व्यवसाय मार्गदर्शन: फोटोग्राफी

आजच्या काळात फोटोग्राफी हा प्रत्येकाचा आवडीचा विषय बनलेला आहे. प्रकाश संवेदी वस्तुंद्वारे प्रकाश किंवा विद्युतचुंबकीय उत्सारणाची नोंद करुन टिकाऊ प्रतिमा निर्माण करण्याच्या पद्धतीला फोटोग्राफी म्हणजेच छायाचित्रण असे म्हणतात. खरे तर छायाचित्रण ही एक इतिहास जपून ठेवणारी एक अजरामर कला आणि शास्त्र आहे, ती छायाचित्रकार, त्यासाठी वापरलेला कॅमेरा, छायाचित्रकाराचा दृष्टीकोन आणि वेळ आदी गोष्टींवर अवलंबून असते. छायाचित्रकाराला या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानही अवगत करणे आवश्यक आहे.

फोटोग्राफी ही अशी कला आहे जी आपल्या डोळ्यांना प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देते. आपण फोटो काढत असताना त्या गोष्टीशी एक भावनिक बंध निर्माण करत असतो. फोटो हे नेहमी बोलके असावेत त्यांच्याशी आपला संवाद व्हायला हवा. एक योग्य आणि सुंदर छायाचित्र संपूर्ण घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा करतो. छायाचित्रण करत असताना त्यातून आपल्याला जे दाखवायचे आहे ते सरळ आणि साधे पाने असायला हवे. फोटोग्राफी हे एकमेव माध्यम आहे की त्यात भाषेची आवश्यकता नसते. या क्षेत्रात शब्दापेक्षा प्रतिमेचा अधिक प्रभाव पडत असतो. एक छायाचित्र अनेक शब्दांची गरज भागवते. आजकाल सर्वच क्षेत्रामध्ये फोटोग्राफीचा वापर केला जातो. त्यात प्रामुख्याने चित्रपट उद्योग, प्रिंटींग व्यवसाय, जाहिराती, विविध उत्पादन, कला, मनोरंजन या क्षेत्रांचा समावेश होतो.

फोटोग्राफी ही अशी कला आहे की ज्यात आजही आपल्याला उज्ज्वल करियर करण्याची संधी आहे, त्यासाठी आपल्याकडे हवे एक चांगली दृष्टी आणि या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान.

फोटोग्राफी हे एक क्रिएटीव्ह माध्यम असल्याने त्यासाठी विशेष पात्रतेची आवश्यकता नसते. मात्र नवीन पाहण्याची दृष्टी असायला हवी. 

फोटोग्राफीच्या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता बारावी पाहिजे. आजकाल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतदेखील विद्यार्थ्याना फोटोग्राफी शिकविली जाते. भारतात फोटोग्राफीचा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था असून त्यात फोटोग्राफीतील पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात छायाचित्रकाराला पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्याक्षिकांवर भर दिलेला असतो.

 सध्या जाहिरात, पत्रकारीता व फॅशनसोबतच मॉडेलींग क्षेत्रात फोटॉग्राफीचे क्षेत्र कमा‍लीचे विस्तारले आहे. त्यामुळे या क्षेत्रात होतकरू युवकांसाठी मोठ्या प्रमाणात करियरच्या संधी उपलब्ध आहेत. 

कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफर- कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफर हा एखाद्या संस्थेसाठी कार्यरत असतो. गृहपत्रिका, जाहिराती, यंत्राचे छायाचित्रे काढणे आदी कामांचा यात समावेश होतो. आपल्या उत्पादनाविषयी आकर्षक छायाचित्राच्या माध्यमातून लोकांना अवगत, आकर्षित करणे हे कमर्शियल फोटॉग्राफरचे मुख्य काम असते. 

प्रेस फोटोग्राफर- प्रेस फोटोग्राफर म्हणजेच ‘फोटो जर्नलिस्ट’. प्रेस फोटॉग्राफर स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र, मासिके तसेच वृत्तसंस्थेसाठी कार्यरत असतात. पत्रकाराप्रमाणे प्रेस फोटोग्राफरलाही महत्त्व आहे. त्यासाठी त्याला कमी वेळात उत्कृष्ट क्षण टिपण्याचे कौशल्य हवे. 

फीचर फोटोग्राफर- एखादी कथा, कविता, लेख आदी छायाचित्राच्या माध्यमातून सादर करण्याची कला फीचर फोटोग्राफरच्या अंगी असली पाहिजे. यात त्याला संबंधित विषयाचे सखोल ज्ञान आवश्यक असते. फीचर फोटोग्राफी क्षेत्रात अनेक विषयांचा समावेश होतो. 

जाहिरात फोटोग्राफर- जाहिरात एजन्सीमधील फोटोग्राफर हे बाजारात येणाऱ्या नवीन उत्पादन लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करतात. एखाद्या उत्पादनाच्या लोकप्रियेतेमागे खरे कौशल्य हे त्या जाहिरात फोटोग्राफरचे असते.

फॅशन फोटोग्राफर – फोटोग्राफी क्षेत्रात फॅशन फोटॉग्राफीची मोठी क्रेझ आहे. फॅशन क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. स्मार्ट वर्क आणि चांगली मिळकत तसेच स्वत:चे नाव होण्यासाठी तरूण-तरूणी मोठ्या संख्येने ‘फॅशन फोटोग्राफी’ हे क्षे‍त्र करियर म्हणून निवडतात. तसेच फॅशन हाउस, डिझायनर, फॅशन मासिके, वर्तमानपत्रे, खाजगी वाहिनी येथेही फॅशन फोटॉग्राफरला मागणी असते. 

याचप्रमाणे पोर्टेट फोटॉग्राफी, पोर्टफोलिओ फोटॉग्राफी, वेडींग फोटॉग्राफी, नेचर व वाईल्डलाईफ फोटॉग्राफी, फॉरेंन्सिक फोटॉग्राफी, डिजिटल फोटॉग्राफी, फाईन आर्ट्स फोटॉग्राफी, ट्यूरिष्ट फोटोग्राफी या विविध प्रकारातही युवक आपले करिअर करून उत्तम अर्थार्जन करू शकता. तसेच युवक स्वतःचा स्टुडीओ देखील सुरु करू शकतो.

मधुकर घायदार, नाशिक 9623237135

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button