गणिताला आधुनिक शिक्षणात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गणित हा आधुनिक शिक्षणाचा प्राण आहे व त्यामुळेच गणिताने जीवनाला खऱ्या अर्थाने परिपूर्णता आली आहे. सर्व सुख सोयीनी समृद्ध असे हे आधुनिक जग गणिताच्या भक्कम पायावर उभे आहे. सध्याचे जीवन हे असे गुंतागुंतीचे आहे की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा अनिवार्य बनली आहे. गणितातील अंतर्गत सुधारणा विकासाशी निगडित आहे. प्रगती ह्या देशाच्या आणि समाजाच्या सुधारणांशी, विकासाशी निगडित आहे. आधुनिक जगाचे अस्तित्व व त्यांच्या प्रगतीचे मूळ हे गणितच आहे. गणित सर्व स्पर्शी आहे. मानवी जीवनातील बहुतांशी व्यवहार कोणत्या तरी प्रकारे गणिताशी संबंधित आहे.
प्रत्येक विद्यार्थी उद्याचा व्यापारी नाही हे मान्य आहे व सत्यही आहे. परंतु खरेदी विक्री शेकडा, नफा तोटा या सर्वांचा अर्थ व त्यांच्या आकडे मोडीची पद्धत गणिताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहीत झाल्याने आजचा विद्यार्थी जेव्हा स्वतंत्रपणे समाजात वावरेल तेव्हा निदान त्याला त्याच्या पुरते व्यवहार ज्ञान तरी तो जागरूकतेने स्वीकारेल. कर्ज घेणे, कर्जावरील व्याज आकारणे, ठराविक मुदतीची ठेव ठेवणे, चालू खात्याचे व्यवहार करणे, विविध बचत खात्यांचा लाभ घेणे इत्यादी. बँकेची संबंधित व्यवहार तसेच पत्र पाठवणे, बचत खाते उघडणे, इ. पोस्टाचे व्यवहार सुलभतेने करता येणे हे गणिताच्या सहाय्याने सहज साध्य होते. जमा खर्च लिहिण्याची पद्धत, आयकर, पाणी व विज यांच्या वापराबद्दल विशिष्ट दराने होणारी आकारणी यांच्या ज्ञानाने तो उद्याचा सज्ञान व जबाबदार नागरिक पुण्यात गणितच मदत करते. दैनंदिन जीवनात कराव्या लागणाऱ्या मोजमापासाठी आवश्यक ती समज व कौशल्य भूमितीच्या अभ्यासातून निर्माण झालेली असतात. केवळ आर्थिक समस्यांना तोंड देणे एवढेच दैनंदिन जीवनात मानवाला करावे लागते असे नाही तर याखेरीज विविध समस्यांना सामोरे जावे लागते. याबाबतीतही गणिताचा अभ्यास केलेली व्यक्ती अधिक समर्थपणे तोंड देऊ शकते कारण गणिताच्या अभ्यासाने एक वैचारिक बैठक तयार झालेली असते.
घराची, शाळेची खूण सांगताना, घर नंबर पिनकोड ठरवताना, गणिताचे सहाय्य घ्यावे लागते. गणित ही एक विचार पद्धती आहे ती एक संक्षिप्त अशी भाषा आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये ही गणिताचा मोठा वाटा आहे गणिताच्या अध्ययनामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास, विचारातील नेटकेपणा, नेमक्या भाषेचा वापर करण्याची सवय, विचारात तर्क शुद्धता व एकाग्रता, विधायक कल्पकता, विचारांचा स्वतंत्रपणा इ. गुणांचा सहाजिकपणे विकास होतो. वर्तनात एक प्रकारची शिस्त येते व सर्व गोष्टी नीटनेटकेपणाने करण्याची सवय लागते. जीवनाच्या व्यवहारिक आणि वैयक्तिक बाबींशी गणितांचा घनिष्ठ संबंध आहे हे जितके खरे तेवढेच हेही खरे आहे की जीवनाची गणिताशी भावनिक जवळीक आहे. अंतर्गत एकसूत्रता क्रमबद्ध, संक्षिप्त भाषेचा विचार करणे व मांडणे यामुळे गणित ही एक कला आहे.
गणिताच्या अभ्यासामुळे जीवनातील सौंदर्याचा आस्वाद घेणे, सौंदर्याची निर्मिती करणे हे साध्य होते. जीवनाच्या बौद्धिक, व्यवहारिक आणि भावनिक अशा तीनही अंगाशी गणिताचे निकटचे नाते आहे. गणित हा संस्कृतीचा जाणू वारसाच आहे ज्या देशातील गणितशास्त्र अधिक प्रगत विकसित असते. तेथील संस्कृती ही तेवढीच विकसित असते. मानवी जीवनावर गणिताचा सखोल व व्यापक परिणाम होतो त्याचप्रमाणे व्यक्तिमत्वावर लक्षणीय ठसा उमठवला जातो. गणित सर्व शास्त्रांची गुरुकिल्ली आहे अशा तऱ्हेने गणित हा जीवनाचा आधार आहे.
श्री. नवनाथ घुले
नृसिंह माध्यमिक विद्यालय भातोडी ता. जि. अहमदनगर