सृष्टीमध्ये जीवनचक्राप्रमाणे सणांचेही चक्र फ़िरत असते. येणे-जाणे यावरच सृष्टीचा कारभार चालत असतो. मानव बुद्धिवान असल्यामूळे परिस्थिती नुसार महत्व जाणून प्रगती करतो. सण सुद्धा त्या-त्या वेळेनुसार त्यांना नावे देवून साजरे केले जातात. सण येतात, तेव्हा ते काहीतरी इतीहास घेवून येत असतात. त्यात जीवनावश्यक मूल्य दडलेली असतात. सण येतात- जातात, कारण ते जीवनाचे प्रशिक्षक असतात. ते मानवाला बरेच काही शिकवून जातात. जीवन प्रवासात कसे वागायचे ? याचे अनमोल ज्ञान देत असतात. सण कधी एक दिवस, दोन दिवस तर कधी त्यापेक्षा जास्त दिवसांसाठी येत असतात. असाच हा दिवाळी सण पाच दिवसांसाठी येत असतो. दिवाळी ही पाच दिवसांची पाहूणीच वाटते. ती एकटी येत नाही तर सोबत तिचे आप्तगोत्र असतात.
दिवाळीचा अर्थ दिवे उजाळणे. दिवे लावून दिवाळीचे स्वागत करावे लागते. तसा विवीध पदार्थांचा पाहुणचार सुद्धा करावा लागतो म्हणून दिवाळी स्वागतापूर्वी सर्वात आधी स्वछता करतात. तशी दिवाळीची सक्त ताकीदच असते की काय असे वाटते. त्याशिवाय वातावरण आनंदी राहत नाही असे प्रत्ययास येते. आपणाला जसे सुख-दुख: वारा, वादळ, पाऊस यातून जावे लागते. दिवाळी हा सण सुद्धा अनेक आपत्तीमधून येत असतो. त्यासाठी, प्रत्येकालाच तिचे महत्व जाणून सेवा करायची असते.
स्वछता : पावसाळा ऋतू संपलेला असतो. अतिवृष्टी, वादळ, पूर, महापूर असे आलेले असतात . त्यामूळे घरा-दाराचे नुकसान, जीवहानी झालेले असते. शेतकरी, मजूर वर्ग, उद्योग- पती या काळात स्वछता करू शकत नाहीत म्हणून घराची अ ते अ: पर्यंत साफ़-सफ़ाई केली जाते. त्यानंतर ज्यांच्या-त्यांच्या परिस्थीतीनुसार स्वछता व रंग-रंगोटी केली जाते. वातावरण प्रसन्न होते. यानंतरच दिवाळीचे आगमन होते. यानंतर पाचही दिवस सकाळ आणि संध्याकाळ सडासमार्जन करून, रांगोळ्या काढून, दिवे लावून, विवीध पदार्थ बनवून दिवाळीला तृप्त केले जाते.
धनत्रयोदशी : धनत्रयोदशी हा दिवाळीचा पहिला दिवस; या दिवशी सोने-चांदी यांची पूजा करून अंगणात दिवा लावतात. त्या दिव्याला नमस्कार करतात. यामूळे येणारा मृत्यु टळतो असेही मानले जाते. “दिवा जळे विघ्न टळे” असे लोक म्हणतात. या दिवसाला ‘यमदिपदान’ असेही म्हणतात. याचे कारण असे आहे की, राजा हेमराजला पुत्र होतो. हा पुत्र म्हणजेच त्या राजाचा लाडका राजकुमार. तो वयात आल्यानंतर त्याचे लग्न होते. त्यादीवशी ज्योतिषी सांगतात, हा राजकुमार आजपासून चौथ्या दिवशी मरणार आहे. सर्वच त्याच्या मनासारखे वागू लागले. असे करता-करता चौथा दिवस उगवला. त्या रात्री राजकुमाराच्या पत्नीने या ना त्या निमित्याने त्याला झोपूच दिले नाही. यम त्याला न्यायला आले; तेव्हा राजपुत्राचे डोळे चांदी-सोन्याने चकाकतांना दिसले आणि ते बघून यमाचे डोळे दिपले आणि तो तिथून निघून गेला याचाच अर्थ असा की राजकुमार आजारी असेल. त्याची काळजी घेण्यात आली आणि म्हणून तो त्याचे प्राण वाचले. प्रतिक म्हणून सोने-चांदीची पूजा करीत असतात. आरोग्य चांगले असेल तर चांदी-सोने मिळवीता येतील. यावरून सर्वांना आरोग्याची काळजी घ्यावी असा बोध होतो.
