मी एक शिक्षिका आहे म्हटल्यावर सर्वांच्या भुवया उंचवतात आणि का त्यांना हेवा वाटू नये? कारण मी या निरागस, निष्पाप, चैतन्यमय मुलात दिवसभर राहते. त्यांच्यामध्ये मी ही परत एकदा माझे बालपण जगते. त्यांच्याप्रमाणे नाचते, उड्या मारते, खेळ खेळते, स्वतःला विसरून मी जगण्याचा सोहळा त्यांच्याबरोबर साजरा करते आणि खरोखरच असं भाग्य फक्त एका शिक्षकालाच लाभत.
एखादा उत्सव असेल तर मी ही त्यांच्याबरोबर पेहेराव करते, मी ही त्यांच्यासोबत अभिनय करते. प्रत्येक सण समारंभ, उत्सव आम्ही शाळेत साजरा करतो. मी भारतीय संस्कृती चे जतन करून हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहचवते, मूल्यांची जपणूक करतेय याचा मला खूप अभिमान वाटतो आणि माझे सर्व दुःख विसरून मुलांत रमते. मलाही मुलाप्रमाणे सुट्ट्या असतात. मीही सुट्ट्याचा आनंद घेते. निष्पाप माझी मुले मला त्यांच्या सर्व गोष्टी शेअर करतात. माझ्यावर खूप विश्वास असतो त्यांचा प्रसंगी आई वडिलांचे ऐकणार नाहीत पण माझे लगेच ऐकणार. कसले ऋणानुबंध आमचे? ते मला त्यांचीच मानतात. मीही त्यांच्यावर खूप प्रेम करते. मातृत्वाने त्यांना मार्ग दाखवते. कधी प्रेमाने तर कधी रागावून त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवते. माझ्या मुलांना मी शिक्षा केल्यानंतर कधीच राग येत नाही. थोड्यावेळाने मॅडम म्हणून माझ्या जवळ येतात. त्यावेळेस मी भारावून जाते आणि मला वाटते म्हणूनच पूर्वी मास्तर म्हणत असावेत, मा (आई) च्या स्तरावर जाऊन काम करणारा व्यक्ती म्हणजे मास्तर अशी खरी ओळख होती हे अगदी बरोबरच आहे.
जन्मोजन्मी आम्ही, बहु पुण्य केले
शिक्षक सेवेचे कार्य वाटेला आले
होय! मी एक शिक्षिका बोलतेय!
एव्हाना शांत राहून प्रामाणिकपणे काम करणारी शिक्षिका बोलतेय? म्हणल्यावर तुम्ही म्हणाल शिक्षक कसा बोलेल? कारण शासन, अधिकारी, पालक, गावकरी यांच्या प्रत्येक सूचनेला हो म्हणून मनापासून काम करणारी व्यक्ती म्हणजे मी शिक्षिकाच बोलतेय!
होय मी शिक्षिका, निरागस मुलाच्या आयुष्यात रंग भरून त्यांचे जीवन फुलवण्याचे काम करते, त्यांच्या मनात संस्काराची पेरणी करते, माझा विद्यार्थी एक आदर्श माणूस घडला पाहिजे यासाठी धडपडते. त्यासाठी मी ही सतत शिकत राहते कारण साने गुरुजी म्हणतात,
‘उत्तम शिक्षक हा अ जन्म जिज्ञासू विद्यार्थी असतो’
त्याचप्रमाणे सतत मी नाविन्याचा ध्यास घेते, स्वतःला घडविण्याचा प्रयत्न करते, बदलाचा स्वीकार करते. स्वतःला अपडेट ठेवते. माझ्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम देण्याचा माझा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने घेऊन निश्चित शिक्षणाचे ध्येय व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तळमळीने मी धडपडते. सतत विद्यार्थ्यांचा विचार माझ्या डोक्यात असतो. त्यामुळे अनेक नवीन सृजनशील गोष्टी जन्म घेतात. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शोध घेऊन मी माझ्या विद्यार्थ्यांना घडविते. त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी मी अनेक पर्याय, क्लुप्त्या, मार्ग वापरून माझा प्रत्येक विद्यार्थी घडलाच पाहिजे असे माझे ध्येय असते. त्यासाठी मी अनेक प्रयोग कृती करते. यावेळेस मला रवींद्र टागोर यांचे एक वाक्य आठवते.
‘एक प्रज्वलित दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो.’
म्हणून मी माझ्या ज्ञानाची लालसा कधीच कमी होऊ देत नाही. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा तळमळीने प्रयत्न करते. माझ्या विद्यार्थ्याने आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत न खचता सारासार विचार करून निर्णय कसा घ्यावा ?
एक आदर्श नागरिक घडावा यासाठी फक्त विद्यार्थ्यांचा अहोरात्र विचार करणारी मी एक शिक्षिका बोलतेय.
