“तुमच्यामुळेच गुरुजी, आयुष्य बहरून आले…
कसे सांगू तुम्हाला, जगणे आनंदाचे झाले…
- बालकवी एकनाथ आव्हाड
बालकांचे जन्मजात हक्क घोषित करणारा जाहीरनामा संयुक्त राष्ट्रांनी 20 नोव्हेंबर 1959 रोजी प्रसूत केला. जगातील सर्व बालकांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना सुखी व समृद्ध जीवन उपलब्ध व्हावे, हा या जाहीरनाम्याचा हेतू आहे. या जाहीरनाम्यावर 193 देशांनी स्वाक्षरी करून आपल्या देशामध्ये बालहक्क मंजूर केले आहेत.
बालकाला विशेष संरक्षण मिळावे, बालकाचा शारीरिक, मानसिक, नैतिक, अध्यात्मिक व सामाजिक दृष्टीने विकास होऊ शकेल, अशा संधी – सुविधा त्याला कायद्याने मिळाल्या पाहिजेत. बालकाला मोफत व सक्तीचे किमान प्राथमिक शिक्षण मिळणे आवश्यक आहे, आदी बाबींचा यात समावेश आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार बालकांना मोफत, सक्तीचे आणि दर्जेदार शिक्षण मिळविण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. बालकांच्या मुलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने 1989 साली “बाल हक्क संहिता” तयार केली असून त्याद्वारे सर्व बालकांना मुलभूत मानवी हक्क मिळण्याचा अधिकार आहे. बाल हक्क संहितेमध्ये एकूण 54 कलमे आहेत. त्यात प्रामुख्याने बालकांचे हित प्रथम, भेदभावाला नकार, जगण्याचा हक्क, विकासाचा, संरक्षणाचा, सहभागाचा हक्क यांचा समावेश आहे.
शिक्षण देणे ही एक विकासाची प्रक्रिया असून, भारतात गुरूला नेहमीच आदर्श मानतात. एक आदर्श व्यक्ती घडविण्यात शिक्षकाचा मोलाचा वाटा असतो. शिक्षक बालकांच्या सहजीवनातील, आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. बालकांना शिक्षित करून त्यांचे हक्क, कर्तव्य व जबाबदारीचे भान त्यास करून देणे ही शिक्षकाची जबाबदारी असते. बालकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात.
बालकांची अवहेलना, बालविवाह, छळ, बालमजुरी, अशिक्षितपणा याने ग्रासलेली समाजात कितीतरी मुले आज आहेत. अशी मुले तुमच्यासमोर आली तर एक ‘शिक्षक’ म्हणून तुम्ही काय कराल?…
ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाचा द्वेष असावा,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी,
फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी…!!
वास्तविक ‘शिक्षण’ म्हणजे काय? मुलांमधील जे काही सर्वोत्तम आहे, ते प्रगट करणे म्हणजे खरे शिक्षण. शिक्षण व समाजसेवेच्या माध्यमांतून देशाची एकात्मता अखंड राखावी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणारी जागा म्हणजेच ‘शाळा’. मुलांमध्ये मुल्यांक व संस्कार घडवून ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक अशा तीनही स्तरांतून मुल्यांच्या संस्काराची प्रक्रिया पूर्ण करणे किंबहुना तशी परिस्थिती आणि पोषक वातावरण तयार करणे हेच शाळेचे काम असते. मुलांना स्वतंत्रपणे विचार करू देणे, त्यानुसार कृती करण्याचे स्वातंत्र्य देणे, त्यांना प्रोत्साहन देऊन मार्ग दाखविणे आणि सर्वोत्तम नागरिक घडविणे हेच प्रत्येक शाळेचे ध्येय असावे.
शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणे, समजून घेणे, स्वत: कृती करणे, समाजाशी जोडलं जाणं, समाजासाठी जीव तुटणं, चंगळवादापासून दूर राहणं, स्वावलंबी होणं, आदर्श नागरिक होणं, संकुचितपणा नष्ट होणं, स्वार्थाला तिलांजली देणं, पर्यावरणाचा प्रश्न समजणं, दुसऱ्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करणं हेच खरं शिक्षण!
आज इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळा यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. दोन्ही अभ्यासक्रमांचा शैक्षणिक दर्जा वेगवेगळा आहे, काठिण्य पातळी वेगवेगळी आहे, पण पुढे जावून दोन्हीकडील विद्यार्थी एकाच रांगेत उभे राहतात. एकुणच शैक्षणिक धोरणात उदासीनता असून त्यात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे.
वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांची शिकण्याची, समजून घेण्याची पातळी वेगवेगळी असते, त्यानुसार त्या प्रकारचे शिक्षण त्यास उपलब्ध व्हावे. मात्र इथे गुणांना महत्त्व न देता त्याला त्या गोष्टींची गोडी कशी लागेल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणजे शाळा = परीक्षा = पास/नापास हे समीकरण बदलून शाळा = शिकण्याची संस्था असे व्हायला हवे. कारण शिक्षण हा प्रवास आहे, स्पर्धा नव्हे, हे आपण ‘शिक्षक’ म्हणून कधी समजून घेणार….?
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू:
गुरुर्देवो महेश्वर:|
गुरु: साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नम:||
प्राचीन काळापासून आपण गुरु आणि शिक्षकाचे महात्म्य ऐकत आलो आहोत. जगात सर्वत्र गुरु आणि शिक्षकांचा आदर केला जातो.
विनोबांच्या मते, “शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान हे समाजनिष्ठ असावे व समाज समतानिष्ठ असावा.” कारण विद्यार्थीनिष्ठ शिक्षक कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण करतो.
डॉ. राधाकृष्णन यांच्या मते, “शिक्षकाने कमीत कमी शिकवून विद्यार्थी स्वत: अधिकाधिक शिकेल यासाठी त्याला प्रशिक्षित केले पाहिजे.”
आजही अनेक शिक्षक प्रतिभावान आहेत, पण त्यांची संख्या कमी आहे. प्रत्येक शिक्षकांनी आपले नित्य कर्तव्य व्यवस्थित पार पाडले तर विद्यार्थ्यांचा तसेच देशाचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल.
आजचे शिक्षण हे पाठांतर, घोकंपट्टी करून फक्त गुणांपुरते मर्यादित झालेले दिसते. मूल्यशिक्षण, चित्रकला, गायन कला, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, व्यावसायिक शिक्षण, खेळ या विषयांना शिक्षणात दुय्यम स्थान दिले जाते, त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत नाही असे जाणवते. खरे तर वास्तव आणि स्वप्न, वर्तमान आणि भविष्य, देश आणि समाज, यांना आकार देण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे. संस्कारसंपन्न शिक्षण माणसाचे जगणं समृद्ध करते.
आजची विस्कटलेली घडी आणि युवकांचा भविष्यकाळ यांना आकार देणारा शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. ‘अध्यापन’ ही समर्पित भावनेने करावयाची साधना असून त्यास केवळ उपजिविकेचे साधन समजू नये. शिक्षण म्हणजे कर्तृत्ववान पिढी घडविणारी ‘प्रयोगशाळा’ आहे. शाळेचा दर्जा हा शिक्षकांच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षणाचे सौंदर्य शिक्षकांवर अवलंबून असते.
कोणतीही शिक्षित व्यक्ती जीवनात यशस्वी झाल्यानंतर प्रथम स्मरण करते, ते आपल्या शिक्षकांचे, गुरुजनांचे. अशा व्यक्तींच्या काळजात आपले नाव सदैव असावे यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवे…
स्वामी विवेकानंद यांच्या मतानुसार ज्ञान हे बाहेरून येत नसून ते आतच असते. त्या ज्ञानाची जाणीव करून देणे म्हणजे शिक्षण. ज्ञानाची जाणीव करून देणारा तो ‘शिक्षक’.
शिक्षणातून काय साध्य करायचे आहे? विद्यार्थ्यांचा विकास कसा होतो? आदर्श शिक्षण पद्धती कशी असावी? हे लक्षात घेतल्याशिवाय उत्कृष्ठ शिक्षक निर्माण होणे शक्य नाही.
ज्ञान देणारा, त्या ज्ञानाचे अनुभवात रुपांतर करणारा, जीवनात उपयोगी पडणारे शहाणपण शिकविणारा शिक्षक अभावानेच पाहायला मिळतो. शालेय जीवनातील शिक्षण हे जीवन जगताना कसे वापरावे? हे शिक्षकाच्या ध्यानीही नसते.
शिक्षणाचा मुख्य उद्देश संस्काराचे बीज रोपण करणे हा आहे. निरीक्षण, अनुभव, अभ्यास हे शिक्षणाचे तीन आधारस्तंभ आहेत. निरीक्षण करून विचार करण्याची कला विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी. वर्गात विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजे कारण प्रश्न पडल्याशिवाय आपण विचार करीत नाही आणि विचार केल्याशिवाय प्रश्न पडत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण देण्याकडे शिक्षकांनी लक्ष दयायला हवे. आपला विद्यार्थी अधिक प्रश्न विचारू लागला तर शिक्षकाला आनंद झाला पाहिजे. पण सद्या प्रत्यक्षात वर्गात असे घडते का?
