व्यवसाय मार्गदर्शन: ज्यूस सेंटर

चला व्यवसाय करु या.. 

आजकाल सर्वच जण आपल्या आरोग्याप्रती जागरूक असतात. विविध प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकजण कमी-अधिक प्रमाणात घेतच असतो. यात योगा-प्राणायाम करणे, व्यायाम करणे, सकाळ-सायंकाळ फिरायला जाणे, संतुलित आहार घेणे याबाबत आज प्रत्येक जण जागरूक आहे. डॉक्टर देखील चांगल्या निरोगी आरोग्यासाठी लोकांना फळे खाण्याचा अथवा विविध फळांचा रस घेण्याचाही सल्ला देतात. वजन कमी करण्यासाठी दिवसातून एकदाच जेवणे, केवळ फलाहार किंवा रसाहार घेणे हे फॅड मागच्या काही वर्षात सर्वत्र पाहायला मिळते. बाजारात अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांनी विविध फळांचा रस पॅकबंद डब्यात ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

निरोगी आरोग्यासाठीची जागरूकता वाढत असतांनाच ताज्या फळांच्या रसाचीही मागणी सद्या वाढत आहे. ताज्या फळांचा रस आरोग्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरत असून आजकाल फळांचा ताजा रस तयार करून विकणे हा एक अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे.

ताज्या फळांचा रस पिणे कोणाला आवडत नाही? वेगवेगळ्या वातावरणात विविध फळांचा रस पिण्याची लोकांना आवड असते. ऊस, चिक्कू, सफरचंद, मोसंबी, संत्री, आंबा, अननस, कलिंगड, कारले, भोपळा यांचा ताजा रस पिणे नक्कीच आरोग्यदायी आहे. आजकाल ‘हेल्थ कॉन्सेंस’ लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आरोग्याविषयीच्या वाढत्या जागरूकतेमुळे फळांचा रस तयार करून त्यांची विक्री करणे हा एक नाविन्यपूर्ण व्यवसाय युवक सुरु करू शकतात. यासाठी चांगल्या प्रतीचा रस तयार करण्याचे कौशल्य मात्र अंगी हवे.

फळांचा रस स्वच्छ वातावरणात आणि सुयोग्य पद्धतीने तयार केलेला असेल तरच तो आरोग्यासाठी लाभदायक ठरतो.

डबाबंद किंवा पकबंद फ्रुटज्यूसची बाजारपेठ सद्या सुमारे एक हजार कोटी रुपयांची आहे. यात दरवर्षी वीस ते तीस टक्के इतक्या वेगाने वाढ होत आहे. फळांवर प्रक्रिया करून त्यांचा रस बाटलीत किंवा टेट्रापॅक करून तो विक्री केला जातो. कॅनिंग किंवा फळप्रक्रिया म्हणजे एखादा अन्नपदार्थ हवाबंद डब्यात सील करून जास्तीतजास्त दिवस टिकविण्याच्या पद्धतीला कॅनिंग असे म्हणतात. कॅनिंगसाठी पल्पर, ड्रायर, कमर्शिअल मिक्सर, वजनकाटा, पकिंग मशीन, सील करायचे मशीन, गाळणी, चिमटे, उलथनी, नरसाळे, वेगवेगळ्या आकाराच्या बाटल्या, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आदी साहित्यांची आवश्यकता असते. यांचा खर्च साधारणत: पन्नास ते साठ हजार रुपये येतो. फळांचा ताजा रस तयार करून विक्रीसाठी वर्दळीचे ठिकाण, जॉगिंगपार्क आदी ठिकाण बघून तिथे ‘ज्यूस सेंटर’ सुरु करता येते. फळे आणि रस बनविणारे यंत्र आदी साहित्य स्वस्तात म्हणजेच दहा हजारांपेक्षा कमी खर्चात देखील हा व्यवसाय आपण सुरु करू शकतो.

मधुकर घायदार

नाशिक ९६२३२३७१३५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button