‘द्रक श्राव्य माध्यमाचा करून वापर
वृंदावते विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा अफाट
कॉम्प्युटर इंटरनेट व ॲप्सचा करून वापर
घेऊन जाते त्यांना माहितीच्या महासागरात’
पूर्वीच्या काळी शिक्षकांना देवाच्या स्थानी मानले जायचे. संत कबीरानी तर आपल्या एका दोहे मध्ये असे म्हणले आहे की जर माझ्यासमोर गुरू व देव एकदाच आले तर सर्व प्रथम मी आधी गुरूला वंदन करीन मग देवाला कारण देवापर्यंत पोहचवण्याचा मार्ग गुरूंनी दाखवला. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पूर्वीच्या गुरुप्रमाणे शिक्षकांना आता महत्व राहिले नाही कारण माहितीचा झालेला विस्फोट. गुगल, युट्युब वर क्षणात मिळत असलेले ज्ञान. त्यामुळे शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे त्यामुळे माझे काम आता अजून खूप आव्हानात्मक होत आहे. पण असे जरी असले तरी आत्ताच्या स्मार्ट युगात अजूनही मला महत्त्वाचे स्थान आहेच. कारण
शिक्षण हे फक्त ज्ञान नसून
संस्काराची ती खाण आहे
कला कौशल्यांचा विकास करून
उच्च जीवन देणारी कला आहे.
त्यामुळे माझी भूमिका आजही खूप महत्त्वाची आहे कारण माझे आजही आदर्शवादी व अनुकरणीय आचरण आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे त्यामुळे समाजात चांगला बद्दल घडवण्यासाठी मी मनापासून माझे काम करीत आहे. मी माझ्या पेशाकडे व्यवसाय म्हणून कधीच बघत नाही. एक सेवा म्हणून पाहते आणि त्यात माझे सर्वस्व (तन -मन- धन) पणाला लावून काम करते कारण शाळा माझे मंदिर असून विद्यार्थी माझे दैवत आहेत त्यामुळे सेवा हा माझा धर्म मानून विद्येच्या मंदिरात मी भारत देश घडविते.
विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून मी त्यांना निपुण बनवते आणि माझे विद्यार्थी जेव्हा गरुड भरारी घेतात त्यावेळेस मला पृथ्वीवरच नभी चा स्वर्गच पाहायला भेटतो. जेव्हा तळागाळातले माझे विद्यार्थी मोठ्या पदावर जातात. समाजात कर्तृत्व गाजवतात, सुसंस्कृत नागरिक होऊन फिनिक्स प्रमाणे भरारी घेतात. त्यावेळेस मी तिथेच आणि तेच असते पण माझा आनंद एखाद्या पुरस्कार पेक्षा खूप मोठा असतो, परमोच्य आनंदाचा तो क्षण असतो. सामान्य विद्यार्थी जेव्हा असामान्य म्हणून यशाच्या शिखरावर पोहोचतात त्यावेळेस कष्टाचे चीज झाले, जन्माचे सार्थक झाल्याचे खूप मोठे समाधान भेटते, जे की कोणत्याच क्षेत्रात कधीच भेटत नाही.त्यामुळे मला गर्व आहे माझ्या शिक्षिका असण्याचा ‘ज्ञान दान हे अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे कारण अन्नाने काही तासाची तृप्ती मिळते तर ज्ञानाने आयुष्य भराची तृप्ती मिळते’. त्यामुळे मनापासून आनंदाने, समाधानाने हे सर्व मी करीत असताना पण अलीकडच्या काळात माझ्यावर खूप अन्याय होत आहे ज्या वर्गात देशाचे भवितव्य घडते. जेथे निष्पाप, निरागस चिमुकले आपली ज्ञानलालसा घेऊन माझी आतुरतेने वाट पाहतात. त्याच वर्गात आता मला जायला वेळ मिळत नाही. एवढा अशैक्षणिक व शैक्षणिक कामाचा बोजा वाढला आहे. वर्गात जाऊन दिवसभर मुलांना हसत खेळत शिकवू ही आशा आता मावळत चालली आहे.
शाळेच्या स्वच्छते पासून ते बांधकामा पर्यंत सर्व कामे आवडीने करणारी मी आहे. सर्वात विश्वासू असल्यामुळे जनगणना, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती ही कामे मी प्रामाणिकपणे करतेच पण अलीकडे मात्र शासनाच्या दररोज येणाऱ्या नवीन नवीन उपक्रमाचा भडिमार, ऑनलाईन कामे व शौचालय सर्वेक्षण, दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे सर्वेक्षण यासारख्या अनेक अशैक्षणिक कामामुळे प्रचंड माझ्यावर ताण येत आहे. त्यामुळे वर्गात जाऊन नाचत – गात शिकवण्याची मानसिकता कमी होत चालली आहे. माझी सर्वच बाजूने कुचंबना होत आहे.
असे जरी असले तरी, मी एक शिक्षिका आहे. देशाचा निर्माता आहे. ज्या सावित्रीने व जोतिबा फुले यांनी खूप त्रास सहन करून अक्षराची तीर्थयात्रा सुरू केली,ज्ञानाची दरवाजे सर्वांसाठी उघडली,त्यांच्या कार्याचा वसा मी निरंतर चालू ठेवून ज्ञानाच्या पवित्र कार्यात कधीच अडथळा येऊ देणार नाही.
‘देऊन उत्तम दर्जेदार शिक्षण
जागतिक स्वीकार्यता मुल घडवेन मी
उच्चविभूषित सुसंस्कृत बनवून नागरिक
बनेन उज्वल राष्ट्राचा शिल्पकार मी
लेखिका मनिषा सिद्धेश्वर कुनाळे
जि. प. प्रा. मुलांची शाळा वागदरी ता. अक्कलकोट, जि. सोलापूर