संपादकीय…
मोबाईल: असून अडचण, नसून खोळंबा…
कोविड नंतर सर्वांचाच मोबाईल वापर वाढलेला आपणास दिसून येईल. सतत, दररोज, नियमित २१ दिवस एखादी कृती केली तर २२ दिवशी व त्यानंतर ती आपोआपच अंगवळणी पडते. तशीच काहीशी अवस्था मोबाईल वापराबाबत झाली आहे. बरं मोबाईल वापरायला कोणतेही वयाचे बंधन नाही. अगदी बाळ जेवत नसेल तरी त्याच्या हाती मोबाईल देऊन आपला कार्यभाग साधला जातो. रडत असेल तरी हाच रामबाण उपाय.
आज मोबाईलमुळे घराघरातील एकमेकांमधील संवाद कमी कमी होत चालला आहे. आज आईवडिलांना मुलांशी आणि मुलांना आईवडिलांशी बोलायला वेळ नाही. जेही थोडेफार बोलणे होते तेही मोबाईलवरच.
आज प्रत्येकाच्या हाती एक स्मार्ट फोन आहे. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असल्याने सर्वांच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असते. स्मार्ट फोन न वापरणारा आज अशिक्षित ठरत आहे.
मुलांना तर स्मार्ट फोन हा एक ‘अल्लाउद्दिनचा चिराग’ हाती लागला असे वाटते. काय नाही या स्मार्ट फोन मध्ये. विविध वेबसाईट, यु टुब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आदीसह हमखास टाईमपास करणारे विविध रिल्स, व्हॉट्सॲपचे स्टेटस, बातम्या, टिव्ही चॅनल आहेच. अगदी तहान भूक विसरुन मुले, तरुण, तरुणी मोबाईलवर टाईमपास करीत असतात. याला काही अपवाद असू शकतात.
मोबाईलवर अभ्यास जरी करीत असेल तरी अधून मधून येणाऱ्या विविध जाहिराती लक्ष विचलित करतात आणि मुले – मुली नको त्या गोष्टी बघतात, वाचतात. परिणामी त्या गोष्टींचे त्यांना कालांतराने व्यसन लागते. त्यांच्या मनावर आणि वागणुकीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसतो. समाजामध्ये ते वावरतांना हिंसक प्रतिक्रिया देताना दिसतात.
मोबाईल फोनचा वापर आपणास सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे करता येतो. कोणत्या प्रकारे करायचा हे आपल्या हातात आहे.
आज जरी मोबाईल फोन हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला असला तरी मोबाईलवर गेम खेळायचा की आयुष्याचा गेम (खेळखंडोबा) करायचा हे शेवटी आपल्याच हातात आहे. आज मोबाईलसह पिंजऱ्यात कैद व्हायचे की मोबाईल बाजूला ठेऊन एका फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात उंच भरारी घ्यायची हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.
साप्ताहिक शिक्षक ध्येयचा अंक वाचण्यासाठी .. . . CLICK HERE