आज आपण स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करतो आहोत. खरचं आपण स्वातंत्र्य आहोत का? आपला देश सुजलाम सुफलाम आहे का? आपणा सर्वांना अन्न, पाणी, निवारा, रस्ते, वीज, दवाखाने यादी जीवनावश्यक सुविधा मिळत आहे का? आपल्याला अपेक्षित असलेले स्वातंत्र्य म्हणजे बेरोजगारीपासून, गरीबीपासून, भ्रष्टाचारापासून, बेईमानीपासून गुन्हेगारीपासून, कुशासनापासून, महागाईपासून बरोबर? पण इतकं सर्वसमावेशक स्वातंत्र्य हवं असेल तर वैयक्तिक स्तरावर प्रश्न विचारण्या पलिकडे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करतो का? हाही प्रतिप्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे कारण निरीक्षण केले तर लक्षात येईल वरील प्रश्नांना सरकार, समाज याबरोबर प्रत्येक व्यक्तीही तितकाच जबाबदार असतो म्हणूनच त्याचे उत्तर शोधण्यातही एक व्यक्ती म्हणून सहभाग घेणे अगत्याचे ठरते.
संवेदनशील माणूस होण्याच्या परीक्षेत आपण नापास होत आहोत. सदया शेतकरी सुरक्षित नाहीत अन् महिलाही सुरक्षित नाही. सहकाराचा स्वाहाकार होतो, शिक्षणाचा बाजार मांडला जातो, शिक्षणात गुणवत्ता दिसत नाही. पदवीचे कागद घेऊन युवक बाहेर पडताहेत, नोकरी नाही कारण कौशल्य नाही. रुग्णालये वाढतात पण रुग्ण कमी होत नाहीत. सरकार, पोलिस हा जनतेचा खरे तर मित्र आहे, पण गोर-गरिबांना, मध्यमवर्गीय साध्यासुध्या माणसांना, सज्जनांना पोलिसांचीच भीती वाटावी अशी परिस्थिति आहे. जिथे प्रामाणिकपणाला किंमत नाही. माणसाने जगणे हीच जिथे जन्मठेप वाटावी अशा व्यवस्थेला स्वातंत्र्य म्हणावे का?
भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्ये दिली आहेत. किंबहुना अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बर्याच वेळेला या कर्तव्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. सरकार कडून विविध नियम पाळण्याचे वारंवार आवाहन करून देखील आम्ही नियम पाळत आहोत काय? वाहतुकीचे नियम, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, मतदान करणे, राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण आपण करतो का? स्वतःच्या जगण्यामध्ये देशासाठी जगणं आम्ही विसरुन गेलो आहोत. त्यामुळेच अत्याचार, भ्रष्टाचार अशा विकृतींनी डोकं वर काढलं आहे.
देश महासत्ता होण्यासाठी प्रत्येकानंच देशाच्या विकासाचं स्वप्न पाहावं पण त्याला कृतीची जोड हवी. कृती करण्याची व तितक्याच तत्परतेने कार्य करण्याची जिद्द आपल्यात हवी.
या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज निर्माण झाली आहे.
संपूर्ण साप्ताहिक शिक्षक ध्येय वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..