पिंजऱ्यात बंदिस्त असलेला पक्षी जसा कितीही प्रयत्न केले तरी तो पिंजऱ्याच्या बाहेर पडू शकत नाही तशी काहीशी अवस्था आजकालच्या विद्यार्थ्यांची झाली आहे. फक्त विद्यार्थीच नाही तर त्यांचे आई – वडील, पालक, शिक्षक, इतर नागरिक यांचीही अवस्था फार काही वेगळी नाही.
आज मोबाईलमुळे घराघरातील एकमेकांमधील संवाद कमी कमी होत चालला आहे. आज आईवडिलांना मुलांशी आणि मुलांना आईवडिलांशी बोलायला वेळ नाही. जेही थोडेफार बोलणे होते तेही मोबाईलवरच.
आज प्रत्येकाच्या हाती एक स्मार्ट फोन आहे. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असल्याने सर्वांच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असते. स्मार्ट फोन न वापरणारा आज अशिक्षित ठरत आहे.
मुलांना तर स्मार्ट फोन हा एक ‘अल्लाउद्दिनचा चिराग’ हाती लागला असे वाटते. काय नाही या स्मार्ट फोन मध्ये. विविध वेबसाईट, यु टुब, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आदीसह हमखास टाईमपास करणारे विविध रिल्स, व्हॉट्सॲपचे स्टेटस, बातम्या, टिव्ही चॅनल आहेच. अगदी तहान भूक विसरुन मुले, तरुण, तरुणी मोबाईलवर टाईमपास करीत असतात. याला काही अपवाद असू शकतात.
मोबाईलवर अभ्यास जरी करीत असेल तरी अधून मधून येणाऱ्या विविध जाहिराती लक्ष विचलित करतात आणि मुले – मुली नको त्या गोष्टी बघतात, वाचतात. परिणामी त्या गोष्टींचे त्यांना कालांतराने व्यसन लागते. त्यांच्या मनावर आणि वागणुकीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसतो. समाजामध्ये तेवावरतांना हिंसक प्रतिक्रिया देताना दिसतात.
मोबाईलचा अतिवापर आरोग्यास हानिकारक आहे तरी तरुण तरुणी वाहन चालवताना मोबाईलचा वापर, गाणे ऐकणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे, जेवतांना मोबाईल, झोपताना मोबाईल, रात्री २ – ३ वाजेपर्यंत ऑनलाईन राहणे पसंत करतात.
मोबाइलच्या अतिवापराने कानाचे, डोळ्याचेही वेगवेगळे आजार होऊ शकतात. चष्मा लागणे, कमी दिसणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, शिवाय सतत एका जागी बसून गेम खेळत राहिल्याने लहान वयातच पाठदुखी, कंबर दुखी, स्थूलपणा येणे यासारखे आजार होतात. मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये मेंदूचा कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. ३० ते ४५ वयोगटातील व्यक्तींनी मोबाईल फोनचा अतिवापर केल्यास त्यांना अल्झायमर व पार्किन्सन सारखे मानसिक आजार उद्भवण्याची शक्यता असल्याचे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. शिवाय मोबाईल फोनच्या अति वापरामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत आहे. जवळ मोबाइल ठेवून झोपल्याने निद्रानाशाचे प्रमाण वाढते आहे. मुला – मुलींमध्ये व्यसनाधीनता, उदासीनता, स्थूलता, एकलकोंडेपणा, अपुरी झोप, चिडचिड, निद्रानाश, थकवा, नैराश्य आदी मानसिक त्रास, शारीरिक त्रास होऊन आरोग्य बिघडते त्याचा परिणाम दैनंदिन जीवनात तसेच कामात होतो.
घरात प्रत्येकी एक स्मार्ट फोन. दिवसातील २४ तासांपैकी किती वेळ आपण मोबाईलचा वापर करतो, याचा सर्वे केल्यास प्रत्येक जण कमीत कमी २ तास ते १० तास असे काही कमी जास्त प्रमाण सर्वच घराघरांत दिसते. दिवसातून अर्धा तास मोबाईल वापरायला हरकत नाही.
मोबाईल फोनचा वापर आपणास सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे करता येतो. कोणत्या प्रकारे करायचा हे आपल्या हातात आहे.
आज जरी मोबाईल फोन हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला असला तरी मोबाईलवर गेम खेळायचा की आयुष्याचा गेम (खेळखंडोबा) करायचा हे शेवटी आपल्याच हातात आहे. आज मोबाईलसह पिंजऱ्यात कैद व्हायचे की मोबाईल बाजूला ठेऊन एका फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात उंच भरारी घ्यायची हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.
मधुकर घायदार, नाशिक मोबा. 9623237135