किशोरावस्थेतील मुलांच्या भावविश्वाचा तळ ढवळणारी कादंबरी ‘शाळा’

मौज प्रकाशनाने २००४ साली पहिली आवृत्ती काढली आतापर्यंत या कादंबरीचे पंधरावेळा पुनर्मुद्रण झालेले आहे. या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर झाले असून, यावर आधारित नाटक व हिंदी तसेच मराठीत चित्रपट सुद्धा निघाले आहेत. शालेय वातावरण, शाळेतील शिक्षकांची मुलांच्या भाषेतील वैशिष्ट्ये, त्या काळातील मुलामुलींचे एकमेकांकडे बघण्याचे दृष्टीकोन व त्यांच्यातील संबंध, आदींचे चित्रण करताना शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी, अभ्यासक्रमातील नीरसपणा, अध्ययन-अध्यापनातील फोलपणा, आनंददायी शिक्षणाच्या मुलांच्या संकल्पना यावर बोट ठेवताना लेखकाने या कादंबरीच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केले आहे.

किशोरावस्थेतील मुलांच्या या संक्रमण कालावधीत त्यांच्यात अनेक बदल होतात. शारीरिक विकासाबरोबर मानसिक, बौद्धिक व सामाजिक असा सर्वसमावेशक विकासाच्या या काळातील मुलांचे भावविश्व ‘शाळा’ या कादंबरीत मिलिंद बोकील यांनी रेखाटले आहे. देशातील आणीबाणीच्या काळातील सामाजिक वातावरण असलेली पार्श्वभूमीवर मुंबईच्या जवळील एका उपनगरात नववीत शिकणाऱ्या चार शाळकरी मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना या कादंबरीत आहेत. या चारही मित्रांच्या आवडीनिवडी, त्यांची घरची सामाजिक पार्श्वभूमी यात बरीच तफावत आहे. एकाच वर्गात शिकत असल्यामुळे त्यांच्यातील मैत्रीचा वीण अगदी घट्ट आहे. शालेय वातावरण, शाळेतील शिक्षकांची मुलांच्या भाषेतील वैशिष्ट्ये, त्या काळातील मुलामुलींचे एकमेकांकडे बघण्याचे दृष्टीकोन व त्यांच्यातील संबंध, शाळेतील विविध उपक्रम आदींचे चित्रण करताना शिक्षणव्यवस्थेतील त्रुटी, अभ्यासक्रमातील नीरसपणा, अध्ययन-अध्यापनातील फोलपणा, आनंददायी शिक्षणाच्या मुलांच्या संकल्पना यावर बोट ठेवताना लेखकाने या कादंबरीच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केले आहे. वाचणाऱ्या प्रत्येकाला ही शाळा आपली वाटते, हे मित्र आपल्या आसपास होते, आपणही कधीकाळी या व्यवस्थेचे भाग होतो अस वाटते. त्याच ओढीने ही कादंबरी आपल्याच भूतकाळाच जणूकाही प्रतिबिंब आहे अस वाटून जाण हेच या कादंबरीच यश आहे. मौज प्रकाशनाने २००४ साली पहिली आवृत्ती काढली आतापर्यंत या कादंबरीचे पंधरावेळा पुनर्मुद्रण झालेले आहे. या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर झाले असून, यावर आधारित नाटक व हिंदी तसेच मराठीत चित्रपट सुद्धा निघाले आहेत.

या कादंबरीचा नायक मुकुंद जोशी व त्याचे तीन मित्र एकाच नववीत शिकणारी मूलं. सूऱ्या (सुरेश) जो शाळेचे देणगीदार म्हात्रे शेटचा मुलगा. स्वतःच्या वडिलांना सोडून कुणालाही न घाबरणारा अगदी बिनधास्त. हा श्रीमंत असला तरी अभ्यास आजीबात न आवडणारा. चित्र्या (चित्रे) ज्याचे आईवडील दोघेही नोकरी निमित्त्ताने रोज बाहेर जाणारे. याला प्रयोग करण्याची भारी हौस. त्याला शास्त्रज्ञ व्हायचे आहे. फावड्या (पांडुरंग) संध्याकाळी मंडईत भाजी विकून आईला मदत करणारा. असा हा मित्रांचा ग्रुप रोज शाळेच्या आधी एकदीड तास आधी सूऱ्याच्या नवीनच बांधकाम चालू असलेल्या बिल्डींगमध्ये जमतात. ह्या बिल्डींग खालून शाळेचा रस्ता जातो. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरून फावड्या आणि सूऱ्या मुलींना वेगवेगळ्या नावाने चिडवित असतात.