नरक चतुर्दशी : नरकासूर हा कंसाचा मित्र . याने सोळा सहस्त्र कुमारीका बंदीवासात ठेवल्या होत्या. भगवान श्रीकृष्णानी दैत्याला मारून कुमारीकांची सुटका केली. यांच्याशी लग्न कोण करणार म्हणून घरी घेवून आले. त्याना आश्रय दिला. ही एक प्रकारची स्त्री-मुक्तीच आहे. श्रीकृष्णाने स्त्रीचे मूल्य जाणले आणि एक आदर म्हणून त्यांची सुटका केली. त्यामूळे थोडातरी राक्षसी वृत्तीला आळा बसला. आजही स्त्री-पुरूष समानता येण्यासाठी, स्त्रीचा आदर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्या स्त्रीया अंधारात होत्या. म्हणून श्रीकृष्णाने त्यांना प्रकाशात आणले. हा आनंदाचा दिवस दिवे लावून गोड-धोड बनवून साजरा केला जातो.
बलिप्रतीपदा : जगात कंजुष, दानी याप्रकारचे लोक असतात. त्या काळात बळीराजा हा दानशूर नाही तर महादानशूर होता. त्याला कोणीही असो, जो जे मागील त्याला तो कधीही नकार न देता सद्भावनेने दान करीत असे. एकाला माहिती मिळाली की दुसराही अडी-अडचणींसाठी त्याच्याकडे जायचा व मागायचा. विष्णू हे सर्व बघत होता. त्याला विचार आला की हा राजा असा कसा बरं दानी? असा वागेल तर स्वत:जवळ काय ठेवणार? याला आळा घालण्यासाठी विष्णूने बटू वामनाचा वेष धारण करून तो बळीराजाकडे गेला. राजाने त्याचे स्वागत केले. वामन म्हणाला,’मला जी पाहिजे ती भिक्षा देशील? तो म्हणाला, ‘होय”. मला जास्त काही नको फ़क्त त्रीपादभूमीचे दान देशील. त्याने काहीही विचार न करता तात्काळ ‘होय’ असे म्हटले.
बटू वामनाने एका पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली म्हणजेच त्याच्याजवळ जेवढी जमीन होती तेवढीही व्यापली. दुस-या पावलात आंतरिक्ष व्यापला. आंतरिक्ष म्हणजे आकाश आणि आकाश म्हणजे त्याचे सुख-सौख्य, ऐश-आराम. वामन म्हणाला. “राजा, आता तर तुझ्याजवळ काहीच नाही; मग एक पाऊल कुठे ठेवू? “ राजाने स्वत:च्या डोक्यावर पाय ठेवायला सांगितले आणि खरंच बटू वामनाने राजाच्या डोक्यावर पाय ठेवला. म्हणतात ना, “देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे, घेता-घेता एक दिवस देणा-याचे हातही घ्यावे.” असेच काहीसे बळीराजाचे झाले. विष्णूने त्याला पाताळात पाठविले. म्हणजेच त्याचा मृत्यु झाला. विष्णूने त्याला विचारले की तुला आता काय पाहिजे? तुझी काय ईच्छा आहे? आजपासून तीन दिवस दिपदान आणि वस्त्रदान करायला पाहिजे.
दिपदान म्हणजे दिव्यांचा प्रकाश पाहिजे म्हणजे माझ्यासारखे कुणीही दानी न होता, स्वत:चा विचार करूनच त्यांनी दान करावे. माझे अनेक बांधव अंधारात आहेत. त्यांना हे विचार देवून प्रकाशात आणा. आपली धनसंपदा स्वत:पूरती ठेवून तिचे रक्षण करून रंजल्या-गांजल्यांना तरी देता येईल. जर काहीच उरणार नाही तर दुस-यांचे भले कसे करणार? दुसरा वर वस्त्रदानाचा मागितला. आता, वस्त्रदान याचा अर्थ ‘लज्जारक्षण’ असा घेवू. गरजूंच्या अंगावर कापड झाकणे होय. तर कधी गरज नसतांनाही वस्त्र दान केले जाते. त्याला अपात्री दान असे म्हणतात. वस्त्रदानाचा दुसरा हेतू, जो अडचणीत, संकटात आहे, उपाशी आहे, ज्यांच्याकडून फ़ार मोठी चूक झालेली आहे त्यांना समजून घेवून मदत करणे इत्यादी प्रकारचे वर बळीराजाने स्वत:च्या अनुभवावरून मागितले. विष्णूला सांगितले की एकमेकांना समजून घेणे, मदत करणे, संकटात धावून जाणे याविषयी मार्गदर्शन करा, सुविचार द्या. यादिवशी दिवे लावून बलिप्रतिपदा साजरी करतात. विवीध गोड-धोड पदार्थ बनवितात. गायी-म्हशींची गोधन म्हणून पूजा करतात.
