राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा सण भारतात तसेच अनेक देशांमध्ये हिंदू बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. श्रावण महिन्यात पौर्णिमेलाच येणाऱ्या या सणाची भाऊ आणि बहीण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात. राखी पौर्णिमा हा सण भारतात बहिण-भावाच्या अतूट प्रेमाचे, विश्वासाचे, आपुलकीचे प्रतिक म्हणून घरोघरी साजरा केला जातो.
सर्वप्रथम इंद्राची पत्नी इंद्राणीने भगवान विष्णूच्या सांगण्यावरून एक पवित्र धागा मनगटावर बांधला आणि त्यानंतर देव अन् दानवांच्या युध्दात इंद्र देवाने विजय मिळविला. राणी द्रौपदीने श्रीकृष्णाला बांधलेली साडीची चिंधी राखीचेच प्रतिक आहे.
सिकंदर भारतात आला तेव्हा राजा पुरू कडून त्याचा पराभव झाला होता. त्यावेळी सिकंदर च्या पत्नीने सिकंदरचा जीव वाचविण्यासाठी राजा पुरु कडे राखी पाठविली होती. त्यानंतर पुरू सिकंदर यांचे युद्ध थांबले होते. इतिहासात चितौडची राणी कर्नावतीने हुमायू बादशाहाला पाठवलेली राखीची कथा अजरामर आहे.
महाराष्ट्रात या सणाला नारळी पौर्णिमा, उत्तरेत कजरी पौर्णिमा आणि दक्षिण भारतात अवनी अवीट्टम म्हणतात.
बहीण भावाला ओवाळते अन् त्याच्या मनगटावर राखी बांधते आणि आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते तसेच या वेळी भाऊ बहिणीला भेट देत संरक्षण करण्याचे वचन देतो. एकमेकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला जातो. बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी भावाची असते.
लहान मुलांना या सणाचे विशेष आकर्षण असते. लहान बहीण देखील आपल्या भावाला ओवाळून राखी बांधते आणि हक्काने त्याच्याकडून भेटवस्तू घेते. त्यात बाहुली, ड्रेस, विविध खेळणी, कॅडबरी, चॉकलेट, शैक्षणिक साहित्य, पेन, किंवा रोख पैसे हक्काने घेते.
सद्या काळ बदलला तसा प्रत्येक सण साजऱ्या करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. पूर्वी बहिणीचे लग्न झाल्यावर बहीण दुसऱ्या गावी राहायला गेली की फक्त सणासुदीलाच माहेरी येत असे. राखी पौर्णिमा आली की भाऊ-बहीण दोघांचेही ऊर आनंदाने भरून यायचे कारण होते बहिणीला मिळणारी राखी पौर्णिमाची खास भेट. पूर्वीपेक्षा आता याचे महत्त्व दिवसें दिवस कमी कमी होताना जाणवते. आज हा सण साजरा करतांना बहीण भावाची प्रत्यक्ष भेट होत नाही. भाऊ आणि बहीण यामध्येच हा मोबाईल आला अन् रक्षाबंधन सण साजरा करण्याचा आनंद या मोबाईलने हिरावला.
सद्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी केली जाते. सद्या बहीण भावांकडे न जाताच हा सण साजरा होतो. पोस्टाने, कुरिअरने किंवा डिजिटल सोशल मीडियाद्वारे बहीण आपल्या भावाला राखी पाठवते. फोन पे, गुगल पे द्वारे रोख रक्कम किंवा ऑनलाईन खरेदी केलेले एखादे गिफ्ट भाऊ आपल्या बहिणीला भेट म्हणून पाठविले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगात भेट वस्तूंचे अनेक पर्याय आज आपल्या समोर उपलब्ध आहेत.
आजकाल माणुसकी कमी कमी होत चालली आहे. नात्यातील वीण घट्ट होण्याऐवजी सैल होत चालली आहे. आत्ताच्या मुलांना प्रत्येक सणासाठी किंवा उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीत “मामाच्या गावाला जाऊ या” स्वप्नवत वाटते. ना भेटणे, ना बोलणे, ना सुख:दुःखाच्या गप्पा.
आपल्या संसारात व्यस्त असणारी बहीण आणि भाऊ या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पहात असतात अन् नायलाजाने आधुनिक पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी करण्यात ती धन्यता मानतात कारण भावाकडे, बहिणीकडे सद्या असे सण साजरे करण्यासाठी वेळच नाही ना… पूर्वीचे ते प्रेम, आदर, भेटीची तळमळ, वाट पाहण्याची मज्जा, सण साजरा करण्याचा आनंद, भेट वस्तूवरून रुसवा, फुगवा, प्रेमाचे भांडण ही सर्व मजा, आनंद आज आपण हरवून बसलो आहे. काही घरी आजही राखी पौर्णिमा पूर्वी सारखीच धूम धडाक्यात साजरी करताना बघावयास मिळते.
मग काय.. आपल्या घरी यंदा राखी पौर्णिमा कशी साजरी करणार?
मधुकर घायदार, नाशिक 9623237135