      शाळेतील सगळ्या शिक्षकांना टोपण नावे पाडलेली असतात. खाजगीत बोलताना ह्याच नावानी त्यांना संबोधल जात. प्रत्येक शिक्षकांची चांगल्या वाईट गुणांची चर्चा त्यांच्या त्यांच्यात लावलेल्या जोड्या, ऑफ तासाची धमाल, आवडत्या विषयांची व आवडत्या शिक्षकांविषयीचा आदर, नावडते विषय व शिस्तीचे भोक्ते असणारे शिक्षक व त्यांच्या बद्दल मुलांच्या मनात असलेले त्यांचे स्थान याविषयीच्या चर्चा या पुस्तकाच्या पानापानातून ओसंडून वाहतात. या वयातील मुलांचे मुलींबद्दल असणारे आकर्षण व त्यातून होणारी त्यांच्या मनातील चिलबिचल मनास भावते कारण या अवस्थेतून कधीकाळी आपणही गेलेलो असतो. त्या काळात रूढ असलेले शब्दप्रयोग लाईन मारणे, लाईन देणे या मित्रांच्या तोंडी सातत्याने येतात. या अजाणत्या वयात होणारा हा बदल लेखकाने सहज टिपत सुंदर पद्धतीने मांडला आहे.

     आपल्या आवडत्या व्यक्तीचे लक्ष वेधण्यासाठी या मुलांची धडपड, त्यासाठी केलेले विविध प्रयत्न, आणि हव ते साध्य झाल्याचा आनंद किंवा नकारामुळे येणारी उद्विग्नता त्यातून मित्रांच्या मदतीने अनेक प्रसंगाला धीरोदात्त पद्धतीने सामोरे जाणे या उद्योगांमुळे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष त्याचा प्रगतीपत्रकावर होणारा परिणाम, त्यातून घरच्यांशी होणारा विसंवाद हे सार काही घडत कथानक पुढे सरकत जाते.

        ही सर्व मुले अभ्यासाच्या बाबतीत मागेपुढे असले तरी अभ्यासाव्यतिरिक्त इतर सहशालेय उपक्रमात ते पुढे आहेत. कारण ती त्यांची आवड आहे. कथेचा नायक बुद्धीबळ खेळात सर्वात पुढे असतो. चित्र्याला विविध प्रयोग करण्यात आवड असल्यामुळे विज्ञान प्रदर्शनात त्याचा कोणी हात धरू शकत नाही. सूऱ्या अभ्यासात हुशार नसला तरी तो इतरांना मदत करताना सर्वात पुढे असतो. वर्गातील मुलांना त्याचा मोठा आधार वाटतो. फावड्या क्रिकेट चांगला खेळतो, आईच्या भाजी विकण्याच्या कामात मदत करीत शिकत असतो.

       या मुलांची घरच वातावरण देखील वेगवेगळ आहे. मुकुंदचे वडील सचिवालयात नोकरी करतात. वेळोवेळी मुकुंदला समजून घेवून त्याची पाठराखण करतात. त्याची बहिण कॉलेजला आहे. त्याचे मामा मुंबईत इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. मामा आणि त्याचे नाते मित्रासारखे असल्याने मामाबरोबर अनेक खाजगी गोष्टी तो सहज शेअर करतो. सुऱ्याचे वडील श्रीमंत असले तरी दारू पिल्यावर सूऱ्या चांगलाच मार मिळतो. चित्र्याचे आईवडील दोघेही नोकरीनिमित्ताने दररोज घराबाहेर असतात. त्याचे वडील ड्रिंक्स घेतात त्यामुळे त्यांच्या घरात आईवडिलांचे सतत भांडण होत असतात. त्याला व त्याच्या भावाला सांभाळणारी व घरकाम करणाऱ्या बाईच्या विचित्र वागण्यामुळे तो बराचवेळा निराश होतो. फावड्याला वडील नाहीत त्यामुळे आईच घर चालविते. भाजी विक्रीच्या व्यवसायात तो आईला मदत करतो.

