सागराला किनाऱ्याची,
आकाशाला क्षितिजाची
मर्यादा असते पण ।
शाहू महाराजांच्या कार्याला
मर्यादाच नाही ।।
कोल्हापूर संस्थानात आरक्षण देणारा पहिला राजा… जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रुपयाचा दंड ठोकणारा राजा.. अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद यावर प्रहार करणारा राजा.. डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा.. बहुजन आणि सर्वसामान्य लोकांच्या मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण देणारा राजा.. समाजातील सर्व घटकांना समान वागणूक मिळावी म्हणून शाळा, पाणवठे, दवाखाने सर्वाना खुला करून देणारा राजा.. जातीपातीच्या भिंतीमध्ये गाडलेल्या आणि गंजलेल्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा राजा.. सती जाणाऱ्या स्त्रियांना सन्मानाचा मार्ग म्हणून विधवा पुनर्विवाहाचा कायदा करणारा राजा.. कलावंतांना राजाश्रय देणारा राजा.. बाळ तू शिकला नाहीस तरी चालेल पण तू टाकीत जा असा म्हणणारा राजा.. सहकारी संस्था निर्माण करणारा राजा… बहुजनांच्या मुलांसाठी वसतिगृह बांधणारा राजा.. सर्व क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारा राजा…रयतेचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ करणारा राजा….. असा सर्वगुणसंपन राजा म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज.
राजर्षी शाहू महाराज या नावाची आख्या महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळे त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही : पण खंत ही आहे की आजची तरुण पिढी त्यांना केवळ नावाने ओळखते. त्यांची कार्ये त्यांनी मांडलेले विचार याची त्यांना म्हणावी तितकी माहिती नाही. माहिती ती कशी असणार? आजचा तरुण व्हाट्सअप्प फेसबूकवर फक्त महाराजांचा फोटो Dp म्हणून ठेवण्यात व्यस्त आहे एक दिवस स्टेटस ठेवले किंवा फेसबुक वर एखादी पोस्ट शेअर केली की झाली जयंती असे मानणाऱ्या तरुणाला त्यांचे चरित्र वाचायला वेळ आहे तरी कोठे ? समाजाच्या त्या काळी खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाचा या लोकनायकाची जाती पातीच्या अंधान्या जगात पुन्हा अडकत जाणाऱ्या महाराष्ट्र देशाला आज पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे.
शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळा होता. विशेष करून बहुजन समाजाची तत्कालीन स्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते. त्या दिशेने पाऊल टाकीत त्यांनी सर्वप्रथम त्या समाजातील घटकांना साक्षर करण्याचे शिवधनुष्य उचलले. समाजात शिक्षणाचा मोठ्या स्तरावर प्रसार केला. संपूर्ण कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मुख्य म्हणजे मोफत केले. त्यासाठी म्हणून त्यांनी उज्जभ्रू वर्णाच्या आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा चालवण्याची जी पद्धत होती ती बंद केली.
मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव तरतूद केली पाहिजे अशी कल्पना महात्मा फुले यांनी केली होती ती. प्रत्यक्षात, शाहू महाराजांनी सत्यात उतरवली. 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना 50% जागा. राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. समाजातील सर्व घटकांना समानतेची वागणूक मिळावी. म्हणून त्यांनी शाळा, दवाखाने, पाणवठे, विहिरी, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या केल्या, डेक्कन रयत असोसिएशन ही देखील शाहू महाराजांचीच देणं होय. 1917 साली त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करून घेतला.
अशा या युगप्रवर्तक राजाला अवघे ४८ वर्षांचे आयुष्य लाभले, पण त्यांनी केलेले कार्य आज २१ व्या शतकातही प्रेरणादायी ठरते. म्हणून म्हणावेसे वाटते कि…
असा देह मिळवावा,
चंदनासारखा झिजवावा।
आयुष्य संपले तरी,
सुगंध दरवळत रहावा ॥ अशा या थोर राजाने 6 मे 1922 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्या दिवशी संपूर्ण समाज जणू पोरका झाला.. पण त्यांचे विचार आणि कार्य मात्र नेहमीच समाजाला प्रेरणा देत राहिले आहेत आणि यापुढे देत राहतील हे मात्र नक्की…
अश्विनी सुभाष दीक्षित
शारदाबाई पवार विद्यानिकेतन डे स्कूल शहादानगर ता. बारामती जि. पुणे
८३०८८९७२५८