आजच्या या धावत्या व संगणक शास्त्राच्या युगात व्यक्तिमत्व विकास हा शब्द बऱ्याच वेळा ऐकिवात येतो. व्यक्तिमत्व विकास याचा संबंध दैनंदिन जीवनातील वागणुकीसह शिक्षण, खेळ, कलेमध्ये प्रावीण्य मिळवणे या गोष्टींशी लावला जातो. यावरून मनामध्ये विचार येतो की, व्यक्तिमत्व विकासाचे एवढेच पैलू आहेत का? आजकाल घेतल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्व विकासाच्या पंधरा दिवसांच्या किंवा महिन्याभराच्या शिबिरांमधून व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो का? मूल जन्माला आल्यापासून त्याच्यावर होणाऱ्या संस्काराच्या माध्यमातून, त्याला समजू लागल्यापासून त्यालायेत असलेल्या अनुभवातून त्याचा व्यक्तिमत्व विकासाचा पाया रचला जात असतो. त्या मुलाच्या जडणघडणीमध्ये त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीचा व घडणाऱ्या घटनांचा कळत नकळत त्या मुलावर परिणाम होत असतो आणि त्या गोष्टींचा त्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर ठसा उमटत असतो.
व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय?
व्यक्तिमत्व विकास म्हटले की, फक्त दिसणं आणि बोलण्याच्या चौकटीत समोरच्या व्यक्तीला अडकवून त्याच्याकडे पाहिले जाते. समाजामध्ये वावरताना चांगल्या पद्धतीने बोलणं, व्यवस्थित राहणं यातूनच आपल्या आजूबाजूचे लोक आपले व्यक्तिमत्व प्रभावी आहे का नाही याचा अंदाज लावताना आपल्याला पाहायला मिळतात. व्यक्तिमत्व म्हणजे फक्त आपले दिसणे आणि बोलणंच नव्हे तर त्याच्याही पलीकडे असतं. आपले आचार-विचार, अंतर्गत सौंदर्य, आपल वागणं हे सगळं देखील आपल्याच व्यक्तिमत्त्वाचेच भाग आहेत.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, व्यक्तिमत्व विकास म्हणजे एखादी व्यक्ती तिचे रूप, स्वभाव, वर्तणूक, दृष्टिकोन, चरित्र, बुद्धिमत्ता, कौशल्य, भावभावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह, गुण-अवगुण आणि सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक असणे म्हणजे व्यक्तिमत्व होय आणि या सर्वांचा आपल्या वागणुकीमध्ये विकास करणे म्हणजेच आचरणात आणणे म्हणजे व्यक्तिमत्व विकास होय असे मला वाटते.
विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास का महत्त्वाचा आहे?
व्यक्तिमत्व विकास हा विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासात यशस्वी होण्यासाठी, स्वतःमध्ये आवश्यक ते संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करते. व्यक्तिमत्व विकास प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एक विद्यार्थी म्हणून तर हे अधिकच महत्त्वाचे आहे, कारण ते तुम्हाला तुमच्या करियर सह विद्यार्थी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात येतील त्या समाजातील विविध घटकांची संवाद साधताना याचा नक्कीच त्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातच व्यक्तिमत्व विकास होणे महत्त्वाचे आहे, कारण त्यातूनच त्या विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकास वाढू शकतो. संवाद आणि परस्पर कौशल्य सुधारू शकतो आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक यश मिळवू शकतो.
व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास सहजपणे होऊ शकतो. पण आजच्या या धावपळीच्या युगात मानवाच्या जीवनातून खेळ हा घटक नाहीसा होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या या विकासाच्या युगात वाढत्या शहरीकरणाचा आणि पसरणाऱ्या इमारतीच्या जाळ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या खेळासाठी मैदानच उपलब्ध नाहीत. अशा बऱ्याच शाळा आहेत की त्या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी त्या शाळेला जागेअभावी मैदान उपलब्ध नाही. विद्यार्थी शालेय जीवनातच खेळाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक दृष्ट्या कणखर बनत असतो. व्यक्तिमत्व विकासामध्ये खेळाचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी व व्यक्ती हा सुदृढ बनत असतो. व्यक्तिमत्व विकासामध्ये शरीरयष्टीला फार महत्त्व आहे आणि खेळाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचे दिसणे, त्यांचे वागणे, बोलणे या गोष्टी विकसित होत असतात. मानसिक विकासामध्ये खेळाडू हा खेळाच्या माध्यमातून सक्षम व संयमी बनत असतो.
व्यक्तिमत्व विकासाठी काही दैनंदिन जीवनातील सोप्या सोप्या गोष्टी जर आपण अंमलात आणल्या तर आपला व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी फार मोठी मदत होते त्या गोष्टी खालील प्रमाणे–
१. पूर्ण झोप घेणे २. कामाचे व्यवस्थापन करणे ३. तत्परता ४.घरचे आजूबाजूचे वातावरण पोषक असणे ४.जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पार पाडणे ५. आपल्याबद्दल कोण काय बोलतोय याकडे दुर्लक्ष करणे ६.आपल्या कामाचे व्यवस्थितरीत्या वेळापत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी करणे ७.आपली आपल्या सहकाऱ्यांशी किंवा इतरांशी तुलना न करता, स्वतःला कमी न लेखता कार्य करत राहणे.
या व अशा अनेक गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात वावरताना अवलंब केला तर नक्कीच आपल्या व्यक्तिमत्व विकासाचा आलेख उंचावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही क्षेत्रात सफलता मिळवायचे असेल तर, आपल्या व्यक्तिमत्त्वाला ओळखणे फार महत्त्वाचे आहे. व्यक्तिमत्व हे फक्त बाह्यांगाशी संबंधित नसून ते आपल्या मनाशीसुद्धा संबंधित आहे. शरीर व मनाचा घनिष्ठ संबंध असल्यामुळे या दोन्हींची छाप आपल्या व्यक्तिमत्त्वावर पडत असते.
व्यक्तिमत्व विकास झाल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्याची एक नवी दिशा मिळते. भिती, न्यूनगंड, कमीपणा, उतावळेपणा, भांडखोरवृत्ती, निघून जाऊन आत्मविश्वास, धाडस, साहस, पॉझिटिव्ह विचारशक्ती, संयम या सगळ्या गोष्टी आपल्या वागण्या बोलण्यातून दिसायला लागतात. एक आदर्श व्यक्ती म्हणून आपली ओळख समाजात निर्माण होऊ लागते.
चला तर मग करा व्यक्तिमत्त्वाचा विकासआयुष्य बनवा झकास…
श्री. किरण विकास काळे
जि. प. प्राथ. शाळा, पिसोळी
ता. हवेली जि. पुणे
मो. ८८८८८००७४५