाते जुडले जाते. शैक्षणिक वाटेवर चालताना ज्यावेळी गुरू-विद्यार्थ्यांच्यामध्ये मायेचे एक प्रेमळ असे घट्ट नाते निर्माण होते. त्यावेळी खऱ्या अर्थाने शिक्षण प्रक्रिया ही सुलभ, आनंददायी आणि गतिमान होत असते. याचा मला साक्षात असा स्वानुभव आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या जवळचे एक हितचिंतक आणि प्रेमळ नातेवाईक वाटतात . गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये मायेच्या एक प्रेमळ धागा गुंपला जाऊन, दोन हृदये एकमेकांशी जोडली जातात. बालके जशी आपल्या आई-बाबांच्यावर माया करतात, किंबहुना त्यापेक्षाही ती अधिक माया आणि प्रेम आपल्या शिक्षकांच्यावर करतात.
असाच एक प्रसंग मी शिकवीत असणाऱ्या, माझ्या इयत्ता चौथीच्या वर्गात घडला. २ मार्चला माझा दरवर्षी साजरा केला जाणारा वाढदिवसाचा शुभ दिन असतो. विद्यार्थ्यांनाशी आपण एकरूप झालो की काय प्रचिती येते, हा सांगणारा मला आलेला हा एक वास्तव हृदयस्पर्शी, असा चालता-बोलता शैक्षणिक अनभूती देणारा माझा साजरा झालेला तो वाढदिवस. हा वाढदिवस आठवडाभर पुढे आहे म्हटले की, माझ्या विद्यार्थ्यांनाची उत्सुकता, उत्कंटता आणि आनंद अगदीच शिगेला पोहचतो. त्या दिवसाची ते आतुरतेने वाट पाहतात. त्यावेळी माझ्या या लाडक्या प्रिय विद्यार्थी जनांच्या चेहऱ्यावरील आनंद हा मला खूप काही सांगून जातो. साने गुरुजींनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, ‘करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते तयाचे प्रभुशी’ विद्यार्थ्यांनाच्या या बाल भाव -भावनांच्या विश्वाशी तादम्यरूपाने एकरूपतेचा सुसंवाद निर्माण झाला की, शिक्षण प्रक्रिया सहजच सोपी होते. तशा प्रकारचा सुसंवाद हा माझे विद्यार्थी आणि माझ्यात निर्माण झाला आहे. त्यांचे आणि माझे जुळले आहे एक प्रेमळ असे अतूट नाते. माझा वाढदिवस म्हटला की, त्यांच्या पाठीवरून मायेने फिरणारा शाबासकीचा माझा हात. माझ्या वाढदिनी विद्यार्थ्यांना अनेक बक्षिसांची होणारी लयलूट, त्यांना दिला जाणारा खुमसदार आणि गोड खाऊ आणि इतर सर्व काही गंमती-जमती ह्या विद्यार्थ्यांनाच्या आनंदात भर घालतात. या वर्षीचा माझ्या वाढदिवसाचा दिवस उजडला. या दिवशी मी पण सकाळ पासूनच आनंदात होतो; पण माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा ही जाम आनंदात दिसत होते.कोरोना संकटामुळे दोन वर्षात विद्यार्थ्यांना माझा वाढदिवस साजरा करता आला नव्हता. परंतु आता कोरोना संकट ओसरल्यामुळे या वर्षी माझा वाढदिवस साजरा करता येणार, याचा आनंद हा माझ्यापेक्षा विद्यार्थ्यां- नाच जास्त झाला होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मला पहावयास मिळत होते.
यावर्षीच्या २ मार्च रोजी मी शाळेत गेलो आणि पाहतो तर काय? विद्यार्थ्यांनाच्या सगळ्या स्वाऱ्या भलत्याच खुशीत दिसत होत्या. मला माझ्या विद्यार्थ्यांनी काही काळासाठी चौथीच्या वर्गात येण्यास मनाई केली. “सर, तुम्ही जरा काही वेळासाठी वर्गा बाहेरच थांबा ! तुम्ही लगेचच वर्गात येऊ नका.”अरे! पण का येऊ नका? मला ते जरा कळू दयात तरी खरे! नाही! नाही ! आम्ही ते तुम्हाला अजिबात सांगणार नाही. आमचे ते टॉप सिक्रिट आहे.” असे का? म्हणून मी पण काही काळासाठी वर्गाबाहेरच थांबून राहणे पसंत केले. माझ्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनाची आतून दरवाजा लावून, आतमध्ये कसली तरी तयारी चालली होती.हे मला त्यांच्या आतून येणाऱ्या आवाजावरून जाणवत होते. वर्गातील विद्यार्थ्यांनाचे बोलणे माझ्या कानावर बाहेर ऐकायला येत होते.