लक्ष्मीपूजन : प्रत्येकाने दान करावे; पण किती, कसे, केव्हा व कुणाला? याचा विचार करूनच आपल्या जवळ आहे त्याचे जतन करणे गरजेचे आहे. हा विचार बळीराजापासून मिळालेला आहे. या दिवशी जिकडे-तिकडे दिवे लावून रांगोळ्या काढून फ़टाके उडवतात. धनाची म्हणजे सोने-चांदी पैसे यांची पूजा करतात. दिव्यांमूळे चहू दिशांना झगमगाट दिसतो. असे वाटते, ‘जणू स्वर्गच धरतीवर आलाय की काय!’ लहान मुलांना, तरुणांना, मोठ्यांना, स्त्रियांना, पुरुषांना सर्वांनाच खुप आनंद मिळतो.
नभ उतरले खाली
मन मोहरून येई l
सांज नाहते प्रकाशात
थाटास उपमा नाही. ll
या दिवशी खरी लक्ष्मी म्हणून घरातील सुनेची पूजा करतात. स्त्रीचा आदर म्हणून सुनेला मान दिला जातो अश्या प्रकारे हा चौथा दिवस साजरा केला जातो.
भाऊबीज : भाऊबीज हा महत्वाचा दिवस.. ज्या पती-पत्नीपासून विश्वनिर्मीती होते, त्यांच्याच अपत्यांच्या पवित्र प्रेमाचा, पवित्र नात्याचा दिवस. बहीण-भावांमध्ये वैर न येता ते प्रेमाने आणि सलोख्याने राहवेत यासाठी हा दिवस पाळला जातो. वैर केव्हा येते तर बहुतेक धनासाठीच… बहीण-भावाचे नाते तुटते. नाते, नाते राहत नाही. बळीराजाप्रमाणे न वागता बहीण-भावाने सुद्धा एकमेकांच्या संपत्तीचे रक्षण करून प्रांजळ प्रेमाची ज्योत तेवत ठेवावी. नाते अतुट व्हावे याकरीता बहीण भावाला दिवे उजाळून ओवाळते. भाऊही बहीणीला भेट किंवा भेटवस्तू देतो. मला एवढेच पाहिजे, अमूकच पाहिजे, तमूक नको, असा आग्रह बहीण-भावांनी कधीही धरू नये हाच यामागचा सद्विचार आहे.
आज अर्धा हिस्सा म्हणून बहीणी भावांना त्रास देतात. त्यात पवित्र बंधन न राहता वैर येणार हे निश्चितच. यात कुणीही सुखी होणार नाही. प्रेम , नाते, माणूसकी, आई-बापाचे ऋण हेच खरे धन आहे. त्या धनाची पूजा म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. बळीराजाच्या अतिदानी स्वभावामूळेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे विचार सर्वांना मिळालेत. कंजुष लोकांचेही शेवटी हालच होतात म्हणून अतिकंजुष किंवा अतिदानी होऊ नये. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. आयुष्याला, पृथ्वीला मर्यादा आहे. काळ, काम, वेग, मर्यादा यांचा विचार करूनच कोणतेही कार्य व्हावे. आरोग्याची, पर्यावरणाची, नात्यांची काळजी घ्यावी. हाच संदेश या दिवाळी सणापासून मिळत असतो.
शिक्षक ध्येय परिवारातील सर्व पालक, विद्यार्थी आणि शिक्षक बंधु-भगिनींना दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
सौ. कोमलकांता बन्सोड
से. नि. अध्यापिका
भिवापूर जि. गोंदिया 7447810764