याला जीवन ऐसे नाव

कधी कधी मनाला एक विचार स्पर्शून जातो, आपण जे जीवन जगत आहोत, त्याचा नेमका अर्थ काय? आपल्या कष्टांना घाबरणं, देव देव करत फक्त देवावर अवलंबून राहणं, दुसऱ्याला सुखात बघून दुःखी होण, माझ्याच वाट्याला इतकी दुःख का रे देवा? म्हणून नशिबाला दोष देत बसणं. काय पडलात ना विचारात! होय आपण सगळे थोड्याफार फरकाने हेच करतो आणि असेच वागतो देखील कारण पुस्तक वाचून पराक्रम करता येत नाही पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करतत पण प्रत्यक्षात संकटाशी दोन हात आपल्यालाच करावे लागतात. आव्हानांना आपल्यालाच पेलायचे आहे. कुणाला  कशात आनंद तर कुणाला कशात. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणूनच विचार करण्याची क्षमता देखील वेगवेगळी आपणास अनुभवायला मिळते. खरा प्रश्न काय आहे सांगू का, आपल्याला काय हवे! हेच आपल्याला नक्की कळलेले नाही. दुसऱ्यांची मोठी गाडी बघून, मोठा बंगला बघून, महागडा मोबाईल बघून आपल्याला आपल्या जवळ असलेल्या वस्तूचे मूल्य कमी वाटू लागते आणि तेथूनच खऱ्या दुःखाची सुरुवात होते. माझ्या आयुष्यातील दुःख सर्वात मोठे आहे, असे वाटायला लागते आणि आपोआप त्याचे दुष्परिणाम आपल्या मानसिकतेवर व्हायला लागतात. दुसऱ्यांचे यश बघून का बर वाईट वाटून घ्यायचे? आज तो यशस्वी आहे उद्या आपणही तसे प्रयत्न केले तर त्याच्या एवढे किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊ असा विचार नाही का करता येणार! जीवन म्हणजे आव्हानच आहे; जो उत्तमरीत्या त्याचा सामना करतो म्हणजे आपल्या प्रयत्नात, परिश्रमात सातत्य ठेवतो; तो नक्कीच यशस्वी होतो. हे त्रिकालबाधित सत्य आहे. आपणच आपल्या अपयशाचे भागीदार असतो. आयुष्यातील क्लेश, उणीवा जर बाजूला सारल्या ना तर आपल्यासारखे सुखी व आनंदी आपणच. फक्त गरज आहे सारता येण्याची आणि पुढे वाटचाल करण्याची. अपयश आले म्हणून प्रयत्न सोडून न देता जो आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो तो खरा आनंदी व समाधानी माणूस. खरे जगणे ते काय हे त्याला उलगडले; असे मला वाटते.

       इतरांकडून अपेक्षा ठेवणे हे दुःखाचे दुसरे कारण. अपेक्षा ठेवा ती फक्त स्वतःकडून ,कारण स्वतःला आनंदी आणि समाधानी ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, दुसऱ्यांची नाही. जे आपल्याला हवं ते समजून घ्या. दुसऱ्यांना काय देता येईल, थोडा  याचाही विचार करा. कारण आनंद दिला तर आनंद तुमच्याकडे परत येईल, प्रेम दिले, आदर दिला तर ते सर्व तुम्हाला देखील मिळेल. स्वार्थी वृत्ती सोडून, अपेक्षाभंगांच्या पदरातून बाजूला येऊन, अपयशाच्या सावटातून बाहेर निघून, जर आपण बघितलं तर खूप सुवर्णसंधी तुमची वाट बघताना तुम्हाला दिसेल. जीवन फार सुंदर आहे, ते आणखी सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. शक्य तितक्या आपुलकीने आणि नम्रतेने सामोरे जाल तर तुम्हाला आयुष्याच्या सुंदरतेची प्रचिती झाल्याशिवाय राहणार नाही. आनंद हा फुलपाखरासारखा असतो म्हणूनच आपले आयुष्य आपल्याला सकारात्मक विचारांनी परिपूर्ण करायचे आहे. आपली विचारसरणी आणि आपले आचरणच आपल्याला सुंदर व आनंदी जीवन देऊ शकत म्हणून त्यावर प्रयत्न करणे हे जास्त गरजेचे आहे.

आयुष्य छान आहे…

थोडे लहान आहे..

रडतोस काय वेड्या;

लढण्यातच शान आहे!

वर्षा गवारले, वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button