विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटणारा, केवळ पुस्तकी ज्ञान देणे म्हणजे शिक्षण नव्हे तर ज्या शिक्षणातून विद्यार्थी समाजात एक आदर्श व्यक्ती म्हणून नावलौकिक मिळवू शकेल यासाठी नेहमी प्रयत्न करणारा खरा शिक्षक आहे.खरा शिक्षक हा केवळ वेतन घेण्यापूरते काम न करता विविध सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन कार्य करणारा असावा. शिक्षक हा विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता सर्व विद्यार्थी एकसमान समजून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत झटत असणारा असावा. त्याचे चारित्र्य शुद्ध असावे. त्याच्यात सतत काहीतरी नविन शिकायची आवड असायला हवी. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्याने स्वतःचे मुल म्हणून बघायला हवं. तो शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय आणि वेळेचे बंधन पाळणारा असावा. त्याने बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल करायला हवा.
शिक्षक हा आपल्या अधिकारांप्रती जागरूक असतो त्याप्रमाणे तो स्वतःच्या कर्तव्याप्रती जागरूक रहायला हवा. शिक्षकाने नवनविन तांत्रिक ज्ञान ग्रहण करून त्याचा वापर आपल्या अध्यापनात करायला हवा. त्याच्यात घेण्याबरोबरच देण्याची वृत्ती विकसित व्हायला हवी.त्याने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने नवनविन ज्ञान देण्यासाठी सजग रहायला हवे. शिक्षक हा सुद्धा कायम विद्यार्थी रहायला हवा जेणेकरून विविध क्षेत्रातील नविन ज्ञान ग्रहण करून ते आपल्या विद्यार्थ्यांना देता यावं.
शिक्षकाने विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचे संबंध ठेवावे जेणेकरून विद्यार्थी त्यांस आपली अडचण न घाबरता सांगू शकतील. शिक्षकाने वेळप्रसंगी कधी कठोर तर कधी मृदू व्हायला हवे. त्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी अभ्यासाबरोबरच विविध सहशालेय उपक्रम आयोजित करावे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देता येईल.शिक्षकाचे समाजाशी असलेले संबंध हे नम्रतेचे असावेत.जेणेकरून समाजाचा उपयोग आपल्या शाळेच्या विकासासाठी करता येईल.
शक्य तेव्हा शिक्षकाने अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारायला हवं. शिक्षकाने शाळेत वेळेत उपस्थित राहून आपले कर्तव्ये पार पडावे. शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा माझा मुलगा आहे ही भावना आपल्या मनात बिंबवायला हवी. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांशी नाते जुळवून त्यांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध रहायला हवे.
एकंदरीत मला अभिप्रेत असणारा शिक्षक हा केवळ वेतनापुरता कार्य न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव झटणारा असावा.
नवनीत राजकुमार नाकाडे
कुथे पाटील कॉन्व्हेंट वडसा देसाईगंज
ता. वडसा जि. गडचिरोली