शिक्षकाने उत्कृष्टतेचा ध्यास, नवीन शिकण्याची आवड, भरपूर वाचन, श्रवण, मनन करायला हवे. उत्तुंगतेची आस आणि जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद शिक्षकात हवा.
शालेय शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आत कोंडलेले नसावे. अनुभवावर आधारित, समृद्ध करणारे शिक्षण असावे.
सद्याची शाळा व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हायलाच हवा. पण पाठ्यपुस्तक, फळा, खडू, डस्टर या चौकटी पलीकडे विचार न करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या Comfort Zone मधून बाहेर पडण्याची वेळ आता आलेली आहे. हीच शिक्षणव्यवस्था सुधारण्याची नामी संधी आहे.
तंत्रज्ञानाचा नेमका वापर कशासाठी? या गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे. आधुनिक माध्यमे वापरून शिक्षण मुलांपर्यंत पोहचवायचे कसे? याची पूर्वतयारी होणे अपेक्षित आहे. वर्षानुवर्षे रुळलेली सवयीची, सोयीची पध्दत सोडून नवी वाट चोखाळण्याची शिक्षकांची मानसिक तयारी आहे का? याचाही विचार होणे गरजेचे आहे.
दररोज चाळीस मिनिटे पाठ्यपुस्तकातील माहितीचा पुरवठा करणे, पाठ्यपुस्तकापुरता शिक्षक, विषयापुरता शिक्षक हा दृष्टीकोन आता बदलायला हवा.
‘मी फक्त माझा विषय शिकवेन’ ही वृत्ती शिक्षकांनी आता सोडायला हवी. विद्यार्थ्यांना माहिती पुरविणारा शिक्षक स्वत:ला आदर्श शिक्षक समजतो, हेच या देशाचे दुर्दैव आहे.
गेल्या काही दिवसांत शिक्षण क्षेत्राशी संबंधित चार बातम्या कानावर आल्या. डी एड / बी एड अभ्यासक्रमांना प्रतिसाद मिळत नाही, इंजिनिअरिंगच्या हजारो जागांवर प्रवेश झालेच नाही, सरकारी शाळांना प्रायोजक शोधण्याची तत्परता आणि कमी पट संख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण – समूह शाळा.
इंग्रजांनी सुरु केलेली शिक्षण पद्धतीत काहीही बदल न करता आपण तीच अनेक वर्ष सुरु ठेवली परिणाम असा झाला की, उद्योगांची गरज वेगळी आणि शिक्षण वेगळे. नोकरीसाठी लागणारे किमान कौशल्य देखील विद्यार्थ्यांमध्ये नाही असा साक्षात्कार झाला. शिक्षण सर्वांपर्यंत नेणे आवश्यक असतांना आपण आठवी पर्यंत सर्व पास, बेस्ट फाइव्ह गुण पद्धतीमुळे भरमसाठ गुण, नापास असल्यास पुढील वर्गात प्रवेश, यांमुळे शिक्षणाचा दर्जा अधिक खालावत गेला.
सरकारी शाळेत इतर सर्व कामे करून शिक्षकांना वेळ मिळेल तेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू लागले. गुणवत्ता ढासळली, गुणवत्ता मोजण्याचे मापकच नसल्यामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट घसरला. दर्जा नाही म्हणून विद्यार्थी नाही.. आणि विद्यार्थी नाही म्हणून शाळा बंद. यातूनच समूह शाळा, प्रायोजक आदि कल्पना पुढे आल्या.
एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर होणे अपेक्षित असतांना फक्त अडीच ते तीन टक्के खर्च केला जातो. शिक्षकांची भरती प्रक्रिया, गुणवत्तेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सरकारी शाळा कमी करायच्या अन खासगी शाळांना मंजूरी देत नवीन शैक्षणिक धोरण राबवायचे. या सर्व परिस्थितीला सरकारी शाळा, तेथील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि राजकीय इच्छा शक्ति कारणीभूत आहे. पोटाची खळगी भरण्याइतपत तरी शिक्षण गरीब, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळायलाच पाहिजे यासाठी आज शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे.
मधुकर घायदार
नाशिक 9623237135