ठेविले अनंते तैसेचि रहावे ।
चित्ती असो द्यावे समाधान ॥
संत तुकोबांचा हा अभंग आपण नक्कीच वाचला किंवा एकला असेल.
लहानपणी प्रत्येकाला कुठला तरी छंद असतो पण आपण तो छंद मोठेपणी जोपासतो का? नाही, कारण आपला छंद जोपासण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, कष्ट आणि चिकाटीची आवश्यकता असते.
मोठे झाल्यावर, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण मिळेल ती नोकरी पत्करतो. खरचं त्या कामाची आपल्याला आवड असते का? नाही ना? छंद जेव्हा करिअर बनतो तेव्हा तो नेहमी आनंदी असतो. काम करता करता आनंद मिळविणे आणि आनंदी राहता राहता समाधानी राहणे हेच तर मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असते.
आनंद या शब्दाला मराठी भाषेत विरुद्ध अर्थी शब्द नाही. सुख विरुद्ध दुःख मग आनंदी विरुद्ध?
आनंदी असणारा प्रत्येक जण समाधानी असतोच असे नाही, पण समाधानी असणारा प्रत्येक जण आनंदी असतोच.
मानवी जीवनाचे सुख कश्यात आहे? खरे सुख समाधानात आहे, त्यागात आहे. कोण कश्याने समाधानी होईल हे सांगणे कठीण आहे.
समाधान हीच आत्म्याची एक अवस्था आहे. आत्म्याची आनंदमयी अवस्था.
नामाचा परीसस्पर्श झाला की मानवी जीवनाला सोन्याची झळाळी येते. अशा प्रकारचा समाधानी व्यक्ती आपल्या निरपेक्ष कामाने, निस्वार्थ वृत्तीने, दृढनिश्चयी स्वभावाने इतरांच्याही जीवनात प्रसन्नतेची पहाट फुलवतो.
आपण आशावादी, प्रयत्नवादी राहण्याइतकेच समाधानी राहणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याला ज्यात समाधान मिळते ते शोधणे आवश्यक आहे. आपले कर्मच आपल्याला समाधानी बनवते.
आपण आपले नित्य कर्तव्य, कर्म प्रामाणिकपणे केले पाहिजे. आपला कामचुकारपणा जरी इतरांच्या लक्षात नाही आला तरी आपण तो जाणतोच ना. कुणी बोलो अथवा न बोलो आपण आपल्यातील प्रामाणिकतेचा, परिपूर्णतेचा, आवडीचा, सतत ध्यास घेतला पाहिजे. त्याने आपोआपच समाधान लाभते.
वृक्ष जमिनीच्या आधारानेच उभा राहतो. तो जर जमिनीपासून वेगळे होण्याचा विचार करेल तर त्याचे अस्तित्व टिकेल का? त्याचप्रकारे मानवी जीवनाची स्थिरता व समाधान यांचा आधार आहे – त्याग, दया, परोपकार, पवित्रता, प्रामाणिकपणा हे गुण. या सद्गुणांची जोपासना जेवढी जास्त, या गुणांची वृद्धी जास्त, तेवढे आपण मनाने स्थिर, संतुष्ट, एकाग्र व समाधानी राहू शकू.
सुख हे मानण्यावर आहे असे म्हणतात. टेबलवरील अर्धा ग्लास रिकामा की अर्धा पाण्याने भरलेला? सकारात्मक विचारसरणी अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे. याचा अर्थ असा आहे की तुमच्याजवळ जे काही आहे त्याचा पुरेपूर वापर करून अवघे विश्व सुखी करण्याचा प्रयत्न करावा.
बदल स्वतः पासून सुरु करा. आपण प्रत्येक कामात, गोष्टीत आनंद मानायला शिका. आनंद वाटा आनंद मिळेल. सुख वाटा सुखी व्हाल. आनंदी, सुखी समाधानी ही एक मनाची उच्चतम अवस्था आहे. मी एक आनंदस्वरूप आत्मा आहे. परमात्म्याने माझी निर्मिती का आणि कशासाठी केली आहे? हे ज्या दिवशी आपणास समजेल त्या दिवशी खरे समाधान आपल्याला मिळेल. मग त्यानंतर कश्याचीच गरज उरणार नाही. आपले ध्येय ठरलेले असेल आणि आपले कर्म ठरलेले असेल. त्यात आनंद, समाधान मिळवत पुढील काळ आपण मनसोक्तपणे जगू शकतो.. कारण आपल्याला अंतिम जाणीव झालेली असेल की आत्मा आणि परमात्मा एकच आहे. आपल्याला मुक्कामी कुठे जायचे आहे. शेवटी हे उमगल्यानंतर कशाचीही कमतरता भासत नाही. आनंद, सुख आणि समाधान ओसंडून वाहू लागते.
मधुकर घायदार
नाशिक 9623237135