व्यवसाय मार्गदर्शन: सायकल रिपेअरिंग शॉप

दिवसेंदिवस सरकारी तसेच खासगी नोकऱ्यांचे प्रमाण कमी-कमी होत चालले आहे. या परिस्थितीवर सर्वोत्तम उपाय म्हणजे स्वयंरोजगार. युवकांनी शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता एखादा व्यवसाय सुरु करावा. उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करून संधी निर्माण करायची की सभोतालच्या परिस्थितीला दोष देत बसायचे हे सर्वस्वी आजकालच्या युवक-युवतींवर अवलंबून आहे.

कुठलाही व्यवसाय म्हटला की सर्वप्रथम त्यातील कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असते. व्यवसाय सुरु करणे जास्त कठीण नसते तर त्याला आडवी येते नकारात्मक मानसिकता. व्यवसाय कमीपणाचा असतो ही मानसिकताच तरुणांना स्वत:च्या पायावर उभे राहू देत नाही. या नकारात्मक मानसिकतेला बाजूला सारून, लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपली आवड आणि त्या संबंधित कौशल्ये अंगीभूत असलेला व्यवसाय सुरु करावा. वर्षभरानंतर त्यात तुमची प्रगती दिसली की तेच लोक म्हणतील, ‘चांगला निर्णय घेतलास, नोकरीत काय ठेवलंय..’

आज आपण ‘सायकल रिपेअरिंग’ या व्यवसायाबाबत अधिक जाणून घेऊ. सायकल हे अतिशय सुखकर, स्वस्त, हलके, विना प्रदूषणाचे आणि शरीराची काळजी घेणारे असे उत्तम वाहन आहे. ज्यांचे शाळा, कॉलेज किंवा ऑफिस एक ते दहा किलोमीटर अंतरावर आहे त्यांनी आवर्जून सायकलचा वापर करायला हवा. पण आजही सायकल म्हणजे आर्थिकदृष्ट्या खालच्या दर्जाच्या लोकांचे वाहन म्हणून पाहिले जाते. त्यामुळे शक्य असूनही केवळ प्रतिष्ठेसाठी आपण मोटार-सायकल वापरतो.

पूर्वी फिलिप्स, हिरो सायकल अडीचशे ते तीनशे रुपयांना मिळत असे. त्याकाळी प्रत्येक घरात एक तरी सायकल असायची. सायकलने प्रवास करणे हे त्याकाळी प्रतिष्ठेचे मानले जात असे. पण हळूहळू तंत्रज्ञानात प्रगती झाली अन आज सायकल संस्कृती लोप पावल्यात जमा झाली. आज सायकलची निर्मिती करणाऱ्या शेकडो देशी तसेच विदेशी कंपन्या आहेत. त्यात बिटवीन, एवन, हर्क्युलस, हिरो, एटलस, बीएसए, स्कॉट, ट्रेक, बियांची, बर्गेमॉट इत्यादी अनेक कंपन्या सायकलचे उत्पादन करतात. साधारणत: सायकलची किंमत साडेतीन हजार ते चार लाख रुपयांपर्यंत आहे. त्यात पुन्हा साधी की गिअरवाली सायकल यावरून तिची किंमत ठरते. विदेशी कंपनीची सायकल पंधरा हजाराच्या पुढे आहेत.

कुठलेही यंत्र असो वर्षा-दोन वर्षानंतर त्याला देखभाल, दुरुस्तीची गरज पडतेच. सायकलही याला अपवाद नाही. गिअरवाल्या सायकलींचा देखभाल खर्चही अधिक असतो.

मुख्य रस्त्यावर किंवा एखाद्या ऑफिसजवळ सायकल दुरुस्तीचे दुकान सुरु करू शकतो. सायकल रिपेअरिंगचे दुकान सुरु करण्यासाठी साधारणत: एक कॉम्प्रेसर, पक्कड, हातोडी, स्क्रूड्रायव्हर, स्पॅनर सेट आणि सायकल देखभालीसाठी लागणारे विविध स्पेअरपार्ट यासाठी सत्तर ते नव्वद हजार रुपये भांडवल असणे आवश्यक आहे. सुरुवातीला भाडे तत्वावर दुकान घेऊन त्याठिकाणी सायकल दुरुस्तीचे दुकान सुरु करू शकतो.

सायकलचे टायर पंचर काढणे, ट्यूब-टायर बदलणे, ब्रेक सेटिंग, चैन सेटिंग, ब्रेक पॅड बदलणे, स्पोक बदलणे, व्हील अलॉयमेंट, पॅडल बदलणे, ऑईलिंग, विविध असेसरीज बसविणे, जुन्या तसेच नवीन सायकलची खरेदी विक्री इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची कामे सायकल रिपेअरिंगच्या दुकानात केली जातात. हे सर्व कामे करण्यासाठी अंगी कौशल्ये मात्र हवीत. पूर्वी सायकल एक रुपया तास याप्रमाणे भाडे तत्वावर मिळत असे. आता आधुनिकीकरण, डिजीटायझेशन, तंत्रज्ञानाच्या मदतीने सायकल भाडे तत्वावर देणे हा स्वतंत्र व्यवसाय नाशकात अस्तित्वात आला आहे. सायकल रिपेअरिंगचा अभ्यासक्रम मुंबई येथील श्रमिक विद्यापीठात उपलब्ध आहे. सायकल दुकानात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करीत अनेकांनी हे सायकल दुरुस्तीचे ज्ञान आत्मसात केले आहे. थेरीपेक्षा प्रॅक्टिकल ज्ञानावर भर देत हे ज्ञान एकाकडून दुसऱ्याकडे जात आहे. तसे पाहिले तर साधारत: सहा महिने काम केल्यानंतर बऱ्यापैकी अनुभव हाती येतो, अंगी कौशल्ये प्राप्त झाल्यास स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्यास युवक सक्षम होतो. सायकल रिपेअरिंग या व्यवसायात सुमारे वीस हजार ते साठ हजार प्रतिमाह कमाई होऊ शकते. यासाठी मात्र गरज आहे ती नकारात्मक मानसिकता टाकून यासाठी आवश्यक असणारे कौशल्ये प्राप्त करण्याची.

मधुकर घायदार 9623237135

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on

Call Now Button