प्रिय,
अंजली मॅडम,
गुरु ब्रम्हा, गुरु विष्णू,गुरु. देवो महेश्वर:
गुरु साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम:
गुरु म्हणजे गुप्त रुप, ज्ञानाचे, प्रकाशाचे असे रुप जे समाजाला सुशिक्षित बनवतात. एक प्रामाणिक, समजुतदार नागरिक घडवितात. अज्ञानाच्या काळोखातून ज्ञानाच्या प्रखर प्रकाशाकडे नेणारी एक ज्योत म्हणजे गुरु. ज्ञानाचा असा झरा जो न थांबता वाढतच जातो. मार्गात जो कोणी वाटसरु आढळतो त्यालासुद्धा त्या प्रवाहात वाहून नेतो. अश्या व्यक्तिमत्वाला गुरु म्हणतात.
असे म्हणतात व्यक्तिचा पहिला गुरु म्हणजे त्याचे आई-वडील आणि दुसरा गुरु म्हणजे शिक्षक. आई वडिल बोट धरून चालायला शिकवितात. तर शिक्षक त्यांना मार्ग दाखवितात.त्यांच्या विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. पदोपदि मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाने एक सुशिक्षित नागरिक निर्माण होतो. विद्यार्थ्यांनी यशाची पुढची पायरी चढावी यासाठी खडतर प्रयत्न करणारे व्यक्ती म्हणजे शिक्षक.
माझ्या आयुष्यात अशीच एक ज्ञानाची ज्योत घेऊन आलेल्या मला अतिशय जवळच्या वाटणाऱ्या माझ्या आवडत्या शिक्षिका आ. अंजली कडू मॅडम, तुमच्याकडे पाहून मला प्रेरणा मिळते. तुमच्यामुळे मला जिवनातील शिक्षणाचे महत्त्व कळले. लहानपणी जेव्हा मी गावातल्या जिल्हा परिषद शाळा,सावळी खुर्द येथे पहिल्या वर्गात गेली. तेव्हा मला थोडिही भिती वाटली नाही, कारण माझ्या पाठिशी तुम्ही होत्या. तुम्हि विद्यार्थ्यांना तुमच्या स्वत:च्या मूलासारखे समजलं. कधीही भेदभाव केला नाही सगळ्यांना सारखी वागणूक दिली. खूप प्रेम दिलं.आम्हाला प्रामाणिकपणा,स्वच्छता, संवेदनशीलता यांचे महत्त्व पटवून दिले. आम्हाला निर्भयपणे जगायला शिकवलं. मला आनंद आहे कि माझे प्राथमिक शिक्षण तुमच्या हाताखाली झाले.
आपल्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही स्वत: सगळ्यांना डान्स शिकवला.स्वातंत्रदिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम सादर केले. वेगवेगळे खेळ खेळायला शिकवले. तुमच्याबरोबर आम्हि खूप आनंदात ४ वर्ष घालवले. तुमच्यामुळे गावातल्या शाळेमध्ये प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झालं होतं. शाळा बहरुन आली होती. मात्र जेव्हापासून तुमची बदली दुसऱ्या शाळेमध्ये झाली. तेव्हापासून शाळा ओस पडली आहे. या शाळेमध्ये तुमची कमतरता जाणवत आहे. तुम्हि आणि मालगे सरांनी मिळून शाळेचं रुपच पालटून टाकलं.सरांची नेहमी भेट होते.मात्र वाईट या एका गोष्टीबद्दल वाटतं कि ज्या दिवशी तुम्ही शाळा सोडून गेलात त्या दिवसापासून आजपर्यंत मी तुम्हाला भेटू शकली नाही. तुमची नेहमी आठवण येते व सर्वात जास्त आठवण तेव्हा येते जेव्हा गुरुपौर्णिमा व शिक्षकदिनाच्या दिवशी सुध्दा तुमचे चरणस्पर्श करु शकत नाही. सगळ्या शिक्षकांमध्ये तुमची उणीव भासते. तुमची तेव्हा खूप आठवण येते. तुम्हि नेहमी आनंदात राहावं एवढिच इच्छा..
मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे कि, तुम्ही जसे आम्हाला प्रेम दिले. आमच्यावर चांगले संस्कार केले. तसेच प्रेम तुम्हि इतर विद्यार्थ्यांना देत आहात. मला एवढंच वाटत तुम्ही आमच्यापासून दुरावल्या आहात. तुम्हाला विसरणे अशक्य आहे. आणि तुम्हीही आम्हां सगळ्यांना कधी विसरु नका. आपला गृप फोटो पाहून मला आधीचे दिवस आठवतात. असं वाटतं पुन्हा एकदा लहान व्हावं. व तुमच्या वर्गात पुन्हा शिकावं. तुम्हि ज्ञानदानाचं जे महान कार्य करत आहात ते असंच निरंतर चालू द्या. इतर विद्यार्थ्यांना सुध्दा सुशिक्षित बनवा. तुमच्यासारख्या शिक्षिका मिळणे म्हणजे आमचे नशिबचं. तुमच्यासारख्या शिक्षिका सर्वांना मिळो व आम्हालाहि पुन्हा तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
तुमची लाडकी विद्यार्थ्यांनी,
वैष्णवी…
कु. वैष्णवी शेंडे, वर्ग ९ वी, सुबोध हायस्कूल, अचलपूर, जि. अमरावती