ते असे ठेव , तेथे ते ठेव. थांब असे नको, असे ठेव. ते येथेच ठेव म्हणजे एकदम चांगले दिसेल असे वर्गातून ऐकू येणारे एकमेकांच्यातील सूचना देणारे संभाषण आणि त्यांच्या त्या बोलण्यावरून, माझ्या वर्गात विद्यार्थ्यांनाची कसली तरी जोरदार तयारी सुरू होती. हे माझ्या लक्षात आले होते. त्यांची तयारी पूर्ण होताच, वर्ग खोलीच्या दाराआड लपून बसलेल्या विद्यार्थ्यांनाच्या पैकी एका विद्यार्थ्यांने वर्गाचे हळूच थोडेसे दार उघडले व तो म्हणतो कसा,”सर तुम्ही आता वर्गात यायला आमची काय हारकत नाही.” चौथीच्या बंद वर्गाच्या दारातून विद्यार्थ्याने उघडलेल्या त्या छोट्याशा फटीतून हळूच मी अलगतपणे वर्गात प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर सर्वांनी ‘ वेल कम सर’ म्हणत, माझे जल्लोषी असे स्वागत केले. पण त्याच क्षणी त्यांनी माझ्यावर वेगवेगळ्या फुलांच्या पाकळ्यांनी जोरदारपणे पुष्पवृष्टी केली तसेच त्यांनी माझ्या वर्गात जाण्याच्या मार्गावरून फुलांच्या पाकळ्यांनी पायघड्या अंथरून छान सजविल्या होत्या. माझ्या अंगावरती टाकलेल्या पुष्पवृष्टीत अक्षरशः मी न्हाऊन निघालो. माझ्यावरच्या त्या प्रेम आणि आदराच्या प्रेमळ अशा पुष्पधारेत क्षणभर मी आनंदित होऊन सुखावलो. माझ्या वर्गातील खुर्ची आणि टेबल हे देखील रंगीबेरंगी अशा फुलांनी आणि फुग्यांनी सुंदरपणे सजविण्यात आले होते. वर्गात विद्यार्थ्यांचा एकच आनंदमय हास्यकल्लोळ सुरू होता. सर्वांची एकच घाई आणि गडबड सुरू होती. ती म्हणजे, मला छान- छान ग्रेटिंग कार्ड व पुष्पगुच्छ देण्यासाठी सुरू होती ती सर्व प्रकारची घाई गडबड. नाजूक अशा कागदांच्या घड्यातील, सुंदर अशा पाना-फुलांच्या बेलबुट्टीची विविध रंगी ग्रेटिंग कार्ड. त्यांना विद्यार्थ्यांनी छानशा नक्षीकामात सजविले होते. ती ग्रेटिंग पाहून माझ्या मनात क्षणभर एकच विचार आला, तो म्हणजे एवढयाशा लहान वयात एवढी मोठी समज आणि माया देवाने या विद्यार्थ्यांना दिली कोठून? बाल चिमुकल्या हातांनी न सांगता केलेला माझ्यासाठीचा हा सर्व खाटाटोप होता. या गोष्टीचे माझ्या मनाला काही वेळेपर्यंत कुतूहल वाटत राहिले.
सर्वांना अरे! हो! हो ! मी तुम्हा सर्वांची ग्रेटिंग कार्ड आणि पुष्पगुच्छ घेतो. तुम्ही गडबड करू नका. जरा थांबा! थांबा! म्हणत मी त्यांना त्यांच्या जागेवरती बसण्यास सांगितले.काही विद्यार्थ्यांनी तर चक्क छोट्या-छोट्या अशा लहानशा गिफ्ट वस्तू देखील, मला भेट म्हणून देण्याकरिता आणल्या होत्या. खरे तर मला ह्या वस्तू आणण्याची त्यांनी काही गरजच नव्हती. उलट त्या दिवशी मीच त्यांच्यासाठी अनेक गोष्टी आणि खाऊ घेऊन शाळेत गेलो होतो. त्यांच्या या बाल प्रेमरसात मी अगदी चिंब न्हाऊन निघालो. विद्यार्थ्यांना आपण दिलेले प्रेम आणि ज्ञानामृताची त्यांनी अशा पध्द्तीने परतफेड चालवली होती. माझ्या प्रेमाची ही त्यांची परत फेड आपणास नक्कीच विचार करायला लावणारी होती. विद्यार्थी कृतज्ञेच्या प्रेम भावाने मला ते परत करण्याचा प्रयत्न करीत होते. म्हणजे म्हणतात ना! ‘जसे पेराला तेच उगवते.’ आपण दुसऱ्यांना जसे देऊ तसे, आपणास ते परत मिळत असते. नियतीचा हा नियम ह्या लेकरांनी सुद्धा अगदी तंतोतंत पाळला होता. त्यामुळेच माझ्या मनाला खराखुरा आनंद झाला होता. शिक्षकी पेशात प्रामाणिकपणे केलेल्या गुरू सेवेचे ते एक सुंदर असे गोड फळ होते.आजपर्यंतचे माझे शैक्षणिक जीवन मला सार्थकी लागल्याचे वाटत होते. अरेच्या! मग हे होते तर तुमचे टॉप सिक्रिट? आता मला एकदा तुमचे सर्व टॉप सिक्रिट कळाले आहे. असे मी म्हणताच विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून, आनंदाने माझ्या वाढदिवसाबद्दल इंग्रजीतून छानसे वाढदिवसाचे गीत म्हटले.’ हॅपी बर्थडे टू यू ‘ चे स्वर माझ्या कानी काही काळ घुमत आणि रेंगाळत राहिले. ते गीत संपल्यानंतर नंतर मी खिशातील माझा रुमाल बाहेर काढून, डोळ्यातून तरळणारऱ्या माझ्या आनंदाश्रूनां पुसले. त्यावेळी माझा रुमाल अगदी ओलागार झाला होता. काही काळ मी अगदी भावनावश झालो होतो. केवढी! ही माया आणि माझ्यावरचे हे केवढे! मोठे विद्यार्थी प्रेम ! ते पाहून मला क्षणभर गहिवरून ही आले. माझ्या डोळ्यात चमकणारे अश्रू पाहून विद्यार्थी सुद्धा काही काळ शांतपणाने स्तब्ध राहिले. नंतर पुन्हा माझ्या चेहऱ्यावर फुललेले हास्य पाहून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी आनंदाने जोरदार अशा टाळ्या पिटल्या. त्या कडकडणाऱ्या नाद मधुर टाळ्यांच्या आवाजात मी देखील आनंदाने सामील झालो.
श्री. सतेशकुमार मारुती माळवे
उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडे ता. माण जि. सातारा. 7758978761