      कादंबरीचा काळ हा आणीबाणीचा आहे. याचे पडसाद शाळेत आणि गावातही पडताना दिसतात. मुकुंदच्या चाळीत दोन अविवाहित तरुण राहतात ते आणीबाणीच्या आंदोलनात सहभागी असतात. तिथे गुप्तपणे या विषयावर अनेक बैठका होतात. मुकुंदची बहिण या चळवळीत सहभागी असणाऱ्या व त्यांच्या चाळीत राहणाऱ्या विजय नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडते. पण हे मुकुंदला खूप उशिरा कळते.

    मुकुंदला त्याच्याच वर्गातील शिरोडकर नावाच्या मुलीबद्दल प्रचंड आकर्षण आहे. तिला भेटण्यासाठी तो क्लास लावतो जो त्याला आवडत नाही. तिला भेटणे तिच्या घराकडे अनेक वेळा चकरा मारणे. तिच्या घरी जाणे तिची वाट पाहणे हे सर्व होताना त्याच्या प्रेमसुलभ भावना आपल्याला समजतात. एकीकडे तिने दिलेला प्रतिसादाचा आनंद आहे मात्र त्याचवेळी या नात्याच असणार भविष्य याबाबत मनात होणारा संभ्रम आहे. वर्गात होणाऱ्या मानापमानाची काटेरी टोचणारी सल आहे.

       या कादंबरीत अनेक उपकथानके आहेत. त्याच्या वर्गात नव्यानेच आलेली अनिता आंबेकर नावाची विद्यार्थिनी, सर्व मुलांच्या आवडते शिक्षक मांजरेकर सरांच्या प्रेमात पडते त्यातून तिचा आत्महत्तेचा प्रयत्न त्यातून सरांना पोलीस घेवून जातात, शाळेतून काढून टाकल जात. यात सरांची काहीच चूक नाही हे मुलांना चांगलच माहित असते. महेश व सुकडीचे प्रेमप्रकरण, असे अनेक उपकथानके वाचताना मजा येते.

नववीचा वर्ग सुरु होताना कथानक सुरु होते. वर्षभरातील अनेक प्रसंग वाचताना आपण आपल्या भूतकाळातील शाळेत जावून पोहचतो. नववीचा निकाल लागतो. दरम्यानच्याच्या काळातील सुट्टीत मुकुंद नरुमामाच्या लग्नासाठी गेलेला असतो. याच काळात शिरोडकरच्या वडिलांची बदली झाल्याने त्यांचे कुटुंब गाव सोडून गेलेले असते. तिचे असे अनपेक्षितपणे गाव सोडून जाणे, तिची भेट न होणे, आधी घडलेल्या अनेक गैरसमज दूर न करता आल्याची सल त्याच्या मनाला टोचत राहते. बरोबरीचे मित्र सूऱ्या, फावड्या नापास झालेले असतात. चित्र्याचे कुटुंब बांद्र्याला हलणारा असते. असे हवेहवेसे शाळेचे दिवस संपतात. दहावीच्या वास्तवाच्या वळणाशी मुकुंदला आणून लेखक कादंबरीचा शेवट करतात. या एका वर्षात मुकुंदाच्या आयुष्यात किती घडामोडी घडतात. किती अनपेक्षित वळणे येतात. त्या वळणावर स्थिरावताना त्याच्या मनाची होणारी घालमेल, शाळेतील वातावरण, शिस्तीचा बडगा, स्वच्छंदपणे जगण्याचा मोह आणि त्यातला आनंद, वेळोवेळी झालेला भ्रमनिरास, कुमारावस्थेतील मुलांच्या मनाच्या भावनांचे वास्तव चित्रण करताना लेखकाची बिनधास्त भाषाशैली वाचनीय आहे. चार भिंतीच्या बाहेरील शाळा सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. कारण वर्गातला तो नीरसपणा त्यात नसतो. सक्तीचे वातावरण त्यात नसते. यावर भाष्य करताना मुकुंद एका ठिकाणी म्हणतो ‘त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र सुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईच्या पाठींवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. ह्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेला वर्ग नाहीत, फळा नाही, शिक्षक नाही; पण त्यातल शिकण फार सुंदर आहे’.

पुस्तकाचे नाव – शाळा

लेखक – मिलिंद बोकील

प्रकाशक – मौज प्रकाशन

किंमत – ३०० रुपये;  पृष्ठ – ३०३

[संतोष दिवे, {एम.ए; डी.एड; बी.एड; डी.जे. (पत्रकारिता) पी.एच.डी. (AAP)}  हे संगमनेर येथील मराठी युवा साहित्य अभ्यासक आहे.]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button