व्यवसाय शिक्षण: मल्टी स्कील फाउंडेशन कोर्स

सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील ५२८ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण दिले जात आहे. यात प्रामुख्याने ब्युटी आणि वेलनेस, ऑटोमोबाईल सर्विस टेक्निशियन, रिटेल, हेल्थकेअर, मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, स्पोर्ट्स, मिडिया आणि एटरटेंटमेंट, ट्रॅव्हल्स आणि टुरिझम, अॅग्रीकल्चर, बँकिंग आणि फायनान्स हे दहा अभ्यासक्रम शिकविले जातात. यात ७० गुणांचे प्रात्यक्षिक व ३० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.  

आज आपण मल्टी स्किल फाउंडेशन कोर्सविषयी अधिक जाणून घेऊ या.

आजकाल पदवीधर व्यक्तीचे ज्ञानही सखोल नसते आणि काही कौशल्य अंगी बाणलेले नसते. तरीही दिवसेंदिवस खर्चिक बनत चाललेली भारतीय शिक्षण व्यवस्था मुलभूत कौशल्याचा अभाव असणारे मनुष्यबळ ‘घाऊकपणे’ जन्मास घालत आहे. बदललेल्या बाजारपेठांच्या गुंतागुंतीच्या गरजांमध्ये ज्यांचा उपयोग काडीमात्र नाही. आज प्लंबर, गवंडी, इलेक्ट्रिशियन, पेंटर, सुतार, वेल्डर, स्वयंपाकी, बागकाम करणारा माळी आदि कुशल कारागिरांची वानवा आहे. नेमकी हीच कमतरता दूर करण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना वरील सर्व व्यवसायाचे मल्टी स्किल अंतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे. युवकांच्या शैक्षणिक गरजांचा विचार करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी व प्रगती साधण्याकरिता त्याला आवश्यक ती कौशल्ये शिकविण्यासाठी हा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. या अभ्यासक्रमांतर्गत पाच विषय शिकविले जातात. त्यात अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञान, उर्जा व पर्यावरण, वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता आणि बागकाम, रोपवाटिका व शेती तंत्रज्ञान या विषयांचा समावेश आहे.

अन्नप्रक्रिया तंत्रज्ञानात स्वयंपाकघरात घ्यावयाची दक्षता तसेच विविध अन्नप्रक्रिया जसे शिजविणे, वाफावणे, तळणे, भाजणे, आदि प्रक्रिया शिकविल्या जातात.  खारे शेंगदाणे, शेंगदाणा चिक्की, तीळ चिक्की, लोणचे, टोमॅटो  सॉस, जॅम, पापड, बिस्कीट, ब्रेड, नानकटाई, पाव, ब्रेड, पॉपकार्न आदि पदार्थ कसे तयार करायचे? त्यांची पकिंग करून विक्री कशी करायची? विक्री किंमत, नफा कसा काढायचा आदींबाबतचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. संतुलित आहार कसा असावा? प्रत्येक खाद्यपदार्थातील कॅलरी, प्रथिने, स्त्रिग्ध, पिष्टमय पदार्थ यांचे असलेले प्रमाण शिकविले जाते. अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखावी याचे प्रशिक्षण दिले जाते.

कार्यशाळा व अभियांत्रिकी तंत्रज्ञानात अभियांत्रिकी हत्यारे, साधनांची ओळख व त्यांचा सुरक्षित वापर याचे शिक्षण दिले जाते. सुतारकामात बिजागरी बसविणे, सनमायका लावणे, लाकडी वस्तू तयार करून त्यांची विक्री करणे याचे प्रशिक्षण दिले जाते. फेब्रीकेशनमध्ये वेल्डिंग, ड्रिलिंग, टॅपिंग करणे, पत्र्यापासून डबा, सुपली तयार करणे आदींचे प्रशिक्षण दिले जाते. बांधकामात बिल्डींग मटेरीयलचा अभ्यास व विविध प्रकारच्या भिंती, कॉलम, बीम, प्लास्टरिंग तसेच रंगकामाचे प्रशिक्षण दिले जाते.

बागकाम, रोपवाटिका आणि शेती तंत्रज्ञानात शेती अवजारे, साहित्य, हत्यारे ओळख व त्यांचा सुरक्षित वापर, जमीन मशागत, पिक लागवड, आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय खते, कीड नियंत्रण, रोपवाटिका तंत्रज्ञान, जलसिंचनाच्या पद्धती, माती परीक्षण, जनावरांचा चारा व्यवस्थापन, कृत्रिम रेतन पद्धती आदींचे प्रशिक्षण दिले जाते.

उर्जा आणि पर्यावरण या अभ्यासक्रमात विधुत साधने, हत्यारांची ओळख व वापर, साधे वायरिंग, जिना, गोडाऊन वायरिंग, आर्थिंग आणि सोल्डरिंग करणे, इन्व्हर्टरची ओळख व देखभाल, वीजबिल काढणे, वीजबचतीच्या उपाययोजना, शोषखड्डा करणे, कचऱ्याचे व्यवस्थापन, सौर उर्जा, विधुत पंप, बायोगॅस संकल्पना, पर्जन्य मापक, पेट्रोल आणि डिझेल इंजिनची रचना आदींचे प्रशिक्षण दिले जाते.

वैयक्तिक आरोग्य व स्वच्छता यात वैयक्तिक स्वच्छता, संतुलित आहार, विविध मानवी रोग जसे क्षय, टायफाईड, रेबीज, पोलिओ, एड्स, कर्करोग, मधुमेह आदि आजारांचे कारणे, लक्षणे व उपाय, लसीकरणाचे महत्त्व, रक्तगट, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी, निर्जलीकरण, प्रदुर्षण, शासनाचे विविध सामाजिक सुविधा कार्यक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. चार वर्षाचा मल्टी स्कील फाउंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले आवडीचे क्षेत्र कोणते आहे यांची जाणीव करून दिली जाते. तसेच हा व्यवसाय शिक्षण विषय घेऊन बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये २५ टक्के आणि तंत्रनिकेतनमध्ये १५ टक्के आरक्षणही ठेवण्यात आले आहे. आता विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात बी. व्होकेशनल, एम. व्होकेशनल ते अगदी पीएचडीपर्यंत व्यवसाय शिक्षण हा विषय शिकू शकतो अशी समांतर व्यवस्था तयार झाली आहे.

मधुकर घायदार, नाशिक 9623237135

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button