सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील ८००+ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षण दिले जात आहे. यात प्रामुख्याने ब्युटी आणि वेलनेस, ऑटोमोबाईल सर्विस टेक्निशियन, रिटेल, हेल्थकेअर, मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स, स्पोर्ट्स, मिडिया आणि एटरटेंटमेंट, ट्रॅव्हल्स आणि टुरिझम, अॅग्रीकल्चर, बँकिंग आणि फायनान्स हे दहा अभ्यासक्रम शिकविले जातात. यात ७० गुणांचे प्रात्यक्षिक व ३० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.
आज आपण हेल्थकेअर अभ्यासक्रमाविषयी अधिक जाणून घेऊ या.
जगात येणारे दशक हे वैद्यकीय सुविधांच्या अंगाने प्रचंड बदलाचे असणार आहे. भारतात मेडिकल टुरिझम हा मोठा उद्योग म्हणून नावारूपाला येत आहे. चीन, इटली, ग्रीस आदि अनेक देशांत युवकांची संख्या घटत असतांना वैद्यकीय सेवेसाठी कुठेही जाण्याची तयारी असलेल्या भारतातील तरुणांना यात जास्त संधी आहेत. आपल्या देशातील नर्सिंग शिक्षण हे जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त असल्याने आपल्या देशातील परिचारकांना विदेशात प्रचंड मागणी आहे.
गेल्या काही वर्षात देशभरातील रुग्णालयांची संख्या वाढली अर्थातच प्रशिक्षित नर्सेसची गरजही वाढली. फक्त महाराष्ट्रातच सुमारे तीन लाख परिचारिका आहेत. आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहे. म्हणूनच सद्या समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेतच हेल्थ केअरचे प्रशिक्षण दिले जात आहे. यात दवाखान्यातील रुग्णांची काळजी, रुग्णालयातील जंतुनाशक आणि निर्जंतुकीकरण, प्रथमोपचार, शरीररचना, शरीरविज्ञान शास्त्र व आहार, आरोग्य वितरण व्यवस्था, आरोग्य सहाय्यकांची भूमिका स्वच्छता मानदंड, वैयक्तिक स्वच्छता, रोग, संसर्ग पासून सुरक्षितता, कामाच्या जागी सुसंवाद, आदींचे प्रशिक्षण दिले जाते.
नर्सिंग क्षेत्रात बीएससी इन नर्सिंग, एमएससी इन नर्सिंग, पीएचडी इन नर्सिंग, एएनएम (नर्सिंग), जीएनएम, डीएचए, डीएचएन यांसारखे डिप्लोमा तसेच सर्टिफिकेट कोर्स उपलब्ध आहेत. दवाखाने, क्लिनिक, हेल्थ विभाग, शासकीय रुग्णालये, औद्योगिक घरे, रेल्वेतील आरोग्य विभाग, शुशृषागृहे, नर्सिंग स्कूल, कॉलेज आदि ठिकाणी परिचारिका, नर्स, नर्सिंग असिस्टंट, संशोधन नर्स, नर्स प्रबंधक, आशा, वार्ड नर्स, नर्सिंग शिक्षक, संक्रमण नियंत्रण नर्स आदि प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत.
मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छित असणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. नाही का?
मधुकर घायदार, नाशिक 9623237135